एस्ते. 2
2
एस्तेर पट्टराणी होते
1या गोष्टी झाल्यानंतर, राजा अहश्वेरोशचा राग शमला, त्याने वश्तीची आणि तिने जे काय केले त्याचा विचार केला. तिच्याविरूद्ध दिलेल्या आदेशाचाहि त्याने विचार केला. 2तेव्हा राजाच्या सेवेतील तरुण सेवक त्यास म्हणाले की, राजासाठी तरुण, सुंदर कुमारींचा शोध घ्यावा.
3आपल्या राज्यातील प्रत्येक प्रांतातून राजाने एकेक अधिकारी नेमावा, त्या अधिकाऱ्यांनी सर्व सुरेख व सुंदर कुमारीकांना शूशन राजवाड्यात अंत:पुरात ठेवावे. तेथे राजाचा अधिकारी हेगे, याच्या निगराणीखाली स्त्रीयांना त्यांच्या ताब्यात द्यावे आणि त्याने त्यांना त्यांची सौंदर्य प्रसाधने द्यावीत. 4त्यांच्यामधून मग जी तरुण कन्या राजाला पसंत पडेल तिला वश्तीच्या जागी राणीपद मिळावे. राजाला ही सूचना आवडली आणि त्याने ती मान्य केली.
5बन्यामीनाच्या घराण्यातील मर्दखय नावाचा एक यहूदी शूशन शहरात होता. तो याईराचा पुत्र आणि याईर शिमईचा पुत्र आणि शिमई कीश याचा पुत्र होता. 6बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याने यहूदाचा राजा यखन्या याच्याबरोबर जे लोक पकडून नेले होते त्यांच्यामध्ये यालाही यरूशलेमेहून पकडून नेले होते.
7तो आपल्या चुलत्याची कन्या हदस्सा, म्हणजे एस्तेर, हिची काळजी घेत असे. कारण तिला आईवडील नव्हते. मर्दखयाने तिला आपली स्वतःची कन्या मानून वाढवले होते. ती तरुण स्त्री सुंदर बांध्याची आणि अतिशय रुपवती होती.
8जेव्हा राजाची आज्ञा लोकांपर्यंत पोचल्यावर, पुष्कळ मुलींना शूशन राजवाड्यात आणून हेगेच्या देखभालीखाली ठेवण्यात आले. त्या मुलींमध्ये एस्तेरही होती. हेगे राजाच्या जनानखान्याचा प्रमुख होता. 9त्यास ती तरुणी आवडली आणि तिच्यावर त्याची कृपादृष्टी झाली. त्याने तिला ताबडतोब सौंदर्यप्रसाधने पुरवली आणि तिच्या अन्नाचा भाग दिला. त्याने राजाच्या राजवाड्यातील सात दासी नेमून तिला दिल्या आणि तिला व तिच्या सात तरुण दासींना त्याने अंत:पुरातील उत्तम जागा राहण्यास दिली.
10मर्दखयाने बजावल्यामुळे एस्तेरने आपल्या लोकांविषयी व नातलगांविषयी कोणालाही सांगितले नव्हते. 11आणि एस्तेर कशी आहे व तिचे काय होणार हे जाणून घेण्यासाठी मर्दखय प्रत्येक दिवशी अंतःपुराच्या अंगणासमोर फेऱ्या घालीत असे.
12स्त्रियांसाठी केलेल्या नियमाप्रमाणे, बारा महिने झाल्यावर, अहश्वेरोश राजाकडे जाण्याची पाळी एकेका तरुणीला येत असे. तिला बारा महिने सौंदर्योपचार घ्यावे लागत. त्यापैकी सहा महिने गंधरसाच्या तेलाचे तर सहा महिने सुंगधी द्रव्ये आणि प्रसाधने यांचे उपचार होत असत. 13आणि राजाकडे जायच्या वेळी अशी पध्दत होती, अंत:पुरातून राजमंदिरात जाण्यासाठी जे काही ती मागे ते तिला मिळत असे.
14संध्याकाळी ती राजाकडे जाई आणि सकाळी ती दुसऱ्या अंतःपुरात परत येत असे. तिथे शाशगज नावाच्या खोजाच्या हवाली केले जाई. शाशगज हा राजाच्या उपपत्नीची देखरेख करणारा खोजा होता. राजाला जी कन्या पसंत पडेल तिला तो नांव घेऊन बोलावत असे. एरवी या मुली पुन्हा राजाकडे जात नसत. 15आता एस्तेरची राजाकडे जायची पाळी आली तेव्हा स्त्रियांचा रक्षक राजाचा खोजा हेगे याने जे तिला देण्याचे ठरविले होते त्याहून अधिक काही मागून घेतले नाही. (मर्दखयाचा चुलता अबीहाईल याची कन्या जिला मर्दखयाने कन्या मानले होते) आता ज्या कोणी एस्तेरला पाहीले त्या सर्वांची कृपादृष्टी तिच्यावर झाली.
16तेव्हा अहश्वेरोश राजाच्या महालात एस्तेरची रवानगी झाली. तो राजाच्या कारकिर्दीच्या सातव्या वर्षातला दहावा म्हणजे तेबेथ महिना होता.
17इतर सर्व मुलींपेक्षा राजाने एस्तेरवर अधिक प्रीती केली. आणि इतर सर्व कुमारीहून तिजवर त्याची मर्जी बसली व तिच्यावर कृपादृष्टी झाली. तेव्हा राजा अहश्वेरोशने एस्तेरच्या मस्तकावर राजमुकुट घालून वश्तीच्या जागी तिला राणी केले. 18आपले सर्व प्रमुख अधिकारी सेवक यांना राजाने एस्तेरसाठी मोठी मेजवानी दिली. सर्व प्रांतांमध्ये त्याने लोकांस कर माफी जाहीर केली. आपल्या उदारपणाप्रमाणे त्याने लोकांस बक्षीसे दिली.
मर्दखय राजाविरुद्धचा कट उघडकीस आणतो
19आता सर्व मुली दुसऱ्यांदा एकत्र जमल्या तेव्हा मर्दखय राजद्वारी बसला होता. 20एस्तेरने आपले लोक व नातलगाविषयी कोणाला कळू दिले नव्हते. कारण मर्दखयाने तिला तसे बजावले होते. तो तिचा सांभाळ करत असताना ती त्याचे ऐकत असे तशीच ती अजूनही त्याच्या आज्ञेत होती. 21मर्दखय राजद्वारी बसलेला असताना, बिग्थान व तेरेश प्रवेशद्वारातील राजाचे अधिकारी, राजावरील रागाने, राजा अहश्वेरोशला मारून टाकण्याचा कट करु लागले.
22पण मर्दखयाला त्यांचा बेत कळल्यामुळे त्याने राणी एस्तेरला खबर दिली. राणी एस्तेरने मर्दखयाला या कटाचा सुगावा लागला असे राजाला सांगितले. 23मग या बातमीचा तपास करण्यात आला आणि खबर खरी असल्याचे आढळून आले आणि त्या दोघा पुरुषांना फाशी देण्यात आले आणि या सर्व गोष्टी राजासमक्ष राजांच्या इतिहासाच्या ग्रंथात नोंदवून ठेवण्यात आल्या.
सध्या निवडलेले:
एस्ते. 2: IRVMar
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
MAR-IRV
Creative Commons License
Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.