2 इति. 36
36
यहोआहाजाचा कारकीर्द व पदच्युती
2 राजे 23:31-33
1यहूदाच्या लोकांनी यरूशलेमेचा नवा राजा म्हणून यहोआहाजाची निवड केली; योआहाज हा योशीयाचा पुत्र. 2तो यहूदाचा राजा झाला तेव्हा तेवीस वर्षांचा होता. त्याने यरूशलेमेमध्ये तीन महिने राज्य केले. 3त्यानंतर मिसरच्या राजाने यरूशलेमेच्या राजाला पदच्युत केले व देशावर शंभर किक्कार #साधारण 3,400 किलोग्रामचांदी आणि एक किक्कार #साधारण 34 किलोग्रामसोने एवढी खंडणी लादली. 4मिसरच्या राजाने आहाजाचा भाऊ एल्याकीम याला यहूदा आणि यरूशलेमेचा राजा केले. यानंतर त्याचे नामांतर करून यहोयाकीम असे ठेवले आणि यहोआहाजाला नखोने मिसरला नेले.
यहोयाकीमाची कारकीर्द
2 राजे 23:34-24:7
5यहोयाकीम पंचविसाव्या वर्षी यहूदाचा राजा झाला. त्याने यरूशलेमामध्ये अकरा वर्षे राज्य केले. यहोयाकीमाने परमेश्वर देवाच्या दृष्टीने वाईट गोष्टी केल्या. त्याने परमेश्वर देवाविरुध्द पाप केले. 6बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याने यहूदावर हल्ला केला. त्याने त्यास कैद केले आणि त्यास बेड्या ठोकल्या. तशा अवस्थेत त्यास नबुखद्नेस्सरने बाबेलला नेले. 7नबुखद्नेनेस्सरने परमेश्वराच्या मंदिरातील काही वस्तू हस्तगत करून त्या बाबेलला नेल्या आणि स्वत:च्या घरात ठेवल्या. 8यहोयाकीमाच्या इतर गोष्टी, त्याची दुष्कृत्ये आणि त्याचे अपराध हे सर्व इस्राएल व यहूदी राजांचा इतिहास या पुस्तकात लिहिलेले आहेत. यहोयाकीमाच्या जागी त्याचा पुत्र यहोयाखीन राज्य करु लागला.
यहोयाखीनास कैद करून बाबेलास नेण्यात येते
2 राजे 24:8-17
9यहोखदीन यहूदाचा राजा झाला तेव्हा अठरा वर्षांचा होता. यरूशलेमामध्ये त्याची कारकिर्द तीन महिने आणि दहा दिवस होती. परमेश्वरास अमान्य असलेले वर्तन करून त्याने पाप केले. 10राजा नबुखद्नेस्सरने वर्षारंभी काही सेवक पाठवून यहोयाखीनाला परमेश्वराच्या मंदिरातील बहुमोल खजिन्यासह बाबेलला आणवले. यहोयाखीनाच्या वडिलांचा भाऊ#नातलगांपैकी सिद्कीया याला नबखद्नेस्सरने यहूदा व यरूशलेमचा राजा केले.
सिद्कीयाची कारकीर्द
2 राजे 24:18-20; यिर्म. 52:1-3
11सिद्कीया यहूदाचा राजा झाला तेव्हा एकवीस वर्षांचा होता. त्याने यरूशलेमेमध्ये अकरा वर्षे राज्य केले. 12परमेश्वराच्या दृष्टीने निंद्य असे त्याने केले. परमेश्वराचे आदेश संदेष्टा यिर्मया याच्याकडून येत असत. त्याच्यापुढेही सिदकीया विनम्र झाला नाही आणि यिर्मयाचे त्याने ऐकले नाही. 13सिद्कीयाने नबुखद्नेस्सर विरुध्द उठाव केला. नबुखद्नेस्सरने पूर्वी सिद्कीया कडून स्वत:शी एकनिष्ठतेची शपथ वाहवली होती. सिद्कीयाने तेव्हा देवाची शपथ घेऊन तसे वचन दिले होते. पण तरीही सिद्कीयाने आडमुठेपणा केला आणि आपला आयुष्यक्रम बदलून इस्राएलच्या परमेश्वर देवाचे आज्ञापालन करायचे नाकारले. 14त्याचप्रमाणे याजकांचे प्रमुख, आणि यहूदातील वडिलधारी मंडळी यांचे दुराचरण वाढत चालले आणि त्यांनी अधिकाधिक पातके केली. ते परमेश्वराच्या बाबतीत अप्रमाणिक झाले. इतर देशांची अमंगळ कृत्यांची उदाहरणे त्यांनी समोर ठेवली. या प्रमुखांनी यरूशलेमामधल्या परमेश्वराने पवित्र केलेल्या मंदिराची धूळधान केली. 15त्यांच्या पूर्वजांच्या परमेश्वर देवाने लोकांस सावध करण्यासाठी मोठ्या निकडीने संदेष्टे पाठवले. आपल्या प्रजेविषयी आणि मंदिराविषयी त्याच्या मनात करुणा होती म्हणून परमेश्वर असे वागला. त्यांचा अथवा मंदिराचा नाश होऊ नये असे परमेश्वरास वाटत होते. 16पण या परमेश्वराच्या प्रजेने मात्र संदेष्ट्यांची टर उडवली. त्यांनी देवाच्या संदेष्ट्यांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष केले. देवाच्या संदेशांची हेटाळणी केली. अखेर देवाचा क्रोध अनावर झाला. आता त्याचा संताप थोपवता येणे अशक्य झाले.
यहूदाचा बंदीवास
17तेव्हा खास्दी राजाला देवाने यहूदा व यरूशलेमेवर स्वारी करायला लावले. त्याने मंदिरात असलेल्या तरुणांनाही ठार केले. यहूदा व यरूशलेममधील लोकांवर त्याने दयामाया दाखवली नाही. लोकांस जिवे मारताना तरुण, कुमारी, वृध्द स्त्री-पुरुष, यावर त्याने तलवार चालवावी. देवानेच नबुखद्नेस्सराला यहूदा व यरूशलेमेच्या लोकांस शासन करायची मुभा दिली होती. 18देवाच्या मंदिरातील लहानमोठी सर्व पात्रे व निधी, आणि राजा व त्याचे सरदार ह्यांचे निधी ही सर्व तो बाबेलास घेऊन गेला. 19त्यांनी देवाच्या घराला आग लावली, यरूशलेमची तटबंदी उद्ध्वस्त केली, राजा आणि सरदार यांच्या मालकीची घरे जाळली. यरूशलेम येथील प्रत्येक मौल्यवान वस्तू लुटून नेली किंवा नष्ट केली. 20अजूनही हयात असलेल्या व तलवारीपासून वाचलेल्या लोकांस नबुखद्नेस्सरने बाबेलला नेऊन गुलाम केले. पुढे पारसाचे राज्य येऊन त्यांनी बाबेलचा पराभव करेपर्यंत हे गुलाम तेथेच राहिले. 21अशाप्रकारे, यिर्मयाकडून इस्राएलाबद्दल परमेश्वराने जे वदवले ते प्रत्यक्षात घडले. परमेश्वर यिर्मयाद्वारे म्हणाला होता: हे ठिकाण सत्तर वर्षे निर्मनुष्य आणि उजाड राहील. लोकांनी न पाळलेल्या शब्बाथाच्या भरपाईसाठी असे होईल.
कोरेशाची फर्मान
एज्रा 1:1-4
22कोरेश पारसाचा राजा असताना पहिल्याच वर्षी परमेश्वराने त्यास एक फर्मान काढायला प्रेरणा दिली. यिर्मयाच्या तोंडून वदवलेली भविष्यवाणी प्रत्यक्षात येण्यासाठी परमेश्वराने त्यालाही स्फूर्ती दिली. कोरेशने आपल्या दूताकरवी राज्यभर असा संदेश पाठवला की, 23“पारसचा राजा कोरेश म्हणतो; स्वर्गातील परमेश्वर देव याने मला या पृथ्वीचा सम्राट केले आहे. त्याच्यासाठी यहूदातील यरूशलेमेमध्ये मंदिर बांधण्याची जबाबदारीही माझ्यावर सोपवली आहे. आता तुमच्यापैकी देवाला मानणारे सर्वजण निर्धास्तपणे यरूशलेमेला जाऊ शकता, परमेश्वर देव तुमच्याबरोबर असो.”
सध्या निवडलेले:
2 इति. 36: IRVMar
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
MAR-IRV
Creative Commons License
Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.