YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांची कृत्ये 4:1-31

प्रेषितांची कृत्ये 4:1-31 MARVBSI

ते लोकांबरोबर बोलत असता त्यांच्यावर याजक, मंदिराचा सरदार व सदूकी हे चालून आले; कारण ते लोकांना शिक्षण देऊन, येशूच्या द्वारे मेलेल्यांतून पुन्हा उठणे आहे असे उघडपणे सांगत होते, ह्याचा त्यांना संताप आला. तेव्हा त्यांनी त्यांना अटक केली व संध्याकाळ झाली होती म्हणून सकाळपर्यंत त्यांना चौकीत ठेवले. तथापि वचन ऐकणार्‍यांतील पुष्कळांनी विश्वास ठेवला आणि अशा पुरुषांची संख्या सुमारे पाच हजार झाली. नंतर दुसर्‍या दिवशी असे झाले की, त्यांचे अधिकारी, वडील व शास्त्री, आणि प्रमुख याजक हन्ना आणि कयफा, योहान, आलेक्सांद्र व प्रमुख याजकाच्या कुळातील जितके होते तितके यरुशलेमेत एकत्र जमले. आणि त्यांनी त्यांना मध्ये उभे करून विचारले, “तुम्ही हे कोणत्या सामर्थ्याने किंवा कोणत्या नावाने केले?” तेव्हा पेत्र पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्यांना म्हणाला, “अहो लोकाधिकार्‍यांनो व वडील जनांनो, एका दुर्बल मनुष्यावर कसा उपकार झाला म्हणजे तो कशाने बरा झाला, ह्याविषयी आमची आज चौकशी व्हायची असेल, तर तुम्हा सर्वांना व सर्व इस्राएल लोकांना हे कळावे की, ज्याला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले, ज्याला देवाने मेलेल्यांतून उठवले, त्या नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावाने हा मनुष्य बरा होऊन तुमच्यापुढे उभा राहिला आहे. तुम्ही ‘बांधकाम करणार्‍यांनी तुच्छ मानलेला जो दगड कोनशिला झाला’ तो हाच आहे. आणि तारण दुसर्‍या कोणाकडून नाही; कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यांमध्ये दिलेले नाही.” तेव्हा पेत्राचे व योहानाचे धैर्य पाहून, तसेच हे निरक्षर व अज्ञानी इसम आहेत हे जाणून ते आश्‍चर्य करू लागले; आणि हे येशूच्या सहवासात होते हेही त्यांनी ओळखले. तरी बर्‍या झालेल्या त्या माणसाला त्यांच्याजवळ उभे असलेले पाहून त्यांना काही विरुद्ध बोलता येईना. मग त्यांनी त्यांना न्यायसभेच्या बाहेर जाण्याची आज्ञा केली आणि ते आपसांत विचार करून म्हणाले, “ह्या माणसांना आपण काय करावे? कारण त्यांच्याकडून खरोखर प्रसिद्ध चमत्कार घडला आहे, हे सर्व यरुशलेमकरांना कळून चुकले आहे; तेव्हा ते आपल्याला नाकारता येत नाही. तरी ते लोकांमध्ये अधिक पसरू नये म्हणून त्यांना अशी ताकीद द्यावी की, ह्यापुढे तुम्ही ह्या नावाने लोकांपैकी कोणाबरोबरही बोलू नये.” मग त्यांनी त्यांना बोलावून असे निक्षून सांगितले की, ‘येशूच्या नावाने अगदी बोलू नका अथवा शिकवूही नका.’ परंतु पेत्र व योहान ह्यांनी त्यांना उत्तर दिले की, “देवाच्या ऐवजी तुमचे ऐकावे हे देवाच्या दृष्टीने योग्य की अयोग्य आहे हे तुम्हीच ठरवा; कारण जे आम्ही पाहिले व ऐकले ते न बोलणे हे आम्हांला शक्य नाही.” तेव्हा त्यांनी त्यांना पुन्हा ताकीद देऊन सोडून दिले; त्यांना शिक्षा कशी करावी हे लोकांमुळे त्यांना सुचेना; कारण घडलेल्या गोष्टींमुळे सर्व लोक देवाचा गौरव करत होते. बरे करण्याचा हा चमत्कार ज्या माणसावर घडला तो माणूस चाळीस वर्षांहून अधिक वयाचा होता. ते सुटल्यानंतर आपल्या मित्रमंडळीकडे गेले आणि मुख्य याजक आणि वडील जे काही त्यांना म्हणाले होते ते सर्व त्यांनी सांगितले. हे ऐकून ते एकचित्ताने देवाला उच्च स्वराने म्हणाले, “हे स्वामी, आकाश, पृथ्वी, समुद्र ह्यांचा व त्यांच्यात जे काही आहे त्या सर्वांचा उत्पन्नकर्ता तूच आहेस. आमचा पूर्वज, तुझा सेवक दावीद, ह्याच्या मुखाने पवित्र आत्म्याच्या द्वारे तू म्हटलेस, ‘राष्ट्रे का खवळली, व लोकांनी व्यर्थ योजना का केल्या? प्रभूविरुद्ध व त्याच्या अभिषिक्ताविरुद्ध पृथ्वीचे राजे उभे राहिले, व अधिकारी जमले;’ कारण खरोखरच ज्याला तू अभिषेक केलास तो तुझा पवित्र ‘सेवक’ येशू ह्याच्या विरुद्ध ह्या शहरात परराष्ट्रीय व इस्राएल लोक ह्यांच्यासह हेरोद व पंतय पिलात हे एकत्र झाले; ह्यासाठी की, जे काही घडावे म्हणून तू स्वहस्ते व स्वसंकल्पाने पूर्वी योजले होते ते त्यांनी करावे. तर हे प्रभो, आता तू त्यांच्या धमकावण्याकडे पाहा; आणि बरे करण्याकरता तू आपला हात लांब करत असता आपल्या दासांनी पूर्ण धैर्याने तुझे वचन सांगावे असे कर; तुझा पवित्र सेवक येशू ह्याच्या नावाने चिन्हे व अद्भुते घडावीत असेही कर.” त्यांनी प्रार्थना केल्यावर ज्या जागेत ते जमले होते ती हादरली आणि ते सर्व पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन देवाचे वचन धैर्याने बोलू लागले.