YouVersion लोगो
सर्च आयकॉन

निर्गम 38

38
होमवेदीची रचना
(निर्ग. 27:1-8)
1त्याने होमवेदी बाभळीच्या लाकडाची बनवली; तिची लांबी पाच हात व रुंदी पाच हात अशी ती चौरस असून तिची उंची तीन हात होती.
2त्याने तिच्या चार्‍ही कोपर्‍यांत चार शिंगे बनवली; ती अंगचीच होती; त्याने ही वेदी पितळेने मढवली;
3आणि त्याने वेदीची सर्व उपकरणे म्हणजे हंड्या, फावडी, कटोरे, काटे व अग्निपात्रे ही सर्व पितळेची बनवली.
4वेदीला त्याने सभोवती कंगोर्‍याच्या खाली पितळेच्या जाळीची एक चाळण बनवली; ती वेदीच्या खालच्या बाजूने अर्ध्या उंचीपर्यंत होती.
5त्याने पितळेच्या चाळणीच्या चार्‍ही कोपर्‍यांना दांडे घालण्यासाठी चार कड्या ओतून तयार केल्या.
6त्याने बाभळीच्या लाकडाचे दांडे करून ते पितळेने मढवले.
7वेदी उचलण्यासाठी तिच्या बाजूंच्या कड्यांत दांडे घातले; वेदी मध्यभागी पोकळ ठेवून बाजूंना फळ्या बसवून ती बनवली.
गंगाळ बनवणे
(निर्ग. 30:18)
8त्याने गंगाळ व त्याची बैठक पितळेची बनवली. दर्शनमंडपाच्या दाराजवळ सेवा करीत असलेल्या स्त्रियांच्या आरशांचे हे पितळ होते.
निवासमंडपाचे अंगण
(निर्ग. 27:9-19)
9त्याने अंगण तयार केले; त्याच्या दक्षिण बाजूला कातलेल्या तलम सणाचे विणलेले पडदे जोडून एक कनात केली, तिची लांबी शंभर हात होती.
10तिच्यासाठी वीस खांब होते व त्या खांबांसाठी पितळेच्या वीस उथळ्या होत्या; खांबांच्या आकड्या व त्यांच्या बांधपट्ट्या चांदीच्या होत्या.
11त्यांच्या उत्तर बाजूलाही शंभर हात लांबीचे पडदे जोडून केलेली एक कनात होती; तिच्यासाठीही वीस खांब असून त्यांच्यासाठी पितळेच्या वीस उथळ्या होत्या; खांबांच्या आकड्या व त्यांच्या बांधपट्ट्या चांदीच्या होत्या.
12आणि पश्‍चिम बाजूला पन्नास हात लांबीचे पडदे जोडून केलेली एक कनात होती; तिच्यासाठी दहा खांब व दहा उथळ्याही होत्या; ह्या खांबांच्या आकड्या व बांधपट्ट्या चांदीच्या होत्या.
13पूर्वेकडील बाजू पन्नास हात ठेवली होती.
14अंगणाच्या फाटकाच्या एका बाजूला पंधरा हात लांबीचे पडदे जोडून केलेली एक कनात होती; तिच्यासाठी तीन खांब व उथळ्याही तीन होत्या.
15आणि अंगणाच्या फाटकाची दुसरी बाजूही तशीच होती; अंगणाच्या फाटकाच्या ह्या बाजूला व त्या बाजूला पंधरा-पंधरा हात पडदे जोडून केलेल्या कनाती होत्या, त्यांच्यासाठी तीन-तीन खांब व उथळ्याही तीन-तीन होत्या.
16अंगणाच्या सभोवतालचे सर्व पडदे कातलेल्या तलम सणाच्या कापडाचे होते.
17खांबांच्या उथळ्या पितळेच्या आणि आकड्या व बांधपट्ट्या चांदीच्या होत्या; त्यांचे मथळे चांदीने मढवले होते; अंगणाचे सर्व खांब चांदीच्या बांधपट्ट्यांनी जोडले होते.
18अंगणाच्या फाटकाचा पडदा वेलबुट्टीदार असून, निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा आणि कातलेल्या तलम सणाच्या कापडाचा होता; त्याची लांबी वीस हात व रुंदीकडील उंची अंगणाच्या पडद्याइतकी पाच हात होती.
19त्याचे खांब चार आणि त्यांच्यासाठी पितळेच्या उथळ्या चार होत्या; त्यांच्या आकड्या चांदीच्या असून त्यांचे मथळे चांदीने मढवले होते व त्यांच्या बांधपट्ट्या चांदीच्या होत्या.
20निवासमंडपाच्या आणि अंगणाच्या सभोवती असलेल्या सर्व मेखा पितळेच्या होत्या.
पवित्रस्थानातील कामासाठी लागलेले सोने, चांदी, पितळ वगैरे
21निवासमंडपाचे म्हणजे साक्षपटाच्या निवासमंडपाचे जे सामान लेव्यांच्या सेवेकरता केले त्याची यादी मोशेच्या सांगण्यावरून अहरोन याजकाचा मुलगा इथामार ह्याने केली तीच ही.
22ज्या ज्या वस्तू करण्याविषयी परमेश्वराने मोशेला आज्ञा दिली होती त्या सर्व वस्तू यहूदा वंशातील हूराचा नातू म्हणजे ऊरीचा मुलगा बसालेल ह्याने बनवल्या.
23त्याच्या जोडीला दान वंशातील अहिसामाकाचा मुलगा अहलियाब हा कोरीव काम करणारा कुशल कारागीर असून निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताच्या कापडावर व तलम सणाच्या कापडावर कशिदा काढणारा होता.
24पवित्रस्थानाच्या सर्व कामासाठी लागलेले सोने, म्हणजे लोकांनी अर्पण केलेले सगळे सोने एकोणतीस किक्कार1 होते, आणि पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे ते सातशे तीस शेकेल होते.
25मंडळीपैकी ज्यांची नोंद करण्यात आली होती, त्यांनी जी चांदी अर्पण केली ती शंभर किक्कार भरली आणि पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे ती सतराशे पंचाहत्तर शेकेल भरली.
26म्हणजे जितके वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे होते त्यांची गणती झाली तेव्हा, ते सहा लाख तीन हजार पाचशे पन्नास भरले. त्यांतल्या प्रत्येकामागे पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलना-प्रमाणे एकेक बेका म्हणजे अर्धा शेकेल मिळाला.
27ती शंभर किक्कार चांदी पवित्रस्थानातील उथळ्या व अंतरपटाच्या उथळ्या ओतायला लागली; एकेका उथळीला एकेक किक्कार अशा शंभर किक्कारांच्या शंभर उथळ्या केल्या.
28आणि बाकीची सतराशे पंचाहत्तर शेकेल चांदी खांबांसाठी आकड्या करायला, खांबांच्या मथळ्यांवर मढवणी करायला व त्याच्यासाठी बांधपट्ट्या बनवायला लागली.
29अर्पण केलेले पितळ सत्तर किक्कार व दोन हजार चारशे शेकेल होते.
30ते पितळ घेऊन दर्शनमंडपाच्या दाराच्या उथळ्या, पितळी वेदी व तिची पितळी चाळण आणि वेदीचे सर्व सामान,
31अंगणाच्या चार्‍ही बाजूंच्या उथळ्या व त्यांच्या फाटकाच्या उथळ्या, आणि निवासमंडप व अंगण ह्यांच्या चार्‍ही बाजूंच्या मेखा बनवल्या.

सध्या निवडलेले:

निर्गम 38: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन