YouVersion लोगो
सर्च आयकॉन

गलतीकरांस पत्र 6

6
व्यवहारोपयोगी बोध
1बंधुजनहो, कोणी माणूस एखाद्या दोषात सापडला तरी जे तुम्ही आध्यात्मिक वृत्तीचे आहात ते तुम्ही अशाला सौम्य वृत्तीने ताळ्यावर आणा; तूही परीक्षेत पडू नयेस म्हणून स्वतःकडे लक्ष दे.
2एकमेकांची ओझी वाहा, म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल.
3कारण आपण कोणी नसता कोणीतरी आहोत अशी कल्पना करणारा स्वतःला फसवतो.
4तर प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या कामाची परीक्षा करावी म्हणजे त्याला दुसर्‍यांच्या संबंधाने नव्हे, तर केवळ स्वतःसंबंधाने अभिमान बाळगण्यास जागा मिळेल.
5कारण प्रत्येकाने आपला स्वतःचा भार वाहिलाच पाहिजे.
6ज्याला वचनाचे शिक्षण मिळाले आहे त्याने ते शिक्षण देणार्‍याला सर्व चांगल्या पदार्थांचा वाटा द्यावा.
7फसू नका; देवाचा उपहास व्हायचा नाही; कारण माणूस जे काही पेरतो त्याचेच त्याला पीक मिळेल.
8जो आपल्या देहस्वभावासाठी पेरतो त्याला देहस्वभावा-पासून नाशाचे पीक मिळेल; आणि जो आत्म्यासाठी पेरतो त्याला आत्म्यापासून सार्वकालिक जीवन हे पीक मिळेल.
9चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये; कारण आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल.
10तर मग जसा आपल्याला प्रसंग मिळेल त्याप्रमाणे आपण सर्वांचे व विशेषतः विश्वासाने एका घरचे झालेल्यांचे बरे करावे.
समाप्ती
11पाहा, मी आपल्या हाताने केवढ्या मोठ्या अक्षरांनी तुम्हांला लिहीत आहे.
12जितके दैहिक गोष्टींचा डौल मिरवू पाहतात, तितके ख्रिस्ताच्या वधस्तंभामुळे स्वत:चा छळ होऊ नये म्हणूनच तुम्हांला सुंता करून घेण्यास भाग पाडतात.
13कारण सुंता करून घेणारे स्वतःही नियमशास्त्र पाळत नाहीत, तर तुमच्या देहावरून नावाजून घेण्यासाठी तुमची सुंता व्हावी अशी इच्छा बाळगतात.
14आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या वधस्तंभाच्या अभिमानाशिवाय कशाचाही अभिमान बाळगणे माझ्या हातून न होवो; त्याच्या द्वारे जग मला वधस्तंभावर खिळलेले आहे व जगाला मी वधस्तंभावर खिळलेला आहे.
15कारण [ख्रिस्त येशूमध्ये]सुंता होण्यात किंवा न होण्यात काही नाही, तर नवी उत्पत्ती1 हीच काय ती होय.
16जितके ह्या नियमाने वागतील तितक्यांवर व देवाच्या इस्राएलावर शांती व दया असो.
17ह्यापुढे कोणी मला त्रास न देवो; कारण मी आपल्या शरीरावर प्रभू येशूच्या खुणा धारण करून आहे.
18बंधुजनहो, आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याची कृपा तुमच्या आत्म्याबरोबर असो. आमेन.

सध्या निवडलेले:

गलतीकरांस पत्र 6: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन