1 शमु. 17
17
दावीद गल्याथाचा वध करतो
1तेव्हा पलिष्ट्यांनी आपले सैन्य लढाईसाठी एकवट केले. यहूदीयातील सोखो येथे एकत्र होऊन त्यांनी सोखो व अजेका यामध्ये अफस-दम्मीमात आपली छावणी दिली. 2मग शौल व इस्राएलाची माणसे एकत्र मिळाली आणि त्यांनी एलाच्या खोऱ्यात छावणी करून पलिष्ट्यांशी लढण्यास सैन्यरचना केली. 3तेव्हा पलिष्टी लोक एका बाजूस डोंगरावर उभे राहिले आणि इस्राएली दुसऱ्या बाजूस डोंगरावर उभे राहिले आणि त्यांच्यामध्ये खोरे होते. 4गथ या ठिकाणचा गल्याथ नावाचा एक युद्धवीर पलिष्ट्यांच्या छावणीतून निघाला. त्याची उंची सहा हात व एक वित अशी होती. 5त्याच्या डोक्यावर पितळी टोप होता आणि त्याने खवलाचे चिलखत घातलेले होते आणि त्या चीलखताचे वजन तर पाच हजार पितळ्याचे शेकेल असे होते. 6त्याच्या पायांत पितळी मोजे होते आणि खांद्यावर पितळ्याची बरची होती. 7त्याच्या भाल्याची काठी साळ्याच्या तुरीसारखी होती. आणि त्याच्या भाल्याचे पाते सहाशे लोखंडाचे शेकेल असे होते. त्याच्या पुढे एक ढालवाहणारा चालला होता. 8तेव्हा तो उभा राहिला आणि इस्राएलच्या सैन्यास हाक मारून त्यास म्हणाला, “तुम्ही लढाई कारायास का निघाला आहा? मी पलिष्टी आहे, आणि तुम्ही शौलाचे चाकर ना? तुम्ही आपल्या मधून एक पुरुष निवडा आणि तो माझ्याकडे उतरून येवो. 9जर माझ्याशी लढाई करून त्याने मला जीवे मारले तर आम्ही तुमचे चाकर होऊ. परंतु जर मी त्यास जीवे मारले तर तुम्ही आमचे दास होऊन आमची चाकरी करावी.” 10आणखी तो पलिष्टी म्हणाला, “मी आज इस्राएलाच्या सैन्याची निंदा करितो मला एक पुरुष द्या म्हणजे आम्ही एकमेकांशी लढू.” 11जेव्हा शौलाने व सर्व इस्राएलाने त्या पलिष्ट्यांचे हे शब्द ऐकले तेव्हा ते घाबरे होऊन फार भ्याले. 12त्या वेळी दावीद हा यहूदाच्या बेथलेहेमच्या एफ्राथी इशाय नामे मनुष्याचा पुत्र होता; त्या मनुष्यास तर आठ पुत्र होते आणि शौलाच्या दिवसात तो म्हातारा झाला होता. 13इशायाचे तीन जेष्ठ पुत्र शौलाच्या मागे लढाईला गेले आणि त्यांची नावे ही; पहिला अलीयाब व दुसऱ्याचे अबीनादाब व तिसऱ्याचे शम्मा. 14दावीद तर धाकटा होता आणि तीन वडील पुत्र शौलामागे गेले होते. 15दावीद शौलापासून बेथेलहेमास आपल्या बापाची मेंढरे राखावयास जात येत असे. 16तो पलिष्टी चाळीस दिवस सकाळी व सायंकाळी लढाईसाठी जवळ येऊन उभा राही. 17इशायाने आपला पुत्र दावीद ह्याला म्हटले की, “तुझ्या भावांसाठी एक माप भाजलेले धान्य व या दहा भाकरी घेऊन छावणीत आपल्या भावांजवळ धावत जा. 18हे लोण्याचे दहा गोळे त्यांच्या हजारांवरील सरदारास नेऊन दे आणि आपल्या भावांचा समाचार घेऊन त्यांची खूण आण. 19तुझे भाऊ शौलासोबत आहेत आणि सर्व इस्राएली एलाच्या खोऱ्यात, पलिष्ट्यांशी लढत आहेत.” 20दावीद पहाटेस उठला आणि एका राखणाऱ्यांकडे मेंढरे सोपवून इशायाने सांगितल्या प्रमाणे सामान घेऊन गेला. तेव्हा सैन्य रणशब्द करून लढण्यास जात असता दावीद सैन्याच्या छावणी जवळ जाऊन पोहोचला. 21इस्राएल व पलिष्ट्यांनी त्यांच्या सेना लढाईसाठी समोरासमोर सज्ज् केल्या. 22तेव्हा दावीद आपल्याजवळील सामान राखणाऱ्याच्या हाती ठेवून सैन्याकडे धावला आणि त्याने आपल्या भावांस सलाम केला. 23तो त्यांच्याशी बोलत असता पाहा तो युद्धवीर पलिष्टी गल्याथ नावाचा गथकर पलिष्ट्यांच्या सैन्यातून निघून मागे म्हटलेले शब्द बोलू लागला आणि ते दावीदाने ऐकले. 24सर्व इस्राएलांचे पुरूष त्या मनुष्यास पाहून पळाले आणि फार भ्याले. 25मग इस्राएलाची माणसे म्हणाली, “हा जो मनुष्य पुढे आला आहे त्यास तुम्ही पाहिले काय? तो खरेच इस्राएलाची निंदा करण्यास आला आहे. आणि जो मनुष्य ह्याला जिवे मारील त्यास राजा फार धन देईल आणि आपली कन्या त्यास देईल आणि त्याच्या बापाचे कुटुंब नामांकित करील.” 26तेव्हा दावीदाने आपल्याजवळ उभ्या राहिलेल्या लोकांस म्हटले, “जो मनुष्य त्या पलिष्ट्याला मारील आणि इस्राएलापासून अपमान दूर करील त्यास काय प्राप्त होईल? हा बेसुनती पलिष्टी कोण आहे की ज्याने जिवंत परमेश्वराच्या सैन्याला तुच्छ मानावे?” 27मग लोकांनी त्यास उत्तर दिले, जो पुरुष त्यास मारील त्याचे असे करण्यात येईल. 28त्याचा भाऊ अलीयाब याने त्यास या लोकांशी बोलताना ऐकले; तेव्हा अलीयाब दावीदावर रागावून म्हणाला, “तू इकडे का आला आहेस? तू तो कळप रानात कोणाच्या जवळ ठेवला? तुझा गर्व आणि तुझ्या अंतःकरणाची दुष्टाई मी जाणत आहे लढाई पाहावी म्हणून तू आला आहेस. 29तेव्हा दावीद म्हणाला मी आता काय केले आहे? मी फक्त एक शब्द बोललो नाही काय?” 30मग तो त्याच्यापासून दुसऱ्याकडे फिरून तसेच भाषण करून म्हटले आणि लोकांनी त्यास पूर्वी प्रमाणे उत्तर दिले. 31जे शब्द दावीद बोलला ते लोकांनी ऐकले असता शौलाला सांगितले, मग त्याने त्यास बोलाविले. 32तेव्हा दावीदाने शौलाला म्हटले, “त्या मनुष्यामुळे कोणाचे हृदय खचू नये तुमचा सेवक जाऊन त्या पलिष्ट्याशी लढेल.” 33तेव्हा शौलाने दावीदाला म्हटले, “त्या पलिष्ट्याबरोबर जाऊन लढाई करावयास तू शक्तीमान नाहीस. कारण तू केवळ कोवळा तरुण आहेस. तो तर त्याच्या तरुणपणापासून लढाईचा पुरुष आहे.” 34मग दावीद शौलाला म्हणाला, “तुमचा सेवक आपल्या बापाची मेंढरे राखत होता, तेव्हा एक सिंह व एक अस्वल यांनी येऊन एक मेंढरू कळपातून नेले. 35मग मी त्याच्या पाठीस लागून त्यास मारले आणि मेंढरू त्याच्या जबडयातून काढले आणि जेव्हा तो माझ्या अंगावर आला तेव्हा मी त्याची दाढी धरून त्यास ठार मारले. 36तुझ्या दासाने सिंह व अस्वल दोघांनाही जीवे मारिले. हा बेसुंती पलिष्टी त्यातील एकासारखा होईल कारण, त्यांने जिवंत परमेश्वराच्या सैन्याची निंदा केली आहे.” 37आणखी दावीदाने म्हटले, “ज्या परमेश्वराने सिंह व अस्वल यांच्या पंज्यापासून मला राखिले तो या पलिष्ट्याच्या हातातून मला राखील.” मग शौलाने म्हटले, “जा परमेश्वर तुझ्या बरोबर असो.” 38तेव्हा शौलाने आपली वस्त्रे दावीदावर घातली आणि डोक्यावर पितळेचा टोप घातला आणि त्याच्यावर चिलखत घातले. 39दावीदाने त्याची तलवार आपल्या वस्त्राभोवती बांधिली मग तो चालू लागला. त्याने कधीही ती वापरली नव्हती. तेव्हा दावीदाने शौलाला म्हटले, “याच्याने मला चालवत नाही. कारण त्यास त्याची सवय नव्हती.” मग दावीदाने शौलाला म्हटले, ही घेऊन माझ्याने चालवत नाही कारण याची पारख मी कधी केली नाही. तेव्हा दावीदाने ती आपल्या अंगातून काढली. 40त्याने आपली काठी हातात घेऊन ओहाळातून पाच गुळगुळीत गोटे आपल्यासाठी निवडून घेतले आणि त्याने त्याच्याजवळ जी मेंढपाळाची पिशवी होती, तीच्यात ते ठेवले व आपली गोफण हातात घेऊन पलिष्ट्याजवळ तो जाऊ लागला. 41तो पलिष्टी चालत चालत दावीदाजवळ आला आणि जो मनुष्य ढाल वाहत होता तो त्याच्या पुढे चालला. 42त्या पलिष्ट्याने दृष्टी लावून दावीदाला पाहिले, तेव्हा त्याने त्यास तुच्छ मानिले कारण की, तो कोवळा तरुण, तांबूस व सुंदर चेहऱ्याचा होता. 43तेव्हा तो पलिष्टी दावीदाला म्हणाला, “मी काय कुत्रा आहे? म्हणून काठी घेऊन माझ्याकडे आलास?” त्या पलीष्ट्याने दावीदाला आपल्या परमेश्वराच्या नावाने शाप दिला. 44त्या पलिष्टयाने दावीदाला म्हटले, “माझ्याजवळ ये, म्हणजे मी तुझे शरीर आकाशातील पाखरांना आणि रानातील वनपशूंना देतो.” 45दावीदाने पलिष्ट्याला म्हटले, “तू तलवार, भाला व ढाल घेऊन मजवर आलास, परंतु मी सैन्यांचा परमेश्वर इस्राएलाच्या सैन्यांचा परमेश्वर ज्याची निंदा तू केली, त्याच्या नावाने तुझवर येत आहे. 46परमेश्वर या दिवशी तुला माझ्या हाती देईल. मी तुला जीवे मारीन आणि तुझे मस्तक छेदिन आणि पलिष्ट्यांच्या सैन्यांची प्रेते आकांशातील पाखरे व रानातील वनपशू यांस देईन. तेव्हा अवघी पृथ्वी जाणेल की, इस्राएलामध्ये परमेश्वर आहे. 47हा सर्व समुदाय जाणेल की, तलवार व भाला याकडून परमेश्वर संरक्षण करीत नाही. कारण लढाई परमेश्वराची आहे आणि तो तुम्हास आमच्या हाती देईल.” 48मग असे झाले की, तो पलिष्टी उठून दावीदा जवळ येत असता दावीदाने घाई करून पलिष्टयाला मारण्यास शत्रूच्या सैन्याकडे धावला. 49दावीदाने आपला हात पिशवीत घालून त्यातून एक गोटा काढून गोफणीने मारिला, आणि तो दगड त्या पलिष्ट्याच्या कपाळात शिरून तो जमिनीवर पालथा पडला. 50असे करून दावीदाने गोफण व दगड यांनी पलिष्ट्याला जिंकले आणि त्याचा पराभव करून त्यास मारिले. परंतु दावीदाच्या हाती तलवार नव्हती. 51तेव्हा दावीद धावत जाऊन त्या पलिष्ट्यावर उभा राहिला आणि त्याचीच तलवार त्याच्या म्यानातून काढिली आणि तिच्याने त्याचे मुडंके कापून त्यास ठार मारले. मग आपला युद्धवीर मेला आहे हे पाहून पलिष्टी पळाले. 52तेव्हा इस्राएल व यहूदीयांच्या मनुष्यांनी उठून आरोळी मारली, आणि खोऱ्यापर्यंत व एक्रोनाच्या वेशीपर्यंत ते पलिष्ट्यांच्या पाठीस लागले. पलिष्टी शाराईमाच्या वाटेत गथ व एक्रोनापर्यंत जखमी होऊन पडले. 53मग इस्राएलाची संताने पलिष्ट्यांचा पाठलाग सोडून माघारे आली आणि त्यांनी त्यांची छावणी लुटली. 54दावीदाने त्या पलिष्ट्याचे डोके घेऊन यरूशलेमेत आणले, पण त्याची शस्त्रे आपल्या तबूंत ठेवली. 55शौलाने दावीदाला त्या पलिष्ट्यांस लढण्यास जाताना पाहिले तेव्हा त्याने अबनेर सेनापती ह्याला म्हटले, “हे अबनेरा तो तरुण कोणाचा पुत्र आहे?” मग अबनेराने म्हटले, “हे राजा तुझ्या जिवाची शपथ मला माहीती नाही.” 56तेव्हा राजाने म्हटले, “तो तरुण कोणाचा पुत्र आहे याची विचारपूस कर?” 57त्या पलिष्ट्याला वधल्यानतंर दावीद परत आला तेव्हा अबनेराने त्यास घेऊन शौलाजवळ आणले. त्या पलिष्ट्याचे डोके त्याच्या हाती होते. 58तेव्हा शौलाने त्यास म्हटले, “हे तरुणा तू कोणाचा पुत्र आहेस?” मग दावीदाने म्हटले, “तुमचा दास इशाय बेथलहेमकर याचा मी पुत्र आहे.”
सध्या निवडलेले:
1 शमु. 17: IRVMar
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
![None](/_next/image?url=https%3A%2F%2Fimageproxy.youversionapistaging.com%2F58%2Fhttps%3A%2F%2Fweb-assets.youversion.com%2Fapp-icons%2Fmr.png&w=128&q=75)
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
MAR-IRV
Creative Commons License
Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.