YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यिर्मया 51

51
बाबेलविषयी परमेश्वराचा निर्णय
1परमेश्वर म्हणतो, “पाहा, मी बाबेलवर व लेब-कामाईच्या1 रहिवाशांवर एका विध्वंसकाच्या मनास प्रवृत्त करीत आहे.
2मी बाबेलवर परदेशीय पाठवीन; ते त्याला उफणतील व त्याचा देश उजाड करतील; कारण ते संकटसमयी त्याला चोहोकडून घेरतील.
3धनुर्धार्‍याने धनुष्य वाकवू नये, चिलखत घालून त्याने उभे राहू नये; त्याच्या तरुणांवर दया करू नका; त्याच्या सर्व सैन्याचा विध्वंस करा;
4म्हणजे खास्द्यांच्या देशात लोक वध पावून पडतील, त्याच्या आळ्यांतून विंधलेले पडतील.
5कारण जरी इस्राएलाच्या पवित्र प्रभूविरुद्ध केलेल्या अपराधांनी त्याचा देश भरून गेला आहे, तरी इस्राएलास व यहूदास त्यांचा देव, सेनाधीश परमेश्वर ह्याने सोडले नाही.
6बाबेलातून पळून जा, तुम्ही आपापले जीव वाचवा; त्याच्या दुष्कर्मामुळे तुम्ही आपला नाश करून घेऊ नका; कारण हा परमेश्वराचा सूड घेण्याचा समय आहे; त्याच्या करणीचे तो त्याला प्रतिफळ देत आहे.
7बाबेल परमेश्वराच्या हातातला सर्व पृथ्वीस मस्त करणारा सोनेरी पेला होता; राष्ट्रे त्याचा द्राक्षारस प्याली म्हणून ती वेडी झाली आहेत.
8बाबेल एकाएकी पडून भंगला आहे; त्याबद्दल हायहाय करा; त्याच्या जखमेसाठी मलम घेऊन जा, त्याला गुण येईल.
9आम्ही बाबेलास बरे करण्याचा प्रयत्न केला, पण तो बरा झाला नाही; त्याला सोडून द्या; चला, आपण सर्व आपापल्या देशाला जाऊ; कारण त्याचा गुन्हा गगनापर्यंत पोहचला आहे, आकाशापर्यंत चढला आहे.
10परमेश्वराने आमची नीतिमत्ता प्रसिद्ध केली आहे; चला, परमेश्वर आमचा देव ह्याचे कार्य आपण सीयोनात विदित करू.
11बाण पाजवा! ढाली धारण करा! परमेश्वराने मेद्यांच्या राजांना स्फूर्ती दिली आहे, नाश करावा अशी त्याच्याविरुद्ध त्याची योजना आहे; कारण हा परमेश्वराकडून सूड आहे, त्याच्या मंदिराविषयीचा सूड आहे.
12बाबेलच्या कोटांसमोर ध्वज उभारा; पहारा मजबूत करा, पहारेकरी ठेवा; छापा घालण्याची तयारी करा; कारण परमेश्वर बाबेलच्या रहिवाशांविरुद्ध जे बोलला त्याची योजना करून ते त्याने सिद्धीसही नेले आहे.
13हे बहुत जलप्रवाहाजवळ राहणार्‍या, समृद्ध भांडारे असलेल्या, तुझा अंतसमय आला आहे, तुझ्या मिळकतीस आळा बसला आहे.
14सेनाधीश परमेश्वर आपल्या जीविताची शपथ वाहून म्हणाला आहे, मी तुझ्यात टोळांप्रमाणे माणसे भरीन; ते तुझ्याविरुद्ध गर्जना करतील.
15त्याने पृथ्वी आपल्या सामर्थ्याने उत्पन्न केली, त्याने आपल्या ज्ञानाने विश्व स्थापले, आपल्या बुद्धीने आकाश पसरले.
16तो आपला शब्द उच्चारतो, तेव्हा आकाशात पाण्याचा गडगडाट होतो; तो पृथ्वीच्या दिगंतापासून वाफेचे लोट वर चढवतो. तो पावसासाठी विजा सिद्ध करतो; व आपल्या भांडारांतून वायू बाहेर काढतो.
17प्रत्येक मनुष्य पशुतुल्य व ज्ञानशून्य झाला आहे; प्रत्येक मूर्तिकार मूर्तीमुळे लज्जित झाला आहे; त्याने ओतलेली मूर्ती प्रत्यक्ष लबाडीच आहे; त्यांच्यात मुळीच प्राण नाही.
18त्या शून्यरूप असून, उपहासाला पात्र अशा वस्तू होत; त्यांचा समाचार घेतेवेळी त्या नष्ट होतात.
19जो याकोबाचा वाटा तो त्यांच्यासारखा नव्हे, तर तो सर्वांचा निर्माणकर्ता आहे, इस्राएल त्याच्या वतनाचा वंश आहे; सेनाधीश परमेश्वर हे त्याचे नाम आहे.
20तू माझा परशू आहेस, तू माझी युद्धशस्त्रे आहेस; तुझ्या द्वारे मी राष्ट्रे मोडून त्यांचे तुकडे तुकडे करीन; तुझ्या द्वारे राज्ये नष्ट करीन.
21तुझ्या द्वारे मी घोडा व स्वार ह्यांचे तुकडे तुकडे करीन;
22तुझ्या द्वारे मी रथ व सारथी ह्यांचे तुकडे तुकडे करीन; तुझ्या द्वारे मी नरनारींचे तुकडे तुकडे करीन; तुझ्या द्वारे मी वृद्ध व तरुण ह्यांचे तुकडे तुकडे करीन आणि तुझ्या द्वारे मी तरुण व तरुणी ह्यांचे तुकडे तुकडे करीन;
23तुझ्या द्वारे मी मेंढपाळ व त्याचा कळप ह्यांचे तुकडे तुकडे करीन; तुझ्या द्वारे शेतकरी व त्याच्या बैलांची जोडी ह्यांचे तुकडे तुकडे करीन; आणि तुझ्या द्वारे मी अधिपतींचे व नायब अधिपतींचे तुकडे तुकडे करीन.
24बाबेल व खास्दी देशाचे सर्व रहिवासी ह्यांनी तुमच्यादेखत जो सर्व अनर्थ सीयोनेत केला आहे त्यांचे मी उसने फेडीन, असे परमेश्वर म्हणतो.
25हे सर्व पृथ्वीचा नाश करणार्‍या विध्वंसगिरी, पाहा, परमेश्वर म्हणतो, मी तुझ्याविरुद्ध आहे; मी आपला हात तुझ्यावर उगारीन, तुझा कडेलोट करीन, जळून कोळ झालेल्या पर्वतासमान मी तुला करीन.
26तुझ्यातला दगड कोपर्‍यासाठी अथवा पायासाठी कोणी घेणार नाही; तर तू कायमचाच उजाड होशील असे परमेश्वर म्हणतो.
27पृथ्वीवर ध्वज उभारा, राष्ट्रांमध्ये रणशिंग वाजवा, त्याच्याविरुद्ध राष्ट्रे सिद्ध करा, अराराट, मिन्नी व आष्कनाज ह्या राज्यांना त्याच्यावर चढाई करण्यास बोलवा; त्याच्याविरुद्ध सेनापतींची नेमणूक करा; विक्राळ टोळांप्रमाणे घोडे येऊ द्या.
28त्याच्याविरुद्ध राष्ट्रे सज्ज करा, मेद्यांचे राजे, त्यांचे अधिपती, त्यांचे सर्व नायब अधिपती व राजाच्या सत्तेतील सर्व देश सज्ज करा.
29पृथ्वी कापत आहे, वेदना पावत आहे; कारण बाबेल देश उजाड, निर्जन करण्याचे परमेश्वराचे संकेत पूर्ण होत आहेत.
30बाबेलचे वीर लढाई करायचे थांबले आहेत, ते आपल्या दुर्गात बसून राहिले आहेत; त्यांचे बल खुंटले आहे. ते केवळ स्त्रिया बनले आहेत; त्याच्या वस्तीस आग लावली आहे; त्याचे अडसर मोडले आहेत.
31बाबेलच्या राजाचे नगर सर्वस्वी हस्तगत झाले हे त्याला कळवण्यास एकामागे एक हलकारे, एकामागे एक निरोपे धावत आहेत.
32नदीचे उतार हस्तगत झाले आहेत, लढवय्ये फजीत झाले आहेत, असे ते सांगत आहेत.
33कारण सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव असे म्हणतो, धान्य मळण्याच्या वेळी खळे असते तशी बाबेलकन्या आहे; अजून थोडा अवधी आहे म्हणजे मग तिचा हंगाम येईल.
34बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर ह्याने मला खाऊन टाकले आहे, त्याने मला दळून टाकले आहे, त्याने मला रिकामे पात्र करून ठेवले आहे, त्याने मला अजगराप्रमाणे गिळले आहे. त्याने आपले पोट माझ्या पक्‍वानांनी भरले आहे; त्याने मला बाहेर फेकून दिले आहे.
35सीयोननिवासिनी म्हणो, ‘माझ्यावर व माझ्या शरीरावर केलेला जुलूम बाबेलवर उलटो;’ व यरुशलेम म्हणो, ‘माझ्या रक्तपाताचा दोष खास्दी देशाच्या रहिवाशांवर असो.’
36ह्यामुळे परमेश्वर असे म्हणतो, ‘पाहा, मी तुझ्या पक्षाने लढेन, तुझ्याकरता सूड उगवीन; मी त्याचा सागर आटवीन, त्याचा झरा सुकवीन.
37बाबेल नासाडीचा ढिगार, कोल्ह्यांचे वसतिस्थान, विस्मय, व उपहास ह्यांचा विषय आणि निर्जन स्थळ असा होईल.
38ते जमून तरुण सिंहाप्रमाणे गर्जना करतात; सिंहिणींच्या पेट्यांप्रमाणे ते गुरगुरतात.
39ते घामाघूम झाले म्हणजे मी त्यांच्यासाठी मेजवानी सिद्ध करीन, त्यांना मस्त करीन, म्हणजे त्यांना हर्षभ्रम होऊन ते कायमचे निद्रावश होतील, उठायचे नाहीत, असे परमेश्वर म्हणतो.
40कोकरांप्रमाणे, एडके व बोकड ह्यांच्याप्रमाणे मी त्यांना वधण्यास घेऊन जाईन.
41शेशख1 कसे हस्तगत झाले आहे! सर्व जगाच्या प्रशंसेचा विषय परहाती कसा गेला आहे! राष्ट्रांना बाबेल कसा विस्मयावह झाला आहे!
42समुद्र बाबेलवर लोटला आहे; त्याच्या लाटांच्या समुदायाने तो झाकून गेला आहे.
43त्याची नगरे ओस पडली आहेत. त्यांतला प्रदेश निर्जल झाला आहे, तेथली भूमी रुक्ष झाली आहे, तेथे मनुष्यवस्ती नाही, व त्यातून कोणी मानवपुत्र येत-जात नाहीत.
44मी बेल दैवताचा बाबेलात समाचार घेईन, त्याने गिळले ते त्याच्या तोंडावाटे मी काढीन, राष्ट्रांचा ओघ त्याच्याकडे वाहणार नाही; बाबेलचा तटही पडेल.
45माझ्या लोकांनो, तुम्ही त्यांच्यातून निघून जा! परमेश्वराच्या संतप्त क्रोधापासून तुम्ही प्रत्येक जण आपला बचाव करा.
46देशात ऐकलेल्या अफवेने तुम्ही आपले मन खचू देऊन घाबरू नका; एक अफवा एका वर्षी व दुसरी दुसर्‍या वर्षी पसरेल; देशात जुलूम होईल, अधिपती अधिपतीवर उठेल.
47ह्यास्तव पाहा, असे दिवस येत आहेत की त्यांत मी बाबेलच्या कोरीव मूर्तींचा समाचार घेईन; त्याचा सर्व प्रदेश लज्जित होईल, त्याचे सर्व लोक त्याच्यात ठार होऊन पडतील.
48आकाश व पृथ्वी आणि त्यांतील सर्वकाही बाबेलवर जयजयकार करतील; कारण त्याचा विध्वंस करणारे उत्तरेकडून येत आहेत असे परमेश्वर म्हणतो.
49बाबेलने जसे इस्राएलाचे वधण्यात आलेले लोक पाडले, तसे बाबेलात सर्व पृथ्वीवरचे वधण्यात आलेले लोक पाडण्यात येतील.
50जे तुम्ही तलवारीपासून निभावला आहात ते तुम्ही निघून जा, थांबू नका! दुरून परमेश्वराचे स्मरण करा, यरुशलेम आपल्या मनात वागवा.
51‘निंदा आमच्या कानी पडली म्हणून आम्ही लज्जित झालो आहोत; परमेश्वराच्या मंदिरातल्या पवित्रस्थानात परके आले आहेत; म्हणून लज्जेने आमची मुखे व्याप्त झाली आहेत.’
52ह्यास्तव परमेश्वर म्हणतो, पाहा, असे दिवस येत आहेत की त्यांत मी तिच्या कोरीव मूर्तीचा समाचार घेईन, तिच्या सर्व देशभर घायाळ झालेले कण्हत पडतील.
53बाबेल गगनापर्यंत उन्नत झाला असला, त्याने आपल्या उंच गढ्या अजिंक्य केल्या असल्या तरी माझ्याकडून त्याचा नाश करणारे येतील, असे परमेश्वर म्हणतो.
54बाबेलात आरोळीचा ध्वनी येत आहे! खास्द्यांच्या देशातून विध्वंसाचा गोंगाट होत आहे!
55कारण परमेश्वर बाबेलास उजाड करीत आहे, त्याच्यातला कलकलाट नाहीसा करीत आहे; त्यांच्या शब्दलहरींचा ध्वनी महासागराच्या गर्जनेसारखा आहे; त्यांच्या गोंगाटाचा ध्वनी होत आहे;
56कारण त्याच्यावर म्हणजे बाबेलवर विध्वंस करणारे आले आहेत, त्याचे वीर कैद झाले आहेत; त्यांची धनुष्ये भंग पावली आहेत; कारण परमेश्वर सूड घेणारा देव आहे, तो खातरीने प्रतिफळ देईल.
57मी त्याचे सरदार, त्याचे ज्ञानी, त्याचे अधिपती व नायब अधिपती, आणि त्याचे वीर ह्यांना मस्त करीन; ते कायमचे निद्रावश होतील, ते उठायचे नाहीत, असे सेनाधीश परमेश्वर, हे नाम धारण करणारा राजेश्वर म्हणतो.
58सेनाधीश परमेश्वर म्हणतो, बाबेलचे रुंद तट समूळ पाडतील, त्याच्या उंच वेशी अग्नीने भस्म होतील; अशी राष्ट्रांच्या श्रमाची फलप्राप्ती शून्यवत होईल, राष्ट्रांचे श्रमफळ हे अग्नीला भक्ष्य होईल, ते व्यर्थ शिणतील.”
59यहूदाचा राजा सिद्कीया आपल्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी बाबेलास गेला, त्याच्याबरोबर सराया बिन नेरीया बिन मासेया गेला होता. त्याला यिर्मया संदेष्ट्याने जे आज्ञावचन सांगितले ते हे. सराया बिनीवाला सरदार होता.
60बाबेलवर जे सर्व अरिष्ट येणार होते ते म्हणजे बाबेलविरुद्ध जी वचने लिहिण्यात आली होती ती यिर्मयाने एका ग्रंथात लिहून ठेवली होती.
61यिर्मया सरायास म्हणाला, “तू बाबेलास पोहचलास म्हणजे ही सर्व वचने अवश्य वाच;
62आणि म्हण, ‘हे परमेश्वरा, तू ह्या स्थानाविषयी म्हणाला आहेस की ते नष्ट होईल, त्यात कोणी मनुष्य अथवा पशू राहणार नाही, ते कायमचे ओसाड होईल.’
63मग तू हा ग्रंथ वाचण्याचे संपवल्यावर त्याला एक धोंडा बांधून फरात नदीत तो फेकून दे;
64असे करून म्हण की, ‘ह्याच प्रकारे मी बाबेलवर जे अरिष्ट आणणार त्यामुळे तो बुडेल, वर येणार नाही; ते व्यर्थ शिणतील.”’ येथवर यिर्मयाची वचने आहेत.

सध्या निवडलेले:

यिर्मया 51: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन