प्रेषि. 20
20
मासेदोनीया, हेल्लास प्रांत व त्रोवस येथे पौल
1जेव्हा गोंधळ थांबला, तेव्हा पौलाने येशूच्या अनुयायांना भेटायला बोलावले आणि त्यांना उत्तेजन दिल्यानंतर त्यांचा निरोप घेतला आणि तो मासेदोनियाला निघाला. 2मासेदोनियातून जात असताना निरनिराळ्या ठिकाणी असलेल्या येशूच्या अनुयायांना त्याने अनेक गोष्टी सांगून धीर दिला, मग पौल ग्रीसला आला. 3त्याठिकाणी तो तीन महिने राहिला, पौल सिरीया प्रांताला समुद्रमार्गे निघाला असता, यहूदी लोकांनी त्याच्याविरुध्द कट रचला, हे पाहून त्याने मासेदोनियातून परत फिरण्याचे ठरवले. 4त्याच्याबरोबर काही लोक होते ते असेः बिरुया नगराच्या पुर्राचा मुलगा सोपत्र, थेस्सलनीका येथील अरिस्तार्ख व सकुंद, दर्बे येथील गायस आणि तीमथ्य, तुखिक व त्रफिम हे आशिया प्रांतातील होते. 5ही माणसे आमच्यापुढे गेली व त्रोवस शहरात आमची वाट पाहू लागली. 6बेखमीर भाकरीच्या यहूदी सणानंतर आम्ही फिलीप्पै येथून समुद्रमार्गे निघालो आणि पाच दिवसानी त्रोवस येथे त्यांना जाऊन भेटलो व तेथे सात दिवस राहिलो.
युतुख
7मग आठवड्याच्या पहिल्या दिवशी आम्ही सर्व भाकर मोडण्यासाठी एकत्र जमलो असताना, पौल त्यांच्याबरोबर बोलू लागला कारण दुसऱ्या दिवशी निघण्याचा त्याचा बेत होता, तो मध्यरात्रीपर्यंत बोलत राहीला. 8माडीवरच्या ज्या खोलीत आम्ही जमा झालो होतो तेथे पुष्कळ दिवे होते. 9युतुख नावाचा एक तरुण खिडकीत बसला होता, पौल बोलत असताना त्याच्यावर झोपेचा इतका अंमल चढला की, तो तिसऱ्या मजल्यावरून खाली पडला, जेव्हा त्यास उचलले, तेव्हा तो मरण पावलेला आढळला. 10पौल खाली गेला व त्याच्यावर ओणवा पडला आणि त्यास आपल्या हातांनी कवेत धरून म्हणाला, “चिंता करू नका! त्याच्यात अजून जीव आहे.” 11मग पौल वर गेला, त्यांने भाकर मोडली व ती खाल्ली, पहाट होईपर्यंत तो त्यांच्याशी बोलला, मग तो गेला. 12त्या तरुणाला त्यांनी जिवंत असे घरी नेले, त्या सर्वांना फार समाधान झाले.
मिलेताचा प्रवास
13तेथून आम्ही पुढे निघालो व अस्सा या नगरी समुद्रमार्गे निघालो, तेथे आम्ही पौलाला घेणार होतो, त्यानेच अशाप्रकारे योजना केली होती, ती म्हणजे त्याने स्वतः पायी जायचे. 14जेव्हा आम्हास तो अस्सा येथे भेटला, तेव्हा आम्ही त्यास जहजात घेतले आणि आम्ही मितुलेनेशहरास गेलो. 15दुसऱ्या दिवशी आम्ही जहाजाने मितुलेनाहून निघालो व खियास बेटावर आलो, मग दुसऱ्या दिवशी सामा बेट ओलांडले आणि एक दिवसानंतर मिलेत शहरास आलो. 16कारण पौलाने ठरवले होते की इफिस येथे थांबायचे नाही, आशियात त्यास जास्त वेळ थांबायचे नव्हते, तो घाई करीत होता कारण शक्य झाल्यास पन्नासाव्या दिवसाच्या सणासाठी त्यास यरूशलेम शहरात रहावयास हवे होते.
मिलेत तेथे इफिसाच्या वडीलवर्गाशी पौलाने वियोगसमयी केलेले भाषण
17मिलेताहून इफिस येथे निरोप पाठवून पौलाने तेथील मंडळीच्या वडीलजनांना बोलावून घेतले.
18जेव्हा ते आले, तेव्हा तो त्यांना म्हणाला, आशियात आलो त्या दिवसापासून मी तुमच्या सोबत असताना कसा राहिलो हे तुम्हास माहीत आहे. 19मी प्रभूची सेवा पूर्ण नम्रतेने व रडून केली, यहूदी लोकांनी केलेल्या कटामुळे निर्माण झालेल्या उपद्रवांना तोंड देत मी त्याची सेवा केली. 20जे काही तुमच्या चांगल्यासाठी होते ते तुम्हास सांगण्यासाठी कोणतीही कसर ठेवली नाही, हे तुम्हास माहीत आहे आणि या गोष्टी जाहीरपणे व घराघरातून सांगण्यासाठी मी कधीही मागेपुढे पाहिले नाही. 21पश्चात्ताप करून देवाकडे वळण्याविषयी आणि आपल्या प्रभू येशूवरील विश्वासाविषयी यहूदी व ग्रीक लोकांस सारखीच साक्ष दिली. 22आणि आता आत्म्याच्या आज्ञेने यरूशलेम शहरास चाललो आहे आणि तेथे माझ्याबाबतीत काय घडेल हे माहीत नाही. 23मला फक्त एकच गोष्ट माहीत आहे की प्रत्येक शहरात पवित्र आत्मा मला सावध करतो, तुरुंगवास व संकटे माझी वाट पाहत आहेत हे तो मला सांगतो. 24मी माझ्या जीवनाविषयी काळजी करीत नाही, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी माझे काम पूर्ण करणे, प्रभू येशूने जे काम मला दिले ते मला पूर्ण करायला पाहिजे ते काम म्हणजे देवाच्या कृपेबद्दल ची सुवार्ता लोकांस सांगितली पाहिजे. 25राज्याची घोषणा करीत ज्या लोकात मी फिरलो त्या तुम्हातील कोणालाही मी पुन्हा कधीही दिसणार नाही हे आता मला माहीत आहे. 26म्हणून मी तुम्हास जाहीरपणे सांगतो की, सर्वांच्या रक्तासंबंधाने मी निर्दोष असा आहे. 27देवाची संपूर्ण इच्छा काय आहे हे प्रकट करण्यास मी कधीही मागेपुढे पाहिलेले नाही. 28तुमची स्वतःची व देवाच्या सर्व लोकांची, ज्याना देवाने तुम्हास दिलेले आहे, त्यांची काळजी घ्या, कळपाची #देवाच्या लोकांचीकाळजी घेण्याचे काम पवित्र आत्म्याने तुम्हास दिलेले आहे, तुम्ही मंडळीसाठी मेंढपाळासारखे असले पाहिजे, ही मंडळी देवाने स्वतःचे रक्त देऊन विकत घेतली. 29मला माहीत आहे की, मी गेल्यावर तुमच्यामध्ये भयंकर असे दुष्ट लांडगे येतील, ते कळपाला सोडणार नाहीत. 30तुमच्यामधूनसुद्धा लोक उठून शिष्यांना, चुकीचे असे शिकवून आपल्यामागे घेऊन जातील. 31यासाठी सावध राहा, तुम्हातील प्रत्येकाला गेले तीन वर्षे डोळ्यांत अश्रू आणून सावध करण्याचे मी कधीच थांबविले नाही हे आठवा. 32आणि आता मी तुम्हास देवाच्या व वचनाच्या कृपेच्या अधीन करतो, जी तुमची वाढ करण्यासाठी समर्थ आहे व सर्व पवित्र केलेल्यांमध्ये वतन द्यावयाला समर्थ आहे. 33मी कोणाच्याही सोन्याचा, चांदीचा व कपड्यांचा लोभ धरला नाही. 34मी आपल्या स्वतःच्या व माझ्याबरोबर राहणाऱ्यांच्या गरजा माझ्या हातांनी भागविल्या हे तुम्हास चांगले माहीत आहे. 35अशा रीतीने मी तुम्हास उदाहरण घालू दिले आहे की जे दुर्बल आहेत अशांना आपण स्वतः मेहनत करून मदत केली पाहिजे व प्रभू येशूचे शब्द लक्षात ठेवले पाहिजेत, तो स्वतः म्हणाला, “घेण्यापेक्षा देणे अधिक धन्यतेचे आहे.”
36आणि हे बोलल्यावर पौलाने गुडघे टेकले आणि प्रार्थना केली. 37तेव्हा प्रत्येकाला खूपच रडू आले, ते पौलाच्या गळ्यात पडले व त्याचे मुके घेत राहिले. 38ते पुन्हा त्यास कधीही पाहू शकणार नाहीत, या वाक्याने त्यांना फार दुःख झाले, मग ते त्यास जहाजापर्यंत निरोप देण्यास गेले.
सध्या निवडलेले:
प्रेषि. 20: IRVMar
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
MAR-IRV
Creative Commons License
Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.