YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 शमु. 11

11
शौल अम्मोन्यांचा पराभव करतो
1मग नाहाश अम्मोनी याने जाऊन याबेश-गिलादास वेढा घातला. तेव्हा याबेशांतल्या सर्व मनुष्यांनी नाहाशाला म्हटले, “आम्हाशी करार कर म्हणजे आम्ही तुझी सेवा करू.” 2तेव्हा नाहाश अम्मोनी त्यांना म्हणाला, “मी तुम्हाशी अशा अटीवर करार करीन की, मी तुम्हातील प्रत्येकाचा उजवा डोळा फोडून सर्व इस्राएलाची मानहानी करीन.” 3तेव्हा याबेशच्या वडिल जनांनी त्यास म्हटले, “आम्हांला सात दिवसाचा अवकाश दे, म्हणजे इस्राएलाच्या सर्व प्रातांत आम्ही दूत पाठवू. मग जर आम्हास सोडवायला कोणी येत नसला, तर आम्ही बाहेर तुझ्याकडे येऊ.” 4आणि त्या दूतांनी शौलाच्या गिब्याकडे येऊन या गोष्टी लोकांच्या कानावर घातल्या; तेव्हा सर्व लोक मोठ्याने आवाज काढून रडू लागले. 5आणि पाहा शौल शेतातून गाईबैलांच्या मागून चालत येत होता. शौल म्हणाला, “लोकांस काय झाले? म्हणून ते रडत आहेत?” तेव्हा त्यांनी त्यास याबेशातील माणसे काय म्हणाली ते सांगितले. 6तेव्हा शौलाने या गोष्टी ऐकल्यावर देवाचा आत्मा जोराने त्याच्यावर आला आणि त्याचा राग फारच भडकला. 7मग बैलांची जोडी घेऊन त्याने त्यांचे तुकडे तुकडे केले आणि दूतांच्या हातून ते इस्राएलाच्या सर्व प्रांतात पाठवून सांगितले की, “जो कोणी शौलामागे व शमुवेलाच्यामागे येत नाही त्याच्या बैलांना असे करण्यात येईल.” तेव्हा परमेश्वराचे भय लोकांवर पडले व ते एक मनाचे होऊन एकत्र होऊन निघाले. 8मग जेव्हा त्याने बेजेकात त्यांची नोंद केली, तेव्हा इस्राएलाचे लोक तीन लाख होते, आणि यहूदाचे लोक तीस हजार होते. 9तेव्हा जे दूत आले होते त्यांना त्यांनी म्हटले, “याबेश-गिलादाच्या मनुष्यांना असे सांगा की, उद्या सूर्य तापेल तेव्हा तुमची सुटका होईल.” मग दूतांनी जाऊन याबेशाच्या मनुष्यांना तसे सांगितले; तेव्हा ते आनंदीत झाले. 10मग याबेशांतील माणसे नाहाशाला म्हणाली, “उद्या आम्ही बाहेर तुम्हाकडे येऊ तेव्हा तुम्हास बरे दिसेल तसे आमचे करा.” 11मग सकाळी असे झाले की शौलाने लोकांच्या तीन टोळ्या केल्या आणि त्यांनी पहाटेच्या प्रहरी छावणीमध्ये येऊन दिवस तापे पर्यंत अम्मोन्यांवर हल्ला केला आणि त्यांचा पराभव केला. आणि असे झाले की, जे उरले त्यातले दोन देखील एकत्र एका ठिकाणी राहिले नाहीत, जे वाचले त्यांची पांगापांग झाली. 12मग लोक शमुवेलाला म्हणाले, “शौल आम्हावर राज्य करील काय? असे जे बोलले ते कोण आहेत? ती माणसे काढून दे, म्हणजे आम्ही त्याना जिवे मारू.” 13तेव्हा शौल बोलला, “आज कोणाही मनुष्यास जिवे मारायचे नाही कारण आज परमेश्वराने इस्राएलास सोडवले आहे.” 14तेव्हा शमुवेलाने लोकांस म्हटले, “चला आपण गिलगालास जाऊन तेथे नव्याने राज्य स्थापन करू.” 15मग सर्व लोक गिलगालास गेले आणि गिलगालात त्यांनी परमेश्वराच्यासमोर शौलाला राजा केले आणि तेथे परमेश्वराच्यासमोर त्यांनी शांत्यर्पणांचे यज्ञ अर्पण केले; तेव्हा तेथे शौल व इस्राएलाची सर्व माणसे यांना फार आनंद झाला.

सध्या निवडलेले:

1 शमु. 11: IRVMar

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन