YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यशया 37

37
सन्हेरीबाच्या हातून यहूदाची सुटका
(२ राजे 19:1-37; २ इति. 32:20-23)
1हे ऐकून हिज्कीया राजा आपली वस्त्रे फाडून व गोणपाट नेसून परमेश्वराच्या मंदिरात गेला.
2तेव्हा खानगी कारभारी एल्याकीम, चिटणीस शेबना व याजकांपैकी वडील ह्यांना गोणपाट नेसलेले असे त्याने आमोजाचा पुत्र यशया संदेष्टा ह्याच्याकडे पाठवले.
3ते त्याला म्हणाले, “हिज्कीया असे म्हणतो की, ‘आजचा दिवस क्लेश, शिक्षा व अपमान ह्यांचा आहे, कारण मुले जन्मायला आली पण प्रसवण्याची शक्ती नाही.
4तुझा देव परमेश्वर कदाचित रब-शाके ह्याचे शब्द ऐकेल; त्याला त्याचा धनी अश्शूरचा राजा ह्याने जिवंत देवाचा उपमर्द करण्यास पाठवले आहे; आणि ते त्याचे शब्द ऐकून तुझा देव परमेश्वर त्यांचा निषेध करील; म्हणून जे काही शेष उरले आहे त्यांच्यासाठी तू रदबदली कर.”’
5ह्याप्रमाणे हिज्कीया राजाचे सेवक यशया ह्याच्याकडे आले.
6तेव्हा यशया त्यांना म्हणाला, “आपल्या धन्याला असे सांगा : ‘परमेश्वर म्हणतो, अश्शूरी राजाच्या सेवकांनी ज्या शब्दांनी माझा उपमर्द केला आहे ते शब्द तू ऐकले आहेत, त्यामुळे तू घाबरू नकोस.
7पाहा, मी त्याला अशी काही प्रेरणा देईन की तो कसली तरी अफवा ऐकून आपल्या देशास परत जाईल व आपल्याच देशात तो तलवारीने पडेल, असे मी करीन.”’
8नंतर रब-शाके परत गेला तेव्हा अश्शूरचा राजा लिब्ना नगराबरोबर लढताना त्याला आढळला; कारण लाखीशाहून राजाने तळ उठवला अशी त्याला खबर लागली होती.
9मग कूशाचा राजा तिर्‍हाका आपणांशी लढायला निघाला आहे असे कोणी बोलताना त्याने ऐकले. हे ऐकून त्याने हिज्कीयाला जासुदांच्या हाती सांगून पाठवले की,
10“तुम्ही यहूदाचा राजा हिज्कीया ह्याच्याकडे जाऊन सांगा, ‘ज्या तुझ्या देवावर तू भिस्त ठेवतोस तो, यरुशलेम अश्शूरी राजाच्या हाती लागणार नाही, असे बोलून तुला न फसवो.
11अश्शूरी राजांनी सर्व देशांचे काय केले ते पाहा! त्यांचा विध्वंस कसा केला हे तू ऐकले आहेच; तर तू सुटणार काय?
12गोजान, हारान, रेसफ व तलस्सार येथे राहणारे एदेनी लोक ह्यांचा माझ्या वाडवडिलांनी विध्वंस केला; त्यांचा त्या राष्ट्रांच्या देवांनी बचाव केला काय?
13हमाथाचा राजा, अर्पादाचा राजा, सफरवाईम शहर, हेना व इव्वा ह्यांचा राजा हे कोठे आहेत?”’
14हिज्कीयाने जासुदांच्या हातून ते पत्र घेऊन वाचले; मग हिज्कीयाने परमेश्वराच्या मंदिरात जाऊन ते परमेश्वरापुढे उघडून ठेवले.
15मग हिज्कीयाने परमेश्वराची अशी प्रार्थना केली :
16“सेनाधीश परमेश्वरा, इस्राएलाच्या देवा, करूबारूढ असलेल्या देवा, तूच काय तो पृथ्वीवरील सर्व राज्यांचा देव आहेस, तूच आकाश व पृथ्वी निर्माण केलीस.
17हे परमेश्वरा, कान लावून ऐक; हे परमेश्वरा, तू डोळे उघडून पाहा; आणि तुझा, सदाजीवी देवाचा उपमर्द करण्यासाठी सन्हेरीबाने निरोप पाठवला आहे. त्याचे सर्व शब्द ऐक.
18हे परमेश्वरा, खरोखर अश्शूरच्या राजांनी सर्व देश व त्यांतली जमीन ओसाड केली आहे,
19त्यांचे देव त्यांनी अग्नीत टाकले आहेत; कारण ते देव नव्हते, ते मनुष्यांच्या हातांनी घडलेले काष्ठपाषाण होते; म्हणून त्यांनी त्यांचा नाश केला.
20आता परमेश्वरा, आमच्या देवा, त्याच्या हातांतून आम्हांला सोडव, म्हणजे पृथ्वीवरील सर्व राज्ये जाणतील की तूच काय तो परमेश्वर आहेस.”
21तेव्हा आमोजाचा पुत्र यशया ह्याने हिज्कीयाला सांगून पाठवले की, “परमेश्वर इस्राएलाचा देव असे म्हणतो : ‘अश्शूरी राजा सन्हेरीब ह्याच्यासंबंधाने तू माझी प्रार्थना केली;
22तर त्याच्याविषयी परमेश्वर वचन बोलला आहे की, ‘सीयोनेची कुमारी तुला तुच्छ लेखते व तुझा उपहास करते; यरुशलेमेची कन्या तू पाठमोरा झालेला पाहून आपले मस्तक हलवते.
23तू कोणाची निंदा केलीस? कोणाच्या विरुद्ध दुर्भाषण केलेस? कोणाच्या विरुद्ध ताठ्याने बोललास? कोणावर आपल्या भुवया चढवल्यास? इस्राएलाचा जो पवित्र प्रभू त्याच्यावर?
24तू आपल्या सेवकांच्या द्वारे प्रभूची निंदा करून म्हणालास मी आपल्या बहुत रथांनिशी पर्वतांच्या माथ्यावर, लबानोनाच्या अगदी मध्यापर्यंत चढून आलो आहे; मी त्याचे उंच गंधसरू व निवडक देवदारू तोडून टाकीन; त्याच्या अत्यंत दूरच्या उच्च स्थानी त्याच्या फळझाडांच्या राईत प्रवेश करीन.
25मी जमीन खणून पाणी प्यालो; माझ्या पायांच्या तळव्यांनी मिसर देशाचे सर्व जलप्रवाह मी सुकवून टाकीन.
26तू ऐकलेस ना? मी हे फार पूर्वीच केले, अगदी प्राचीन काळी योजले असून आता असे घडवून आणले की तुझ्या हातून तटबंदीच्या नगरांचा विध्वंस व नासधूस व्हावी;
27म्हणून त्यांतील रहिवासी बलहीन झाले, ते भयभीत व फजीत झाले; शेतातील हिरवळ, हिरवे गवत, धाब्यांवरचे गवत, कोवळे शेत ह्यांसारखे ते झाले.
28तुझे बसणेउठणे, तुझे जाणेयेणे व तुझा माझ्यावरला संताप मला ठाऊक आहे.
29माझ्यावरल्या तुझ्या संतापामुळे व तुझा उन्मत्तपणा माझ्या कानावर आल्यामुळे मी तुझ्या नाकात माझी वेसण व तुझ्या तोंडात माझा लगाम घालून ज्या वाटेने तू आलास तिनेच तुला परत लावीन.’
30आता तुला हे चिन्ह देतो : यंदा तुम्ही आपोआप उगवलेले खाल, पुढल्या वर्षी त्याला खोडवा फुटेल तो खाल; तिसर्‍या वर्षी तुम्ही पेरा, कापा, द्राक्षांचे मळे लावा व त्यांचे फळ खा.
31यहूदाच्या घराण्यातील निभावलेला अवशेष पुन्हा खाली मूळ धरील व वर फळ देईल.
32कारण यरुशलेमेतून अवशेष निघेल व सीयोन डोंगरातून निभावलेले निघतील; सेनाधीश परमेश्वराचा आवेश हे सिद्धीस नेईल.
33म्हणून अश्शूराच्या राजाविषयी परमेश्वर म्हणतो, तो ह्या नगरापर्यंत येणार नाही; ह्यावर एकही बाण सोडणार नाही; तो ढाल घेऊन ह्याच्याशी सामना करणार नाही आणि ह्यावर मोर्चा रचणार नाही.
34ज्या वाटेने तो आला तिनेच तो परत जाईल; तो ह्या नगरापर्यंत येणार नाही; असे परमेश्वर म्हणतो.
35आपल्यासाठी व माझा सेवक दावीद ह्याच्यासाठी ह्या नगराचा बचाव होईल असे मी ह्याचे रक्षण करीन.”
36मग परमेश्वराच्या दिव्यदूताने जाऊन अश्शूरी गोटातल्या एक लक्ष पंचाऐंशी हजार लोकांना मारले; पहाटेस लोक उठून पाहतात तर सर्व प्रेतेच प्रेते!
37ह्याप्रमाणे अश्शूराचा राजा सन्हेरीब तळ उठवून माघारी चालता झाला आणि निनवेत जाऊन राहिला.
38तेव्हा असे झाले की तो आपले दैवत निस्रोख ह्याच्या देवळात पूजा करीत असता त्याचे पुत्र अद्रम्मेलेक व शरेसर ह्यांनी त्याला तलवारीने वधले व ते अरारात देशात पळून गेले. मग त्याच्या जागी त्याचा पुत्र एसर-हद्दोन राजा झाला.

सध्या निवडलेले:

यशया 37: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन