YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांची कृत्ये 9

9
शौलाचा पालट
1शौल अजूनही प्रभूच्या शिष्यांना धमक्या देणे व त्यांचा घात करणे ह्यांविषयीचे फूत्कार टाकत होता.
2त्याने प्रमुख याजकाकडे जाऊन त्याच्यापासून दिमिष्कातल्या सभास्थानांना अशी पत्रे मागितली की, तो मार्ग अनुसरणारे पुरुष किंवा स्त्रिया कोणीही त्याला आढळल्यास त्याने त्यांना बांधून यरुशलेमेस आणावे.
3मग जाता जाता असे झाले की, तो दिमिष्काजवळ येऊन पोहचला त्या वेळी अकस्मात त्याच्यासभोवती आकाशातून प्रकाश चमकला.
4तेव्हा तो जमिनीवर पडला आणि त्याने अशी वाणी आपणाबरोबर बोलताना ऐकली की, “शौला, शौला, माझा छळ का करतोस?”
5तेव्हा तो म्हणाला, “प्रभो, तू कोण आहेस?” त्याने म्हटले, “ज्या येशूचा तू छळ करतोस तोच मी आहे; [काट्यावर लाथ मारणे हे तुला कठीण.
6तेव्हा तो थरथर कापत व आश्‍चर्यचकित होऊन म्हणाला “प्रभो, मी काय करावे अशी तुझी इच्छा आहे?” प्रभू म्हणाला,] “तर ऊठ व नगरात जा, म्हणजे तू काय करायचे हे तुला सांगण्यात येईल.”
7त्याच्याबरोबर जी माणसे जात होती ती स्तब्ध उभी राहिली. त्यांनी वाणी ऐकली खरी पण त्यांच्या दृष्टीस कोणी पडले नाही.
8मग शौलाला जमिनीवरून उठवले आणि त्याने डोळे उघडले, तेव्हा त्याला काही दिसेना; मग त्यांनी त्याला हाताला धरून दिमिष्कात नेले.
9तेथे तो तीन दिवस आंधळ्यासारखा झाला व त्याने काही अन्नपाणी घेतले नाही.
दिमिष्कामध्ये शौल
10इकडे दिमिष्कात हनन्या नावाचा कोणीएक शिष्य होता; त्याला प्रभू दृष्टान्तात म्हणाला, “हनन्या!” त्याने म्हटले, “काय प्रभू?”
11प्रभू त्याला म्हणाला, “उठून नीट नावाच्या रस्त्यावर जा आणि यहूदाच्या घरी तार्सकर शौल नावाच्या मनुष्याचा शोध कर; कारण पाहा, तो प्रार्थना करत आहे;
12आणि आपल्याला पुन्हा दिसावे म्हणून हनन्या नावाचा एक मनुष्य आपणावर हात ठेवत आहे असे त्याने पाहिले आहे.”
13तेव्हा हनन्याने उत्तर दिले, “प्रभो, यरुशलेमेतल्या तुझ्या पवित्र जनांचे ह्या माणसाने किती वाईट केले आहे हे मी पुष्कळांकडून ऐकले आहे;
14आणि येथेही तुझे नाव घेणार्‍या सर्वांना बांधावे असा मुख्य याजकांपासून त्याला अधिकार मिळाला आहे.”
15परंतु प्रभूने त्याला म्हटले, “जा; कारण परराष्ट्रीय, राजे व इस्राएलाची संतती ह्यांच्यासमोर माझे नाव घेऊन जाण्याकरता तो माझे निवडलेले पात्र आहे;
16आणि त्याला माझ्या नावासाठी किती दुःख सोसावे लागेल हे मी त्याला दाखवीन.”
17तेव्हा हनन्या निघाला आणि त्या घरी गेला; आणि त्याच्यावर हात ठेवून म्हणाला, “शौल भाऊ, तू वाटेने येत असता ज्या प्रभूने म्हणजे येशूने तुला दर्शन दिले, त्याने तुला पुन्हा दृष्टी यावी व तू पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हावेस म्हणून मला पाठवले आहे.”
18तत्क्षणी त्याच्या डोळ्यांवरून खपल्यांसारखे काही पडले व त्याला दृष्टी आली आणि त्याने उठून बाप्तिस्मा घेतला.
19मग अन्न घेतल्यावर त्याला शक्ती आली. ह्यानंतर तो दिमिष्कातल्या शिष्यांबरोबर काही दिवस राहिला,
20आणि त्याने लगेचच सभास्थानामध्ये येशूविषयी घोषणा केली की, “तो देवाचा पुत्र आहे.”
21तेव्हा सर्व ऐकणारे विस्मित होऊन म्हणू लागले, “हे नाव घेणार्‍यांचा ज्याने यरुशलेमेत नाश केला तोच हा नव्हे काय? आणि त्यांना बांधून मुख्य याजकांकडे न्यावे म्हणूनच हा येथे आला होता ना?”
22पण शौलाला तर अधिकाधिक सामर्थ्य प्राप्त होत गेले आणि येशू हाच ख्रिस्त आहे असे सिद्ध करून तो दिमिष्कात राहणार्‍या यहूदी लोकांना कुंठित करत राहिला.
23असे बरेच दिवस चालले; तेव्हा यहूदी लोकांनी त्याला ठार मारण्याचा मनसुबा केला;
24पण त्यांचा तो कट शौलाला समजला. त्यांनी तर त्याला मारण्याकरता रात्रंदिवस वेशींवर पाळत ठेवली होती;
25परंतु त्याच्या शिष्यांनी रात्रीच्या वेळी त्याला नेले व पाटीत बसवून गावकुसावरून खाली उतरवले.
यरुशलेम व तार्स येथे शौल
26मग तो यरुशलेमेत आला आणि शिष्यांबरोबर मिळण्यामिसळण्याचा प्रयत्न करू लागला; परंतु ‘हा शिष्य आहे’ असा त्यांचा विश्वास नसल्यामुळे ते सर्व त्याला भीत होते.
27तेव्हा बर्णबा त्याला घेऊन प्रेषितांकडे आला आणि त्याला वाटेत प्रभूचे दर्शन कसे झाले, प्रभू त्याच्याबरोबर कसा बोलला आणि येशूच्या नावाने दिमिष्कात त्याने धैर्याने कसे भाषण केले हे सर्व त्याने त्यांना सांगितले.
28तो यरुशलेमेत प्रभू येशूच्या नावाने धैर्याने बोलत त्यांच्याबरोबर जात येत असे;
29शिवाय तो हेल्लेणी यहूद्यांबरोबरही बोलत असे व वादविवाद करत असे; म्हणून ते त्याला मारण्याचा प्रयत्न करू लागले.
30बंधुजनांना हे समजल्यावर त्यांनी त्याला कैसरीयात नेले व पुढे तार्सास पाठवले.
31अशा प्रकारे सर्व यहूदीया, गालील व शोमरोन ह्या प्रदेशांतील मंडळीस स्वस्थता मिळाली, आणि तिची उन्नती होऊन ती प्रभूच्या भयात व पवित्र आत्म्याच्या समाधानात चालत असता वाढत गेली.
लोद येथे एका रोग्यास बरे करण्यात येते
32मग असे झाले की, पेत्र चहूकडे फिरत असता लोद गावात जे पवित्र जन राहत होते त्यांच्याकडेही गेला.
33तेथे त्याला ऐनेयास नावाचा एक मनुष्य आढळला; त्याला पक्षाघात झाल्यामुळे तो आठ वर्षे अंथरुणाला खिळलेला होता.
34त्याला पेत्राने म्हटले, “ऐनेयास, येशू ख्रिस्त तुला बरे करत आहे, ऊठ व स्वतः आपले अंथरूण नीटनेटके कर.” तेव्हा तो तत्काळ उठला.
35त्याला पाहून लोद व शारोन येथील सर्व रहिवासी प्रभूकडे वळले.
दुर्कस
36यापोमध्ये टबीथा उर्फ दुर्कस1 ह्या नावाची कोणीएक शिष्या होती; ती सत्कृत्ये व दानधर्म करण्यात तत्पर असे.
37पुढे असे झाले की, त्या दिवसांत ती आजारी पडून मरण पावली; तेव्हा त्यांनी तिला आंघोळ घालून माडीवरच्या खोलीत ठेवले.
38लोद यापोजवळ असल्यामुळे पेत्र तेथे आहे असे जेव्हा शिष्यांनी ऐकले तेव्हा त्यांनी दोघा जणांस पाठवून त्याला विनंती केली की, “आमच्याकडे येण्यास उशीर करू नका.”
39तेव्हा पेत्र त्यांच्याबरोबर गेला. तो तेथे पोहचताच त्यांनी त्याला माडीवरच्या खोलीत नेले; त्याच्याजवळ सर्व विधवा रडत उभ्या राहिल्या आणि दुर्कस त्यांच्याबरोबर होती तेव्हा ती जे अंगरखे व जी वस्त्रे करत असे ती त्यांनी त्याला दाखवली.
40पण पेत्राने त्या सर्वांना बाहेर काढले आणि गुडघे टेकून प्रार्थना केली; मग कुडीकडे वळून म्हटले, “टबीथे, ऊठ.” तेव्हा तिने डोळे उघडले व पेत्राला पाहून ती उठून बसली.
41मग त्याने तिला हात देऊन उठवले; आणि पवित्र जनांना व विधवांना बोलावून त्यांच्यापुढे तिला सजीव असे उभे केले.
42हे सर्व यापोमध्ये माहीत झाले; आणि पुष्कळांनी प्रभूवर विश्वास ठेवला.
43नंतर असे झाले की, तो यापोत शिमोन नावाच्या कोणाएका कातडे कमावणार्‍या चांभाराच्या येथे बरेच दिवस राहिला.

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन