YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मीखा 7

7
इस्राएलाचा नैतिक अध:पात
1कोण ही माझी विपत्ती! उन्हाळ्यातील फळे काढून घेतल्यावर जशी झाडावर काही राहतात, द्राक्षीच्या वेलीवर जसा सरवा राहतो, तसा मी झालो आहे; खायला द्राक्षांचा एक घोसही राहिला नाही; माझ्या जिवाला आवडेल असा पहिल्या बाराचा अंजीर राहिला नाही.
2भक्त पृथ्वीवर नाहीसा झाला आहे; माणसांत कोणी सरळ उरला नाही; ते सर्व रक्तपात करण्यास टपले आहेत, प्रत्येक जण जाळे टाकून आपल्या भावाची पारध करतो.
3दुष्कर्म जोमाने करावे म्हणून ते आपले दोन्ही हात चालवतात; सरदार फर्मावतो ते न्यायाधीश लाच घेऊन करतो; वेडा मनुष्य आपल्या मनातील दुष्ट भाव बोलून दाखवतो; असे ते सर्व मिळून दुष्टतेचे जाळे विणतात.
4त्यांच्यातला जो उत्तम तो काटेरी झुडपासारखा आहे; त्यांच्यातला जो सरळ तो काटेरी कुंपणाहून वाईट आहे; तुझ्या टेहळणी करणार्‍यांनी टेहळलेला दिवस, तुझी झडती घेण्याचा दिवस येत आहे; आता त्यांची त्रेधा उडेल.
5सोबत्याचा भरवसा धरू नकोस, जिवलग मित्रावर अवलंबून राहू नकोस, तुझ्या उराजवळ निजणार्‍या तुझ्या पत्नीपासून आपले तोंड आवरून धर.
6कारण पुत्र बापाला तुच्छ मानत आहे, मुलगी आपल्या आईवर उठली आहे, सून आपल्या सासूवर उठली आहे; मनुष्याच्या घरचे इसम त्याचे वैरी झाले आहेत.
परमेश्वर प्रकाश पाडतो व सुटका करतो
7मी तर परमेश्वराची मार्गप्रतीक्षा करीन. मी आपल्या तारण करणार्‍या देवाची वाट पाहत राहीन; माझा देव माझे ऐकेल.
8अगे माझ्या वैरिणी, माझ्यामुळे आनंद करू नकोस; मी पडले, तरी पुन्हा उठेन; मी अंधारात बसले, तरी परमेश्वर मला प्रकाश असा होईल.
9परमेश्वर माझा तंटा लढून माझा हक्क संपादन करील, तोपर्यंत मी त्याचा राग सहन करीन; कारण मी त्याच्याविरुद्ध पाप केले आहे; मला तो प्रकाशात नेईल, मी त्याचे न्यायीपण पाहीन.
10जी मला म्हणाली होती की, “तुझा देव परमेश्वर कोठे आहे?” ती माझी वैरीण ते पाहील व ती लज्जेने व्याप्त होईल; माझे डोळे तिला पाहतील, तिला रस्त्यांतल्या चिखलासारखे तुडवतील.
11तुझे तट बांधण्याचा समय आला आहे. त्या दिवशी तुझ्या सीमा रुंद होतील.
12त्या दिवशी अश्शूर देशातून, मिसर देशातील नगरांतून, मिसर देशापासून फरात नदीपर्यंतच्या प्रांतांतून, दूरदूरच्या समुद्रतीरांहून व दूरदूरच्या पर्वतांवरून लोक तुझ्याकडे येतील.
13तथापि देश, आपल्या रहिवाशांमुळे, त्यांच्या कृत्यांच्या फळामुळे वैराण होईल.
परमेश्वराची इस्राएलावर करुणा
14तू आकडी घेऊन आपल्या लोकांना चार; तुझ्या वतनातील मेंढरे कर्मेलाच्या झाडीत एकान्ती राहतात त्यांना चार; प्राचीन काळच्या दिवसांप्रमाणे बाशानात व गिलादात त्यांना चरू दे.
15तू मिसर देशातून बाहेर निघालास त्या दिवसांप्रमाणे त्याला मी अद्भुत कृत्ये दाखवीन.
16राष्ट्रे हे पाहतील व आपले एकंदर बल पाहून लज्जित होतील, ती आपल्या तोंडावर हात ठेवतील, त्यांचे कान बहिरे होतील.
17ती सर्पाप्रमाणे धूळ चाटतील, पृथ्वीवरील सरपटणार्‍या प्राण्यांप्रमाणे ती आपल्या विवरांतून थरथर कापत बाहेर येतील, परमेश्वर आमचा देव ह्याच्याकडे ती भयकंपित होऊन येतील; ती तुझ्यापुढे भयभीत होतील.
18तुझ्यासमान देव कोण आहे? तू अधर्माची क्षमा करतोस, आपल्या वतनाच्या अवशेषाचे अपराध मागे टाकतोस; तो आपला राग सर्वकाळ मनात ठेवणार नाही, कारण त्याला दया करण्यात आनंद वाटतो.
19तो वळून पुन्हा आमच्यावर दया करील; आमचे अपराध पायांखाली तुडवील; तू त्यांची सर्व पापे समुद्राच्या डोहात टाकशील.
20प्राचीन काळापासून तू आमच्या वडिलांना शपथपूर्वक सांगितल्याप्रमाणे याकोबाबरोबर सत्यतेने व अब्राहामाबरोबर वात्सल्याने वर्तशील.

सध्या निवडलेले:

मीखा 7: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन