2 इति. 20
20
मवाब आणि अम्मोन ह्यांच्यावर मिळवलेला विजय
1यानंतर मवाबी, अम्मोनी आणि काही मऊनी लोक युध्दाच्या हेतूने यहोशाफाटावर चालून आले. 2काही लोकांनी येऊन यहोशाफाटाला खबर दिली की, “मृतसमुद्राच्या पलीकडून अराम देशाकडून मोठी सेना तुमच्यावर चाल करून येत आहे. ती हससोन-तामार!” म्हणजेच एन-गेदी येथे येऊन ठेपली सुध्दा. 3यहोशाफाट घाबरला आणि त्याने याबाबतीत परमेश्वरास काय करावे, असे विचारायचे ठरवले. त्याने यहूदामध्ये सर्वांसाठी उपवासाची घोषणा केली. 4तेव्हा यहूदातून, यहूदाच्या सर्व नगरांमधून लोक यहूदाच्या साहाय्याची परमेश्वराकडे याचना करायला जमले. 5यहोशाफाट, परमेश्वराच्या मंदिरात नवीन अंगणासमोर होता. यहूदा आणि यरूशलेमेच्या लोकांमध्ये तो उभा राहिला. 6तो म्हणाला, “आमच्या पूर्वजांच्या परमेश्वर देवा, स्वर्गातील परमेश्वर तूच आहेस. सर्व राष्ट्रामधल्या सर्व राज्यांचा तूच शास्ता आहेस. सगळे सामर्थ्य आणि सत्ता तुझ्या ठायी आहे. कोणीही तुझ्याविरुध्द जाऊ शकत नाही.” 7तूच आमचा परमेश्वर आहेस या प्रदेशातील रहिवाश्यांना तू हाकलून लावलेस. तुझ्या या इस्राएलादेखतच तू हे केलेस. तुझा मित्र अब्राहाम याच्या वंशजांना तू ही भूमी कायमची बहाल केलीस. 8अब्राहामाचे वंशज या प्रदेशात राहिले आणि तुझ्या नावाकरिता त्यांनी मंदिर बांधले. 9ते म्हणाले, तलवार, शासन, रोगराई किंवा दुष्काळ यांच्यारुपाने आमच्यावर अरिष्ट कोसळले असता आम्ही या मंदिरासमोर, आणि तुझ्यापुढे उभे राहू. या मंदिराला तुझे नाव दिले आहे, “संकटाच्या वेळी आम्ही तुझा मोठ्याने धावा करु, आमची हाक ऐकून तू आम्हास सोडव.” 10“पण यावेळी अम्मोन, मवाब आणि सेईर पर्वत या भागातले हे लोक आहेत. इस्राएल लोक मिसरहून आले तेव्हा इस्राएल लोकांस तू त्यांच्या प्रदेशात प्रवेश करु दिला नाहीस. त्यामुळे इस्राएल लोकांनी तिकडे पाठ फिरवली आणि त्यांचे उच्चाटन केले नाही. 11पण तेव्हाच त्यांच्या नायनाट न केल्याचे हे काय फळ मिळाले पाहा, ते आम्हास आमच्या प्रदेशातून हुसकावून लावायला निघाले आहेत. हा प्रदेश तू आम्हास बहाल केला आहेस. 12हे देवा, या लोकांस चांगले शासन कर. आमच्यावर चाल करून येणाऱ्या या भल्या थोरल्या सेनेला तोंड द्यायचे सामर्थ्य आमच्यात नाही. आम्हास काही सुचेनासे झाले आहे. म्हणून आमचे डोळे तुझ्याकडे लागलेले आहे.” 13यहूदातील सर्व मंडळी आपल्या पत्नी आणि तान्ह्या मुलांसकट सर्व अपत्यांना घेऊन परमेश्वरासमोर उभी होती. 14तेव्हा यहजीएल याच्यात परमेश्वराच्या आत्म्याचा संचार झाला. यहजीएल हा जखऱ्याचा पुत्र. जखऱ्या बनायाचा पुत्र. बनाया यईएलाचा पुत्र. आणि यईएल मत्तन्याचा पुत्र. यहजीएल लेवी असून आसाफच्या वंशातला होता. या सभेत 15यहजीएल म्हणाला, “राजा यहोशाफाट, तसेच यहूदा आणि यरूशलेममधील रहिवाश्यांनो, मी काय म्हणतो ते ऐका. परमेश्वराचा संदेश असा आहे. एवढी मोठी सेना पाहून घाबरुन जाऊ नका किंवा काळजी करु नका. हे युध्द तुमचे नव्हे तर परमेश्वराचे युध्द आहे. 16उद्या त्यांचा सामना करायला जा आणि लढा. ते सीसच्या खिंडीतून वर येत आहेत. दरीच्या टोकाला यरुएल वाळवंटाच्या दुसऱ्या बाजूला तुमची त्यांच्याशी गाठ पडेल. 17तुम्हास या लढाईत लढावे असे लागणारच नाही. आपल्या जागी ठाम उभे राहा. परमेश्वराने तुमचे रक्षण केलेले तुम्हास आढळून येईल. यहूदा आणि यरूशलेम लोकहो, भिऊ नका, चिंता करु नका. परमेश्वर तुमच्यासोबत आहे. तेव्हा उद्या त्यांच्यावर चालून जा.” 18यहोशाफाटाने मस्तक भूमीपर्यंत लववले. यहूदा आणि यरूशलेममधील सर्व लोक यांनी परमेश्वरापुढे दंडवत घातले. त्या सर्वांनी परमेश्वराची आराधना केली. 19कहाथ आणि कोरह या घराण्यांतील लेवी इस्राएलच्या परमेश्वर देवाची भजने म्हणण्यास उभे राहिले. उच्च स्वरात त्यांनी परमेश्वराची भजने म्हटली. 20यहोशाफाटाचे सैन्य भल्यासकाळी तकोवाच्या वाळवंटात गेले. ते निघत असताना यहोशाफाट समोर उभा राहून त्यांना म्हणाला, “यहूदा आणि यरूशलेम नगरांमधील लोकहो, ऐका. आपल्या परमेश्वर देवावर श्रध्दा ठेवा आणि खंबीरपणे उभे राहा. परमेश्वराच्या संदेष्ट्यांवर विश्वास ठेवा. जय तुमचाच आहे.” 21यहोशाफाटाने लोकांस प्रोत्साहन दिले व सूचना दिल्या. परमेश्वराचे स्तवन करणारी माणसे त्याने निवडली. परमेश्वर पवित्र आणि कल्याणकारी आहे म्हणून त्याचे स्तवन करण्यासाठी त्याने या गायकांना नेमले. त्यांनी सैन्यासमोर उभे राहून स्तुतिगीते म्हटली. ते म्हणाले, “परमेश्वराचे स्तवन करा कारण त्याची प्रीती सर्वकाळ आहे.” 22लोकांनी देवाची स्तुतिगीते म्हणण्यास सुरुवात केल्याबरोबर परमेश्वराने यहूदावर चाल करून आलेल्या अम्मोनी, मवाबी आणि सेईर पर्वतांतील लोकांशी गनिमी काव्याने लढणारी फौज मोक्याच्या जागी बसवली. 23अम्मोनी आणि मवाबी लोक सेईर पर्वतातल्या लोकांशी लढू लागले. अम्मोन्यांनी आणि मवाब्यांनी त्यांचा पुरता संहार केला. सेईरातल्या लोकांचा बीमोड केल्यानंतर त्यांनी एकमेकांचा नाश केला. 24यहूदी लोक वाळवंटातील टेहळणीच्या बुरुजापाशी आले. शत्रूचे विशाल सैन्य कुठे दिसते का हे ते पाहू लागले पण त्यांना फक्त जमिनीवर विखुरलेले मृतदेह तेवढे दिसले. कोणीही जिवंत राहिला नव्हता. 25यहोशाफाट आणि त्याचे सैन्य लुटीसाठी मृतदेहापाशी आले. त्यामध्ये त्यांना खूप, धन, आणि मौल्यवान वस्तू मिळाल्या. त्या त्यांनी स्वत:ला घेतल्या. लूट एवढी होती की ती यहोशाफाट आणि त्याचे लोक यांना नेता येईना. ती प्रेतांमधून काढून न्यायला त्यांना तीन दिवस लागले. 26चौथ्या दिवशी यहोशाफाट आणि त्याचे सैन्य बराखाच्या खोऱ्यात जमले. याठिकाणी त्यांनी परमेश्वरास धन्यवाद दिले. म्हणून आजही या खोऱ्याचे नाव आशीर्वादाचे खोरे असे आहे. 27मग यहोशाफाटाने समस्त यहूदा आणि यरूशलेम लोकांस यरूशलेम येथे माघारी नेले. परमेश्वराने त्यांच्या शत्रूंचा पाडाव केल्यामुळे त्यांच्यात आनंदी आनंद पसरला होता. 28यरूशलेमेला येऊन ते सतारी, वीणा व कर्णे घेऊन परमेश्वराच्या मंदिरात गेले. 29परमेश्वराने इस्राएलाच्या शत्रू सैन्याशी लढा दिला हे ऐकून सर्व देशांमधल्या सर्व राज्यांमध्ये परमेश्वराविषयी धाक निर्माण झाला. 30त्यामुळे यहोशाफाटाच्या राज्यात शांतता नांदली. देवाने यहोशाफाटाला सर्व बाजूंनी स्वास्थ्य दिले.
यहोशाफाटाची कारकीर्द
1 राजे 22:41-50
31यहोशाफाटाने यहूदा देशावर राज्य केले. राज्यावर आला तेव्हा तो पस्तीस वर्षांचा होता. त्याने यरूशलेमेवर पंचवीस वर्षे राज्य केले. यहोशाफाटाच्या आईचे नाव अजूबा ही शिल्हीची कन्या. 32आपले पिता आसा यांच्याप्रमाणेच यहोशाफाट योग्य मार्गाने वागला. त्याने मार्ग सोडला नाही. परमेश्वराच्या दृष्टीने भले तेच यहोशाफाटाने केले. 33पण उच्चस्थाने काढण्यात आली नव्हती. लोकांनीही आपले मन आपल्या पूर्वजांच्या परमेश्वराकडे वळवले नव्हते. 34हनानीचा पुत्र येहू याच्या बखरीमध्ये यहोशाफाटाच्या बाकीच्या कृत्यांची संपूर्ण नोंद आहे. इस्राएलच्या राजांचा इतिहास या ग्रंथात या गोष्टींचा समावेश करून त्यांची नोंद केली आहे. 35इस्राएलचा राजा अहज्या याच्याशी पुढे यहूदाचा राजा यहोशाफाट याने करार केला. यहोशाफाट ने हे वाईट केले. 36तार्शीश नगराला जायच्या गलबतांबद्दल हा करार होता. एसयोन-गेबेर येथे त्यांनी या गलबतांची बांधणी केली. 37पुढे अलियेजर ने यहोशाफाटाविरुध्द भविष्य सांगितले. मारेशा नगरातला दोदावाहू याचा अलियेजर हा पुत्र. तो म्हणाला, “यहोशाफाट, तू अहज्याशी हातमिळवणी केलीस म्हणून परमेश्वर तुझ्या कामांचा विध्वंस करील.” आणि जहाजे फुटली. त्यामुळे यहोशाफाट आणि अहज्या यांना ती तार्शीशला पाठवता आली नाहीत.
सध्या निवडलेले:
2 इति. 20: IRVMar
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
MAR-IRV
Creative Commons License
Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.