YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ करिंथ 4

4
प्रांजळपणे व धैर्याने सुवार्ता गाजवणे
1म्हणून आमच्यावर झालेल्या दयेनुसार ही सेवा आम्हांला देण्यात आली आहे, म्हणून आम्ही धैर्य सोडत नाही.
2आम्ही लाजिरवाण्या गुप्त गोष्टी वर्ज्य केल्या आहेत, आम्ही कपटाने चालत नाही व देवाच्या वचनाविषयी कपट करत नाही; तर सत्य प्रकट करून देवासमक्ष प्रत्येक माणसाच्या सदसद्विवेकाला आपणांस पटवतो.
3परंतु आमची सुवार्ता आच्छादलेली असल्यास ज्यांचा नाश होत आहे त्यांच्या ठायी ती आच्छादलेली आहे.
4त्यांची म्हणजे विश्वास न ठेवणार्‍या लोकांची मने ह्या युगाच्या दैवताने आंधळी केली आहेत, अशा हेतूने की, देवाची प्रतिमा जो ख्रिस्त त्याच्या गौरवी सुवार्तेचा प्रकाश त्यांच्यावर प्रकाशू नये.
5कारण आम्ही आपली घोषणा करत नाही; तर ख्रिस्त येशू हा प्रभू आहे अशी आणि येशूप्रीत्यर्थ आम्ही तुमचे दास आहोत अशी स्वतःची घोषणा करतो.
6कारण “अंधारातून उजेड प्रकाशित होईल” असे जो देव बोलला तो येशू ख्रिस्ताच्या मुखावरील देवाच्या गौरवाच्या ज्ञानाचा प्रकाश पाडण्यासाठी आमच्या अंतःकरणात प्रकाशला आहे.
प्रेषितांची शक्तिहीनता व देवाचे सामर्थ्य
7ही आमची संपत्ती मातीच्या भांड्यात आहे, अशा हेतूने की, सामर्थ्याची पराकोटी देवाची आहे, आमच्यापासून होत नाही, हे समजावे.
8आमच्यावर चोहोंकडून संकटे आली तरी आमचा कोंडमारा झाला नाही; आम्ही घोटाळ्यात पडलो तरी निराश झालो नाही;
9आमचा पाठलाग झाला तरी परित्याग करण्यात आला नाही; आम्ही खाली पडलेले आहोत तरी आमचा नाश झाला नाही;
10आम्ही प्रभू येशूचा वध सर्वदा शरीरात वागवतो, अशा हेतूने की, येशूचे जीवनही आमच्या शरीरांत प्रकट व्हावे.
11कारण जे आम्ही जिवंत राहतो ते आम्ही येशूप्रीत्यर्थ सदाचेच मरणाच्या हाती सोपवलेले आहोत, ह्यासाठी की, येशूचे जीवनही आमच्या मर्त्य देहात प्रकट व्हावे.
12आमच्यामध्ये मरण, पण तुमच्यामध्ये जीवन आपले कार्य चालवते.
13‘मी विश्वास धरला म्हणून बोललो,’ ह्या शास्त्रलेखानुसार जो विश्वासाचा आत्मा तोच आत्मा आमच्या ठायी असल्यामुळे आम्ही विश्वास धरतो आणि त्यामुळे बोलतोही.
14हे आम्हांला ठाऊक आहे की, ज्याने प्रभू येशूला उठवले तो येशूबरोबर आम्हांलाही उठवील व तुमच्याबरोबर सादर करील.
15सर्वकाही तुमच्याकरता आहे, ह्यासाठी की, पुष्कळ जणांच्या द्वारे जी कृपा विपुल झाली ती देवाच्या गौरवार्थ अपार आभारप्रदर्शनाला साधनीभूत व्हावी.
क्षणिक दुःख पण सार्वकालिक वैभव
16म्हणून आम्ही धैर्य सोडत नाही; परंतु जरी आमचा बाह्य देह क्षय पावत आहे, तरी अंतरात्मा दिवसानुदिवस नवा होत आहे.
17कारण आमच्यावर येणारे तात्कालिक व हलके संकट हे आमच्यासाठी अत्यंत मोठ्या प्रमाणात सार्वकालिक गौरवाचा भार उत्पन्न करते;
18आम्ही दृश्य गोष्टींकडे नाही तर अदृश्य गोष्टींकडे लक्ष लावतो; कारण दृश्य गोष्टी क्षणिक आहेत, पण अदृश्य गोष्टी सार्वकालिक आहेत.

सध्या निवडलेले:

२ करिंथ 4: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन