19
इफिस येथे बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे शिष्य
1तेव्हा असे झाले की, अपुल्लो करिंथ येथे असताना पौल निरनिराळ्या भागातून प्रवास करीत इफिस येथे आला, तेथे त्यास काही शिष्य आढळले. 2पौलाने त्यांना विचारले, “जेव्हा तुम्ही विश्वास ठेवला, तेव्हा तुम्हास पवित्र आत्मा मिळाला काय?” ते अनुयायी त्यास म्हणाले, “पवित्र आत्मा आहे हे सुद्धा आम्ही ऐकलेले नाही.” 3तो म्हणाला, “मग कसला बाप्तिस्मा तुम्ही घेतला?” ते म्हणाले, “योहानाचा बाप्तिस्मा.” 4पौल म्हणाला, “योहानाचा बाप्तिस्मा पश्चात्तापाचा होता, त्याने लोकांस सांगितले की, त्यानंतर जो येत आहे, त्याच्यावर लोकांनी विश्वास ठेवावा, तो येणारा म्हणजे येशू होय.” 5जेव्हा त्यांनी हे ऐकले, तेव्हा त्यांनी प्रभू येशूच्या नावात बाप्तिस्मा घेतला. 6आणि जेव्हा पौलाने त्याचे हात त्यांच्यावर ठेवले, तेव्हा पवित्र आत्मा त्यांच्यावर आला आणि ते निरनिराळ्या भाषा बोलू लागले व भविष्य सांगू लागले. 7या गटात सर्व मिळून बारा पुरूष होते.
इफिस येथे पौल
8पौल यहूदी सभास्थानात जात असे व तीन महिने धैर्याने बोलत असे, देवाच्या राज्याविषयी चर्चा करीत व यहूदी लोकांचे मन वळवीत असे. 9परंतु त्यांच्यातील काही कठीण मनाचे झाले व त्यांनी विश्वास ठेवण्यास नकार दिला आणि ख्रिस्ताच्या मार्गाविषयी वाईट बोलले, मग पौल त्यांच्यातून निघून गेला व शिष्यांनाही त्यांच्यातून वेगळे केले आणि तुरन्नाच्या शाळेत दररोज त्यांच्याशी चर्चा केली. 10हे असे दोन वर्षे चालले, याचा परिणाम असा झाला की, आशियात राहत असलेल्या सर्व यहूदी व ग्रीक लोकांपर्यंत प्रभू येशूचे वचन पोहोचले.
11देवाने पौलाच्या हातून असामान्य चमत्कार घडविले. 12पौलाच्या शरीरावरून रुमाल आणि कपडेही आणून काही, लोक या गोष्टी आजारी लोकांवर ठेवत असत, जेव्हा ते असे करीत तेव्हा आजारी लोक बरे होत आणि दुष्ट आत्मे त्यांना सोडून जात. 13काही यहूदी सुद्धा सगळीकडे प्रवास करीत असत व लोकांमधून दुष्ट आत्मे घालवीत असत, ते दुष्ट आत्म्याने पछाडलेल्या व्यक्तीमधून प्रभू येशूच्या नावाने ते आत्मे घालवीत असत. 14ते म्हणत, “पौल ज्या येशूच्या नावाने घोषणा करतो त्या नावाने मी तुला आज्ञा करतो,” स्किवा नावाच्या यहूदी मुख्य याजकाचे सात पुत्र असे करीत होते. 15परंतु एकदा एक दुष्ट आत्मा त्यांना म्हणाला, “मी येशूला ओळखतो, पौल मला माहीत आहे, पण तुम्ही कोण आहात?” 16मग ज्याला दुष्ट आत्मा लागला होता त्या मनुष्याने त्यांच्यावर उडी मारली, त्याने त्यांच्यावर सरशी केली व त्यांना पराभूत केले, तेव्हा ते दोघे उघडे व जखमी होऊन घरातून पळाले. 17इफिस येथे राहणाऱ्या सर्व यहूदी व ग्रीक लोकांस हे समजले, तेव्हा सर्वांना भीती वाटली आणि लोक प्रभू येशूच्या नावाचा अधिकच आदर करू लागले. 18पुष्कळसे विश्वास ठेवणारे पापकबुली देऊ लागले व ज्या वाईट गोष्टी त्यांनी केल्या होत्या, त्या सांगू लागले. 19काही विश्वास ठेवणाऱ्यांनी जादूची कामे केली होती, या विश्वास ठेवणाऱ्यांनी आपली सर्व जादूची पुस्तके लोकांसमोर आणली आणि जाळली, त्या पुस्तकांची किंमत पन्नास हजार चांदीच्या नाण्यांइतकी भरली. 20अशा रीतीने प्रभूच्या वचनाचा दूरवर प्रसार झाला व ते फार परिणामकारक ठरले.
पौलाचे पुढले बेत
21या गोष्टी घडल्यानंतर पौलाला पवित्र आत्म्याने सुचवले की, मासेदोनिया व अखया या प्रांतांतून प्रवास करीत पुढे यरूशलेम शहरास जायचे आहे, तो म्हणाला, “मी तेथे गेल्यांनतर मला रोम शहरही पाहिलेच पाहिजे.” 22म्हणून त्याचे दोन मदतनीस तीमथ्य व एरास्त यांना त्याने मासेदोनियाला पाठवून दिले आणि त्याने आणखी काही काळ आशियात घालविला.
इफिस येथील दंगल
23याकाळामध्ये ‘त्या मार्गाविषयी’#ख्रिस्ती चळवळीविषयी मोठा गोंधळ उडाला. 24देमेत्रिय नावाचा एक मनुष्य होता, तो सोनार होता, तो अर्तमी देवीचे देव्हारे बनवीत असे, जे कारागीर होते त्यांना यामुळे खूप पैसे मिळत. 25त्या सर्वांना व या धंद्याशी संबंध असलेल्या सर्वांना त्याने एकत्र केले आणि तो म्हणाला, लोकहो, तुम्हास माहीत आहे की, या धंद्यापासून आपल्याला चांगला पैसा मिळतो. 26पण पाहा तो पौल नावाचा मनुष्य काय करीत आहे तो काय म्हणत आहे ते ऐका! पौलाने पुष्कळ लोकांस प्रभावित केले आहे व बदलले आहे, त्याने हे इफिसमध्ये व सगळ्या आशियामध्ये केले आहे, तो म्हणतो, मनुष्यांच्या हातून बनवलेले देव खरे देव नाहीत. 27ह्यामुळे या आपल्या धंद्याची बदनामी होण्याचा धोका आहे; इतकेच नव्हे तर ज्या महादेवी अर्तमीची पूजा सर्व आशिया प्रांत किंबहूना जगसुद्धा करते तिचे देऊळ निरुपयोगी ठरण्याचा व तिचे स्वतःचे महत्त्व नष्ट होण्याचा धोका आहे.
28जेव्हा त्यांनी हे ऐकले तेव्हा ते फार रागावले आणि मोठ्याने ओरडून म्हणू लागले, “इफिसकरांची अर्तमी थोर आहे.” 29शहरातील लोकांमध्ये गोंधळ उडाला आणि लोकांनी गायस व अरीस्तार्ख या पौलाबरोबर सोबती म्हणून प्रवास करणाऱ्या मासेदोनियाच्या रहिवाश्यांना पकडून नाट्यगृहात नेले. 30पौल लोकांच्या पुढे जाऊ इच्छीत होता पण येशूचे अनुयायी त्यास असे करू देईनात. 31पौलाचे काही मित्र जे प्रांताधिकारी होते, त्यांनी निरोप पाठवून त्याने नाट्यगृहात जाऊ नये अशी कळकळीची विनंती केली. 32एकत्र जमलेल्या जमावातून काही लोक एक घोषणा करू लागले तर दुसरे लोक इतर घोषणा करू लागले, त्यामुळे सगळा जमाव अगदी गोंधळून गेला आणि त्यातील पुष्कळ जणांना माहीत नव्हते की, आपण या न्याय भवनात एकत्र का आलोत. 33यहूदी लोकांनी आलेक्सांद्र नावाच्या एका मनुष्यास ढकलीत नेऊन सर्वांच्या समोर उभे केले, तो आपल्या हातांनी खुणावून त्यांना समजावण्याचा प्रयत्न करू लागला. 34पण जेव्हा लोकांस समजले की, तो एक यहूदी आहे, तेव्हा जवळ जवळ दोन तास सातत्याने ते एका आवाजात ओरडत राहिले, “इफिसकरांची अर्तमी देवी थोर आहे.” 35शहराचा लेखनिक लोकांस शांत करीत म्हणाला, “इफिसच्या लोकांनो, थोर अर्तमी देवीचे व स्वर्गातून पडलेल्या पवित्र दगडाचे इफिस हे रक्षणकर्ते आहे, हे ज्याला माहीत नाही असा एकतरी मनुष्य जगात आहे काय? 36ज्याअर्थी या गोष्टी नाकारता येत नाहीत त्याअर्थी तुम्ही शांत राहिलेच पाहिजे, उतावळेपणा करू नये. 37तुम्ही या दोघांना#गायस व अरिस्तार्ख येथे घेऊन आलात, वस्तुतः त्यांनी मंदिरातील कशाचीही चोरी केली नाही किंवा आपल्या देवीची निंदा केलेली नाही. 38जर देमेत्रिय व त्याच्याबरोबर असलेल्या कारागिरांच्या काही तक्रारी असतील, तर त्यासाठी न्यायालये उघडी आहेत, तेथे ते एकमेकांवर आरोप करू शकतात. 39परंतु जर तुम्हास एखाद्या गोष्टीची चौकशी करायची असेल तर नियमित सभेत त्यासंबंधी विचार केला जाईल. 40आज येथे जे काही घडलेले आहे, त्याबद्दल योग्य ते कारण आपणांस सांगता येणार नाही, त्यामुळे आपणच ही दंगल सुरू केली असा आरोप आपल्यावर केला जाण्याची भीती आहे.” 41असे सांगून झाल्यानंतर त्याने जमावाला जाण्यास सांगितले.