9
राजपदी शौलाची निवड
1बन्यामीन वंशातील एक पुरुष होता त्याचे नांव कीश; तो अबीएलाचा मुलगा, तो सरोराचा मुलगा, तो बखोराचा मुलगा, तो अफियाचा मुलगा होता. तो बन्यामिनी पुरुष मोठा पराक्रमी होता. 2आणि त्याचा शौल नावाचा मुलगा तरुण व सुंदर होता. इस्राएलाच्या संतानामध्ये त्याच्याहून कोणी सुंदर नव्हता. सर्व लोक त्याच्या खांद्यास लागत इतका तो उंच होता. 3आणि शौलाचा बाप कीश, याची गाढवे हरवली. तेव्हा कीश आपला मुलगा शौल याला म्हणाला, “आता तू ऊठ व चाकरांपैकी एकाला आपणाबरोबर घे; आणि जाऊन गाढवांचा शोध कर.” 4मग तो एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशातून जाऊन शलीशा प्रांतातून गेला, परंतु ती सापडली नाहीत. मग ते शालीम प्रातांतून गेले, परंतु येथे ती त्यांना सापडली नाहीत. नंतर ते बन्यामीन्यांच्या प्रांतातून गेले परंतु त्यांना ती सापडली नाहीत. 5ते सूफ प्रांतातून आल्यावर शौल आपल्या बरोबरच्या चाकराला म्हणाला, “चला आपण माघारे जाऊ, नाहीतर माझा बाप गाढवांची काळजी सोडून आमचीच काळजी करायला लागेल.” 6तेव्हा तो चाकर त्यास म्हणाला, “आता पाहा या नगरात देवाचा पुरुष आहे. तो पुरुष खूपच सन्मान्य आहे; जे तो सांगतो ते सर्व पूर्ण होतेच. तर आता आपण तेथे जाऊ; म्हणजे आपण कोणत्या मार्गाने पुढे जावे हे कदाचित तो आपल्याला सांगेल.” 7मग शौल आपल्या चाकराला म्हणाला, “पण पाहा आपण जर जाऊ तर त्या मनुष्यास आपण काय घेऊन जावे? कारण आपल्या झोळीतल्या भाकरी संपल्या आहेत आणि परमेश्वराच्या मनुष्यास भेट देण्यासाठी काही राहिले नाही. आपल्याजवळ काय आहे?” 8तेव्हा चाकराने शौलाला उत्तर देऊन म्हटले, “पाहा माझ्या हातात पाव शेकेल रुपे आहे; ते मी परमेश्वराच्या मनुष्यास देईन, म्हणजे तो आमची वाट आम्हास सांगेल.” 9(पूर्वी इस्राएलात कोणी परमेश्वराजवळ विचारायला जात असताना असे म्हणत, “चला आपण द्रष्ट्याकडे जाऊ.” कारण ज्याला आता भविष्यवादी म्हणतात त्यास पूर्वी द्रष्टा असे म्हणत.) 10मग शौल चाकराला म्हणाला, “तुझे बोलणे ठीक आहे चल आपण जाऊ.” तेव्हा ज्या नगरात देवाचा पुरुष होता तेथे ते गेले. 11ते टेकडीवर नगराकडल्या चढणीवर जात होते तेव्हा मुली पाणी भरायला बाहेर जाताना त्यांना भेटल्या. ते त्यांना म्हणाले, “द्रष्टा (पाहणारा) येथे आहे काय?” 12त्यांनी त्यांना उत्तर देऊन म्हटले, “तो आहे; पाहा तुमच्या पुढेच तो निघाला आहे. लवकर जा. तो नगरात आला आहे कारण आज लोकांस उंचस्थानी यज्ञ करायचा आहे. 13तुम्ही तो जेवायला उंचस्थानी चढून जाण्याच्या आधी, नगरात जातानाच तुमची आणि त्याची भेट होईल. तो येण्याच्या अगोदर लोक जेवणार नाहीत, कारण तो यज्ञाला आशीर्वाद देतो मग बोलावलेले जेवतात. तर आता तुम्ही वर जा, कारण या वेळेस त्याची भेट होईल.” 14मग ते नगराकडे चढून गेले आणि ते नगरात जाऊन पोहचतात, तो त्यांनी पाहीले की, शमुवेल उंचस्थानी चढून जायला निघताना त्याच्याकडे येत आहे. 15शौलाच्या येण्यापूर्वी एक दिवस अगोदर, परमेश्वराने शमुवेलाला प्रकट केले होते की: 16“उद्या सुमारे या वेळेस बन्यामिनी प्रांतातून एक पुरुष मी तुझ्याकडे पाठवीन, आणि माझे लोक इस्राएल यांचा राजा होण्यास त्यास तू अभिषेक कर. तो पलिष्ट्यांच्या हातून माझ्या लोकांस सोडवील; कारण मी आपल्या लोकांकडे पाहिले आहे आणि त्यांची आरोळी माझ्याकडे आली आहे.” 17शमुवेलाने शौलाला पाहिले, तेव्हा परमेश्वर त्यास म्हणाला, “पाहा ज्या मनुष्याविषयी मी तुला सांगितले तो हाच आहे! हा माझ्या लोकांवर राज्य करील.” 18मग शौल शमुवेलाजवळ वेशीत येऊन म्हणाला, “मी तुम्हास विनंती करतो द्रष्याचे (पाहणाऱ्याचे) घर कोठे आहे ते मला सांगा.” 19तेव्हा शमुवेलाने शौलाला उत्तर देऊन म्हटले, “द्रष्टा (पाहणारा) मीच आहे. माझ्या पुढे उंचस्थानी वर चला, म्हणजे आज तुम्ही माझ्याबरोबर जेवाल. तुझ्या मनात जे आहे ते सर्व सांगून सकाळी मी तुला जाऊ देईन. 20आणि तुझी जी गाढवे तीन दिवसांपूर्वी हरवली होती त्यांची तू काळजी करू नको, कारण ती सांपडली आहेत. आणि इस्राएलाच्या सर्व अभिलाषा कोणाकडे आहेत? तुझ्याकडे व तुझ्या वडिलाच्या सर्व घराण्याकडे की नाही?” 21तेव्हा शौलाने उत्तर देऊन म्हटले, “मी बन्यामीनी, इस्राएलाच्या वंशामध्ये सर्वाहून धाकट्या वंशातला नाही काय? आणि बन्यामिनाच्या वंशामध्ये सर्व घराण्यांपेक्षां माझे घराणे लहान आहे की नाही? तर तुम्ही माझ्याशी असे कसे बोलता?” 22मग शमुवेलाने शौलाला व त्याच्या चाकराला बरोबर घेऊन भोजनशाळेत आणले. आणि आमंत्रितांमध्ये त्यांना मुख्य ठिकाणी बसवले; ते सुमारे तीसजण होते. 23तेव्हा शमुवेल आचाऱ्याला म्हणाला, “जो वाटा मी तुला दिला होता व ज्याविषयी मी तुला म्हटले होते की, हा तू आपल्याजवळ वेगळा ठेव, तो आण.” 24तेव्हा स्वयंपाक्याने फरा व त्यावर जे होते ते घेऊन शौलापुढे ठेवले. मग शमुवेल म्हणाला, “पाहा जे राखून ठेवले होते! ते खा, कारण नेमलेल्या वेळेपर्यंत ते तुझ्यासाठी राखून ठेवलेले आहे.” कारण आता तू म्हणू शकतोस की, मी लोकांस बोलावले आहे. अशा रीतीने, त्या दिवशी शौल शमुवेलाबरोबर जेवला. 25ते उंचस्थानावरून खाली नगरात आल्यावर त्याने घराच्या धाब्यावर शौलाशी संभाषण केले. 26ते पहाटेस उठले व उजाडण्याच्या वेळेस असे झाले की, शमुवेलाने शौलाला घराच्या धाब्यावर बोलावून म्हटले, “मी तुला पाठवून द्यावे म्हणून ऊठ. तेव्हा शौल ऊठला, मग तो व शमुवेल असे दोघेजण बाहेर गेले.” 27ते खाली नगराच्या शेवटास जात असता, शमुवेल शौलाला म्हणाला, “चाकराला आपल्यापुढे चालायला सांग, परंतु मी तुला देवाचे वचन ऐकावावे म्हणून तू येथे थोडा थांब. आणि चाकर पुढे गेला.”