YouVersion लोगो
सर्च आयकॉन

नीतिसूत्रे 23

23
1अधिपतीबरोबर भोजनास बसतोस तेव्हा तुझ्यापुढे कोण आहे ह्याचा पूर्ण विचार कर;
2तू खादाड असलास तर आपल्या गळ्याला सुरी लाव.
3त्याच्या मिष्टान्नांची इच्छा करू नकोस; ती कपटाची खाद्ये आहेत.
4धनवान होण्यासाठी धडपड करू नकोस; आपले चातुर्य एकीकडे ठेव.
5जे पाहता पाहता नाहीसे होते त्याकडे तू नजर लावावीस काय? कारण गगनात उडणार्‍या गरुडासारखे पंख धन आपणास लावते.
6दुष्टदृष्टी मनुष्याचे अन्न खाऊ नकोस. त्याच्या मिष्टान्नाची इच्छा करू नकोस;
7कारण तो आपल्या मनात घास मोजणार्‍यासारखा आहे, तो तुला “खा, पी” म्हणतो, पण त्याचे मन तुझ्यावर नाही.
8गिळलेला घास तू ओकून टाकशील, तुझे गोड बोलणे व्यर्थ होईल,
9मूर्खाच्या कानात काही सांगू नकोस तुझे शहाणपणाचे बोल तो तुच्छ मानील.
10जुनी मेर सारू नकोस; अनाथांच्या शेतात शिरू नकोस;
11कारण त्यांचा कैवारी समर्थ आहे; तो त्यांचा कैवार घेऊन तुझ्याविरुद्ध होईल.
12तू आपले मन शिक्षणाकडे आणि आपले कान ज्ञानाच्या वचनाकडे लाव.
13मुलास शिक्षा करण्यास अनमान करू नकोस, कारण त्याला छडी मारल्याने तो मरणार नाही.
14तू त्याला छडी मार आणि अधोलोकापासून त्याचा जीव वाचव.
15माझ्या मुला, तुझे चित्त सुज्ञ असले तर माझ्या, माझ्याच चित्ताला आनंद होईल;
16तुझ्या वाणीतून यथार्थ बोल निघाल्यास माझे अंतर्याम उल्लासेल.
17पातक्यांचा हेवा करू नकोस तर परमेश्वराचे भय अहर्निश बाळग;
18कारण पारितोषिक निश्‍चये मिळणार; तुझी आशा नष्ट होणार नाही.
19माझ्या मुला, तू ऐकून शहाणा हो व आपले मन सरळ मार्गात राख.
20मद्यपी व मांसाचे अतिभक्षण करणारे ह्यांच्या वार्‍यास उभा राहू नकोस;
21कारण मद्यपी व खादाड दरिद्री होतात, कैफ मनुष्याला चिंध्या नेसवतो,
22तू आपल्या जन्मदात्या बापाचे ऐक, आपल्या वृद्ध झालेल्या आईला तू तुच्छ मानू नकोस.
23सत्य, सुज्ञता, शिक्षण व समंजसपणा ही विकत घे, विकू नकोस.
24नीतिमानाचा बाप फार उल्लासतो; सुज्ञ मुलास जन्म देतो तो त्याच्याविषयी आनंद पावतो.
25तुझी मातापितरे आनंद पावोत, तुझी जन्मदात्री हर्ष पावो,
26माझ्या मुला, तू आपले चित्त मला दे, माझे मार्ग तुझ्या दृष्टीला आनंद देवोत.
27वेश्या खोल खाचेसारखी आहे; परस्त्री अरुंद कूपासारखी आहे.
28ती लुटारूसारखी टपून राहते. आणि माणसांतील विश्वासघातक्यांची संख्या वाढवते.
29हाय हाय कोण म्हणतो? अरे अरे कोण करतो? भांडणतंट्यात कोण पडतो? गार्‍हाणी कोण सांगतो? विनाकारण घाय कोणास होतात? धुंदी कोणाच्या डोळ्यांत असते?
30जे फार वेळपर्यंत द्राक्षारस पीत राहतात, जे मिश्रमद्याचा पूर्ण आस्वाद घेण्यास जातात त्यांच्या.
31द्राक्षारस कसा तांबडा दिसतो, प्याल्यात कसा चमकतो, घशातून खाली कसा सहज उतरतो हे पाहत बसू नकोस.
32शेवटी तो सर्पासारखा दंश करतो, फुरशाप्रमाणे झोंबतो.
33तुझे डोळे विलक्षण प्रकार पाहतील; तुझ्या मनातून विपरीत गोष्टी बाहेर पडतील;
34समुद्रामध्ये आडवा पडलेल्यासारखी, डोलकाठीच्या माथ्यावर आडवा पडलेल्यासारखी तुझी स्थिती होईल.
35तू म्हणशील, “त्यांनी मला ताडन केले तरी माझे काही दुखले नाही, त्यांनी मला मारले तरी मला काही लागले नाही; मी शुद्धीवर केव्हा येईन? मी पुन्हा त्याचे सेवन करीन.”

सध्या निवडलेले:

नीतिसूत्रे 23: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन