12
हेरोदाने केलेला छळ व पेत्राची बंदिवासातून सुटका
1त्या वेळेच्या सुमारास हेरोद राजाने मंडळीतील काही जणांस छळावे म्हणून त्यांच्यावर हात टाकला. 2योहानाचा भाऊ याकोबा ह्याला त्याने तलवारीने जिवे मारले. 3हेरोदाने पाहिले की, यहूदी अधिकाऱ्यांना हे आवडले आहे, म्हणून त्याने पेत्रालासुद्धा अटक करण्याचे ठरवले, ते बेखमीर भाकरीचे दिवस होते. 4हेरोदाने पेत्राला अटक करून तुरुंगात टाकले, त्याच्या रखवालीकरिता त्यास शिपायांच्या चार चौकड्यांच्या स्वाधीन केले, वल्हांडण सण झाल्यावर पेत्राला लोकांसमोर आणण्याची योजना होती. 5म्हणून पेत्राला तुंरूगात ठेवण्यात आले, पण मंडळी सातत्याने पेत्रासाठी देवाकडे प्रार्थना करीत होती.
6पेत्र दोन शिपायांच्यामध्ये झोपला होता, त्यास दोन साखळ्यांनी बांधले होते, तुरुंगाच्या दाराजवळ आणखी काही शिपाई पहारा देत होते, ती रात्रीची वेळ होती व हेरोदाने असा विचार केला की, दुसऱ्या दिवशी पेत्राला लोकांसमोर आणावे. 7तेव्हा पाहा, अचानक परमेश्वराचा दूत तेथे उभा राहिला, तुरुंगाच्या खोलीत एकदम प्रकाश पडला, देवदूताने पेत्राच्या कुशीला स्पर्श करून त्यास उठवले, देवदूत म्हणाला, “लवकर ऊठ!” तेव्हा पेत्राच्या हातातील साखळ्या गळून पडल्या. 8देवदूत पेत्राला म्हणाला, “कपडे घाल व तुझ्या वहाणा घाल,” मग पेत्राने कपडे घातले, मग देवदूत म्हणाला, “तुझा झगा अंगात घाल व माझ्यामागे ये.” 9मग देवदूत बाहेर पडला व पेत्र त्याच्यामागे चालला, पेत्राला कळत नव्हते की, हे खरोखर काय करीत आहे, त्यास वाटले आपण दृष्टांत पाहत आहोत. 10पहिल्या व दुसऱ्या फेऱ्यातील पहारेकऱ्यांना ओलांडून पेत्र व देवदूत लोखंडी दाराजवळ येऊन पोहोचले, ते त्यांच्यासाठी आपोआप उघडले, पेत्र व देवदूत दरवाजामधून बाहेर पडले, त्यांनी एक रस्ता पार केला आणि अचानक देवदूत पेत्राला सोडून निघून गेला. 11पेत्राला मग कळले की नक्की काय घडले आणि तो म्हणाला, “आता मला समजले की प्रभूने खरोखर त्याचा दूत माझ्याकडे पाठविला व त्याने मला हेरोदाच्या हातातून व यहूदी लोकांचा संपूर्ण अपेक्षाभंग करून मला सोडवले आहे.”
12या गोष्टींची जाणीव झाल्यावर पेत्र मरीयेच्या घरी गेला, ती योहान ज्याला मार्कही म्हणत त्याची आई होती, पुष्कळ लोक त्याठिकाणी जमले होते, ते सर्व प्रार्थना करीत होते. 13पेत्राने फाटकाचा दरवाजा ठोठावला, तेव्हा रुदा नावाची दासी फाटक उघडण्यासाठी आली. 14तिने पेत्राचा आवाज लगेच ओळखला आणि ती खूप आनंदित झाली, ती फाटक उघडण्याचेसुद्धा विसरून गेली, ती आतमध्ये पळाली आणि लोकांस तिने सांगितले, “पेत्र दाराजवळ उभा आहे.” 15विश्वास ठेवणारे रुदाला म्हणाले, “तुला वेड लागले आहे!” परंतु पेत्र दाराजवळ उभा आहे, असे रुदा परत परत अगदी कळकळीने सांगू लागली, म्हणून लोक म्हणाले, “तो पेत्राचा दूत असला पाहिजे.” 16पण पेत्र बाहेरून फाटक सारखे ठोठावत होता, जेव्हा विश्वास ठेवणाऱ्यांनी फाटक उघडले, तेव्हा त्यांनी पेत्राला पाहिले, ते चकित झाले होते. 17पेत्राने हाताने खुणावून शांत राहायला सांगितले, मग त्याने प्रभूने तुरुंगातून कसे आणले हे सविस्तर सांगितले, तो म्हणाला, “याकोब व इतर बांधवांना काय घडले ते सांगा,” मग पेत्र तेथून निघून दुसऱ्या ठिकाणी गेला.
18दुसऱ्या दिवाशी शिपाई फार हताश झाले होते, पेत्राचे काय झाले असावे याचा ते विचार करीत होते. 19हेरोदाने पेत्राला सगळीकडे शोधले पण तो त्यास शोधू शकला नाही, मग हेरोदाने पहारेकऱ्यांना प्रश्न विचारले व त्यांना मरणाची शिक्षा ठोठावली, नंतर हेरोद यहूदीया प्रांतातून निघून गेला, तो कैसरीया शहरात गेला व तेथे काही काळ राहिला.
हेरोदाचा मृत्यू
20हेरोद सोर व सिदोन नगरातील लोकांवर फार रागावला होता, ते लोक मिळून हेरोदाला भेटायला आले, ब्लस्तला आपल्या बाजूला वळविण्यात ते यशस्वी झाले, ब्लस्त हा राजाचा खाजगी सेवक होता, लोकांनी हेरोदाकडे शांततेची मागणी केली कारण त्यांचा देश अन्नधान्याच्या बाबतीत हेरोदाच्या देशावर अवलंबून होता. 21हेरोदाने त्यांना भेटण्यासाठी एक दिवस ठरवला, त्यादिवशी हेरोदाने आपला सुंदर दरबारी पोशाख घातला होता, तो न्यायासनावर बसून लोकांसमोर भाषण करू लागला. 22लोक मोठ्याने आरोळी करून म्हणाले, “ही तर देवाची वाणी आहे, मनुष्याची नव्हे!” हेरोदाने या स्तुतीचा स्वीकार केला. 23आणि त्याने देवाला गौरव दिला नाही, म्हणून परमेश्वराच्या दूताने त्यावर प्रहार केला, तो किडे पडून मरण पावला.
24देवाचे वचन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पसरत गेले व लोकांस प्रेरित करीत होता, विश्वास ठेवणाऱ्यांचा गट दिवसेंदिवस मोठा होत होता.
25बर्णबा व शौलाने त्यांचे यरूशलेम शहरातील काम संपविल्यानंतर ते अंत्युखियाला परत आले, त्यांनी मार्क योहान याला त्यांच्याबरोबर घेतले.