YouVersion लोगो
सर्च आयकॉन

योना 3

3
निनवेचा पश्‍चात्ताप
1परमेश्वराचे वचन दुसर्‍यांदा योनाला प्राप्त झाले की,
2“ऊठ; त्या मोठ्या निनवे शहरास जा व मी तुला सांगेन तो संदेश त्याला आरोळी करून सांग.”
3तेव्हा योना उठून परमेश्वराच्या वचनाप्रमाणे निनवेस गेला. निनवे हे देवाच्या दृष्टीने मोठे शहर होते. ते सगळे फिरून येण्यास तीन दिवस लागत.
4योना त्यातून एक दिवसाची वाट चालत असता ओरडत गेला की, “चाळीस दिवसांचा अवकाश आहे, मग निनवे धुळीस मिळेल.”
5तेव्हा निनवेतील लोकांनी देवावर विश्वास ठेवला, त्यांनी उपास नेमला आणि श्रेष्ठापासून कनिष्ठांपर्यंत सर्व गोणताट नेसले.
6निनवेच्या राजाला हे वर्तमान समजले तेव्हा तो आपल्या आसनावरून उठला व आपल्या अंगातला झगा काढून गोणताट नेसून राखेत बसला.
7त्याने जाहीरनामा काढून आपला व सरदारांचा असा ठराव निनवेभर प्रसिद्ध केला की, “कोणा माणसाने, पशूने, गुराढोरांनी व शेरडामेंढरांनी काही चाखू नये, खाऊ नये, पाणी पिऊ नये.
8तर मनुष्याने व पशूने गोणताट नेसावे, देवाचा मोठ्याने धावा करावा आणि प्रत्येकाने आपल्या कुमार्गापासून आपल्या हातच्या जुलूमापासून मागे फिरावे.
9देव कदाचित वळेल व अनुताप पावेल आणि आपल्या संतप्त क्रोधापासून परावृत्त होईल, म्हणजे आपला नाश होणार नाही.”
10देवाने त्यांचे वर्तन पाहिले म्हणजे अर्थात ते आपल्या कुमार्गापासून वळले आहेत हे पाहिले; तेव्हा ‘त्यांच्यावर अरिष्ट आणीन’ असे जे तो म्हणाला होता त्याविषयी तो अनुताप पावला आणि त्याने त्यांच्यावर ते आणले नाही.

सध्या निवडलेले:

योना 3: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन