YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषि. 9

9
शौलाचा पालट
1शौल यरूशलेम शहरामध्ये प्रभूच्या अनुयायांना अजूनही धमकावण्याचा व जिवे मारण्याचा प्रयत्न करीत होता, म्हणून तो महायाजकाकडे गेला. 2शौलाने दिमिष्क येथील सभास्थानातील महायाजकाकडून ख्रिस्ताच्या अनुयायांना पकडण्यासाठी अशी अधिकारपत्रे मागितली की, जर त्यास तेथे कोणी ‘तो मार्ग’ अनुसरणारा#विश्वास ठेवणारा, मग तो पुरूष असो अथवा स्त्री, सापडले तर त्याने त्यांना बांधून यरूशलेम शहरास आणावे. 3मग शौल दिमिष्काजवळ आला तेव्हा एकाएकी, आकाशातून फारच प्रखर प्रकाश त्याच्याभोवती चमकला; 4शौल जमिनीवर पडला आणि एक वाणी त्याच्याशी बोलताना त्याने ऐकली, “शौला, शौला, तू माझा छळ का करतोस?” 5शौल म्हणाला, “प्रभू तू कोण आहेस?” ती वाणी म्हणाली, “मी येशू आहे, ज्याचा तू छळ करीत आहेस तो मीच आहे; 6आता ऊठ, आणि नगरात जा, तुला काय करायचे आहे, ते तुला तेथे कोणीतरी सांगेल.” 7जी माणसे शौलाबोबर प्रवास करीत होती, ती तेथेच स्तब्ध उभी राहिली त्या लोकांनी आवाज ऐकला, पण त्यांना कोणी दिसले नाही. 8शौल जमिनीवरून उठला, त्याने डोळे उघडले, पण त्यास काहीच दिसेना, म्हणून जे लोक त्याच्याबरोबर होते त्यांनी त्याचा हात धरून त्यास दिमिष्क शहरात नेले. 9तीन दिवसांपर्यंत शौलाला काहीच दिसत नव्हते, त्याने काही खाल्ले किंवा प्याले नाही.
दिमिष्कामध्ये शौल
प्रेषि. 22:6-16; 26:12-18
10दिमिष्कांमध्ये येशूचा एक शिष्य होता त्याचे नाव हनन्या होते; प्रभू त्याच्याशी एका दृष्टांतात बोलला तो म्हणाला, “हनन्या.” हनन्याने उत्तर दिले, “मी इथे आहे, प्रभू.” 11प्रभू हनन्याला म्हणाला, “ऊठ आणि नीट नावाच्या रस्त्यावर जा, तेथे यहूदाचे घर शोध व तार्सस शहराहून आलेल्या शौल नावाच्या व्यक्तीबद्दल विचार सध्या तो तेथे आहे; व प्रार्थना करीत आहे. 12शौलाने दृष्टांतात पाहिले की त्यामध्ये हनन्या नावाचा मनुष्य आपल्याकडे आला, असून आपल्यावर हात ठेवत आहे व त्यानंतर त्यास पुन्हा दृष्टी प्राप्त झाली, असे त्यास दिसले.” 13परंतु हनन्याने उत्तर दिले, “प्रभू, मी त्या मनुष्याविषयी अनेक लोकांच्या तोंडून ऐकले आहे; यरूशलेम शहरातील तुझ्या संतांशी तो किती वाईट रीतीने वागला हे मी ऐकले आहे. 14आणि आता जे तुझ्या नावावर विश्वास ठेवतात अशा लोकांस बांधून नेण्यासाठी मुख्य याजकांकडून अधिकारपत्र घेऊन हा शौल येथे आला आहे.” 15परंतु प्रभू म्हणाला, “जा, राजांना आणि परराष्ट्रांना आणि इस्राएलाचे संतान यांच्यासमोर माझे नाव घेऊन जाण्याकरता तो माझे निवडलेले पात्र आहे. 16माझ्या नावाकरीता ज्या गोष्टी त्यास सहन कराव्या लागतील त्या मी त्यास दाखवून देईन,” 17हनन्या निघाला आणि यहूदाच्या घरी गेला, त्याने शौलाच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हटले, “शौल, भाऊ, प्रभू येशूने तुला इकडे येत असता रस्त्यावर दर्शन दिले त्यानेच मला तुझ्याकडे पाठवले, यासाठी की, तुला पुन्हा दृष्टी यावी व तू पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हावे.” 18लागलीच खपल्यासारखे काहीतरी शौलाच्या डोळ्यावरून खाली पडले, आणि त्यास पुन्हा दृष्टी आली शौल तेथून उठल्यावर त्याचा बाप्तिस्मा करण्यात आला. 19नंतर त्याने अन्न सेवन केल्यावर त्याच्या अंगात शक्ती आली, शौल काही दिवस दिमिष्क येथील शिष्यांबरोबर राहिला. 20यानंतर सरळ सभास्थानात जाऊन शौल येशूच्या नावाची घोषणा करू लागला, येशू हा देवाचा पुत्र आहे. 21ज्या लोकांनी शौलाचे बोलणे ऐकले त्या सर्वांना मोठे नवल वाटले ते म्हणाले, “यरूशलेम शहरातील ज्या लोकांचा येशूच्या नावावर विश्वास आहे, त्या सर्वाचा नाश करू पाहणारा हाच नाही काय? तो येशूच्या अनुयायांना अटक करण्यासाठी येथे आला आहे व तो त्यांना यरूशलेम शहरातील मुख्य याजकांसमोर उभे करणार आहे.” 22परंतु शौल अधिकाधिक सामर्थ्यशाली होत गेला, त्याने हे सिद्ध केले की, येशू हाच ख्रिस्त आहे आणि त्याचे पुरावे इतके सबळ होते. दिमिष्क येथील यहूदी त्याच्याबरोबर वाद घालू शकले नाहीत. 23काही दिवसानंतर, यहूदी लोकांनी शौलाला जिवे मारण्याचा कट रचला. 24यहूदी रात्रंदिवस शहराच्या वेशीवर पहारा देत होते व शौलाला पकडण्याची वाट पाहत होते. त्यांना शौलाला ठार मारायचे होते, पण त्यांचा हा बेत शौलास समजला. 25एके रात्री शौलाने ज्यांना शिक्षण दिले होते अशा काही अनुयायांनी शहरातून जाण्यासाठी शौलाला मदत केली, अनुयायांनी शौलाला एका टोपलीत ठेवले, नंतर त्यांनी टोपली गावकुसावरून रात्रीच्या वेळी खाली सोडली.
यरूशलेम व तार्स येथे शौल
26नंतर शौल यरूशलेमे शहरास गेला तेथील विश्वास ठेवणाऱ्यांच्या परिवारात मिसळण्याचा त्याने प्रयत्न केला, पण ते त्यास घाबरत होते, त्यांचा विश्वासच बसत नव्हता, शौल खरोखर येशूचा शिष्य झाला आहे. 27परंतु बर्णबाने शौलाचा स्वीकार केला व त्यास घेऊन प्रेषितांकडे गेला. बर्णबाने सांगितले की, शौलाने येशूला दिमिष्कच्या रस्त्यावर पाहिले आहे, येशू त्याच्याशी कसा बोलला हेही त्याने सविस्तरणे सांगितले, मग त्याने प्रेषितांना सांगितले की, येशूविषयीची सुवार्ता शौलाने मोठ्या धैर्याने दिमिष्क येथील लोकांस सांगितली. 28मग शौल अनुयायांसह तेथे राहिला, तो यरूशलेम शहरामध्ये सगळीकडे गेला. व धैर्याने प्रभूची सुवार्ता सांगू लागला. 29शौल नेहमी ग्रीक भाषा बोलणाऱ्या यहूदी लोकांशी बोलत असे तो त्यांच्याशी वादविवाद करीत असे, पण ते त्यास मारण्याचा प्रयत्न करीत होते. 30जेव्हा बंधुजनांना हे कळाले तेव्हा त्यांनी त्यास कैसरीया येथे नेले, व नंतर तेथून त्यास तार्सास पाठवले.
31अशाप्रकारे सर्व यहूदिया, गालील प्रांत, शोमरोन या प्रदेशातील मंडळीस तेथे शांती लाभली; आणि, मंडळी पवित्र आत्म्याच्या सांत्वनेत व परमेश्वराच्या भयात वाढत गेली. 32मग असे झाले की, पेत्र यरूशलेम शहराच्या सभोवतालच्या गावामध्ये फिरला, लोद या गावामध्ये जे देवाचे पवित्रजन होते त्यांना भेटला. 33लोद येथे त्यास ऐनेयास नावाचा मनुष्य आढळला, त्याच्या अंगातून वारे गेल्याने तो पंगू झाला होता व आठ वर्षे अंथरुणाला खिळून होता. 34पेत्र त्यास म्हणाला, “ऐनेयास, येशू ख्रिस्त तुला बरे करीत आहे; ऊठ, आपले अंथरुण नीट कर.” ऐनेयास ताबडतोब उभा राहिला. 35लोद येथे राहणाऱ्या सर्व लोकांनी आणि शारोनात राहणाऱ्यांनी त्यास पाहिले, तेव्हा ते सर्व प्रभूकडे वळले.
दुर्कस
36यापो शहरात येशूची एक शिष्या राहत होती, तिचे नाव तबिथा होते, (ग्रीक भाषेत तिचे नाव “दुर्कस” होते. त्याचा अर्थ हरीण) ती नेहमी लोकांसाठी चांगली कामे करीत असे गरीबांना दानधर्म करीत असे. 37जेव्हा पेत्र लोदमध्ये होता, तेव्हा तबिथा आजारी पडली व मरण पावली; लोकांनी तिला आंघोळ घालून व माडीवरच्या एका खोलीत ठेवले. 38यापो येथील शिष्यांनी ऐकले की, पेत्र लोदमध्ये आहे, लोद हे यापोजवळ आहे, म्हणून त्यांनी दोन माणसे पाठविली, त्यांनी त्यास विनंती केली, ते म्हणाले, “त्वरा करा, आमच्याकडे लवकर या.” 39पेत्र तयार झाला व त्यांच्याबरोबर गेला, जेव्हा तो तेथे पोहोचला तेव्हा त्यांनी त्यास माडीवरच्या एका खोलीत नेले, सर्व विधवा स्त्रिया पेत्राभोवती उभ्या राहिल्या, त्या रडत होत्या, दुर्कस #तबीथा जिवंत असताना जे कपडे व झगे तिने तयार केले होते ते त्यांनी पेत्राला दाखवले. 40पेत्राने खोलीतील सर्वांना बाहेर काढले त्याने गुडघे टेकून प्रार्थना केली आणि दुर्कसच्या शरीराकडे वळून तो म्हणाला, “तबिथा ऊठ” तेव्हा तिने डोळे उघडले, जेव्हा तिने पेत्राला पाहीले तेव्हा ती उठून बसली. 41त्याने तिला आपला हात देऊन उभे राहण्यास मदत केली, नंतर त्याने पवित्रजनांना आणि विधवा स्त्रियांना खोलीमध्ये बोलावले, त्याने तबिथाला त्यांना दाखवले, ती जिवंत होती. 42यापोमधील सर्व लोकांस हे समजले, यातील पुष्कळ लोकांनी प्रभूवर विश्वास ठेवला. 43नंतर असे झाले की, तो यापोत शिमोन नावाच्या कोणाएका कातडे कमावणाऱ्या चांभाराच्या येथे बरेच दिवस राहीला.

सध्या निवडलेले:

प्रेषि. 9: IRVMar

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन