YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांची कृत्ये 22

22
यहूद्यांबरोबर पौलाने केलेले भाषण
1“बंधुजनहो व वडीलजनहो, मी जे आता तुम्हांला प्रत्युत्तर करतो ते ऐका.”
2तो आपल्याबरोबर इब्री भाषेत बोलत आहे हे ऐकून ते अधिक शांत झाले. मग त्याने म्हटले :
3“मी यहूदी आहे. माझा जन्म किलिकियातील तार्स नगरात झाला आणि मी ह्या शहरात गमलिएलाच्या चरणांजवळ लहानाचा मोठा होऊन मला वाडवडिलांच्या नियमशास्त्राचे शिक्षण कडकडीत रीतीने मिळाले, आणि जसे तुम्ही सर्व आज देवाविषयी आवेशी आहात तसा मीही होतो.
4पुरुष व स्त्रिया ह्यांना बांधून तुरुंगात घालून देहान्त शिक्षा देईपर्यंत मी ह्या पंथाचा पाठलाग केला.
5त्याविषयी प्रमुख याजक व सगळा वडीलवर्गही माझा साक्षी आहे; मी त्यांच्यापासून बंधुजनांस पत्रे घेऊन दिमिष्कास चाललो होतो; ह्यासाठी की, जे तेथे होते त्यांनाही बांधून यरुशलेमेत शासन करण्यास आणावे.
6मग असे झाले की, जाता जाता मी दिमिष्काजवळ पोहचलो, तेव्हा सुमारे दुपारच्या वेळेस आकाशातून माझ्याभोवती एकाएकी मोठा प्रकाश चमकला.
7तेव्हा मी जमिनीवर पडलो, आणि ‘शौला, शौला, माझा छळ का करतोस?’ अशी वाणी माझ्याबरोबर बोलताना मी ऐकली.
8मी विचारले, ‘प्रभूजी, तू कोण आहेस?’ त्याने मला म्हटले, ‘ज्या नासोरी येशूचा तू छळ करतोस तोच मी आहे.’
9तेव्हा माझ्याबरोबर जे होते त्यांना प्रकाश दिसला अन् ते घाबरले, परंतु माझ्याबरोबर बोलणार्‍याची वाणी त्यांनी ऐकली नाही.
10मग मी म्हणालो, ‘प्रभूजी, मी काय करावे?’ प्रभूने मला म्हटले, ‘उठून दिमिष्कात जा; मग तू जे काही करावे म्हणून ठरवण्यात आले आहे, त्या सर्वांविषयी तुला तेथे सांगण्यात येईल.’
11त्या प्रकाशाच्या तेजामुळे मला दिसेनासे झाले, म्हणून माझ्या सोबत्यांनी माझा हात धरून मला दिमिष्कात नेले.
12मग हनन्या नावाचा कोणीएक मनुष्य होता, तो नियमशास्त्राप्रमाणे नीतिमान होता, आणि तेथे राहणारे सर्व यहूदी त्याच्याविषयी चांगले बोलत असत.
13तो माझ्याकडे आला व जवळ उभा राहून मला म्हणाला, ‘शौल भाऊ, इकडे पाहा.’ तत्क्षणीच मी त्याच्याकडे वर पाहिले.
14मग तो म्हणाला, ‘आपल्या पूर्वजांच्या देवाने तुझ्यासंबंधाने ठरवले आहे की, त्याची इच्छा काय आहे हे तू समजून घ्यावेस; आणि त्या नीतिमान पुरुषाला पाहावे व त्याच्या तोंडची वाणी ऐकावी;
15कारण जे तू पाहिले आहे व ऐकले आहे त्यांविषयी तू सर्व लोकांपुढे त्याचा साक्षी होशील.
16तर आता उशीर का करतोस? ऊठ, प्रभूच्या नावाचा धावा करून बाप्तिस्मा घे आणि आपल्या पातकांचे क्षालन कर.’
17मग असे झाले की, मी यरुशलेमेस माघारी आल्यावर, मंदिरात प्रार्थना करत असता माझे देहभान सुटले.
18तेव्हा मी त्याला पाहिले; तो मला म्हणाला, ‘त्वरा कर, यरुशलेमेतून लवकर निघून जा; कारण तू माझ्याविषयी दिलेली साक्ष ते मान्य करणार नाहीत.’
19तेव्हा मी म्हणालो, ‘प्रभो, त्यांना ठाऊक आहे की, तुझ्यावर विश्वास ठेवणार्‍यांना मी बंदीत टाकून प्रत्येक सभास्थानात त्यांना मारहाण करत असे.
20तुझा रक्तसाक्षी1 स्तेफन ह्याचा रक्तपात झाला तेव्हा मी स्वतः जवळ उभा राहून मान्यता दर्शवत होतो आणि त्याचा घात करणार्‍याची वस्त्रे सांभाळत होतो.’
21तेव्हा त्याने मला सांगितले, ‘जा, मी तुला परराष्ट्रीयांकडे दूर पाठवतो.”’
रोमी नागरिक म्हणून असलेला पौलाचा हक्क
22ह्या वाक्यापर्यंत लोकांनी त्याचे ऐकले; मग ते आरोळी मारून बोलले, “जगातून ह्याला नाहीसे करा, ह्याची जगण्याची लायकी नाही.”
23ते ओरडत व आपली वस्त्रे अंगावरून काढून टाकून आकाशात धूळ उधळत असता,
24सरदाराने असा हुकूम केला की, त्याला गढीत आणावे. ते त्याच्यावर इतके का ओरडत होते हे समजण्यासाठी त्याने त्याची चौकशी चाबकाखाली करण्यास सांगितले.
25मग त्यांनी त्याला वाद्यांनी ताणले, तेव्हा जवळ उभ्या असलेल्या शताधिपतीला पौलाने म्हटले, “रोमी मनुष्याला व तशात ज्याला दोषी ठरवले नाही अशाला तुम्ही फटके मारणे कायदेशीर आहे काय?”
26हे ऐकून शताधिपतीने सरदाराजवळ जाऊन म्हटले, “आपण हे काय करत आहात? तो माणूस रोमी आहे.”
27तेव्हा सरदार त्याच्याजवळ येऊन म्हणाला, “मला सांग, तू रोमी आहेस काय?” त्याने म्हटले, “होय.”
28सरदाराने उत्तर दिले, “मी हा नागरिकत्वाचा हक्क फार मोल देऊन विकत घेतला आहे.” पौलाने म्हटले, “मी तर जन्मतःच रोमी आहे.”
29ह्यावरून जे त्याची चौकशी करणार होते ते तत्काळ त्याच्यापासून निघून गेले; शिवाय हा रोमी आहे असे सरदाराला कळले तेव्हा त्यालाही भीती वाटली, कारण त्याने त्याला बांधवले होते.
सन्हेद्रिन सभेपुढे पौलाचे आत्मसमर्थन
30यहूदी लोकांनी त्याच्यावर जो आरोप आणला तो काय आहे हे निश्‍चितपणे कळावे असे सरदाराच्या मनात होते. म्हणून दुसर्‍या दिवशी त्याने त्याला मोकळे केले, आणि मुख्य याजक व सगळी न्यायसभा ह्यांना एकत्र होण्याचा हुकूम करून पौलाला खाली आणून त्यांच्यापुढे उभे केले.

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन