एस्ते. 9
9
यहूदी आपल्या शत्रूचा धूव्वा उडवतात
1आता बाराव्या महिन्याच्या म्हणजे अदार महिन्याच्या तेराव्या दिवशी लोकांस राजाच्या आज्ञेचे व हुकूमाचे पालन करायचे होते, यहूद्यांच्या शत्रूंनी त्यांच्यावर वरचढ होण्याची आशा धरली होती पण त्याच्या उलट झाले, जे यहूद्यांचा द्वेष करत होते त्या शत्रूंपेक्षा यहूदी आता वरचढ झाले होते. 2आपल्याला नेस्तनाबूत करु पाहणाऱ्या लोकांचा जोरदार प्रतिकार करता यावा म्हणून राजा अहश्वेरोशच्या राज्यातील सर्व ठिकाणचे यहूदी आपआपल्या नगरात एकत्र आले. त्यामुळे त्यांच्या विरोधात जायची कोणामध्येच ताकद नव्हती म्हणून यहूद्यांना ते लोक घाबरले.
3शिवाय, सर्व प्रांतामधले अधिकारी, अधिपती, सरदार, आणि राजाचे कारभारी यांनी यहूद्यांना सहाय्य केले, कारण ते सगळे मर्दखयाला घाबरत होते. 4मर्दखय राजवाड्यातील मोठा व्यक्ती असून त्याची किर्ती राज्यातील सर्वापर्यंत पोहचली होती, मर्दखयाचे सामर्थ्य उत्तरोत्तर वाढत गेले. 5यहूद्यांनी आपल्या सर्व शत्रूंचा पाडाव केला. तलवार चालवून त्यांनी शत्रूला ठार केले व शत्रूंचा विध्वंस केला. आपला तिरस्कार करणाऱ्या शत्रूचा आपल्या इच्छेप्रमाणे समाचार घेतला.
6शूशन या राजधानीच्या शहरात यहूद्यांनी पाचशेजणांचा वध करून धुव्वा उडवला. 7शिवाय त्यांनी पुढील लोकांस ठार केले. पर्शन्दाथा, दलफोन, अस्पाथा, 8पोराथा, अदल्या, अरीदाथा, 9पर्मश्ता, अरीसई, अरीदय, वैजाथा, 10हे हामानाचे दहा पुत्र होते. हम्मदाथाचा पुत्र हामान यहूद्यांचा शत्रू होता. यहूद्यांनी या सर्वांना ठार केले खरे, पण त्यांची मालमत्ता लुटली नाही.
11तटबंदी असलेल्या शूशनमध्ये, त्यादिवशी किती जण मारले गेले ते राजाला सांगण्यात आले. 12तेव्हा राजा एस्तेर राणीला म्हणाला, “हामानाच्या दहा पुत्रासहीत यहूद्यांनी शूशनमध्ये पाचशे लोकांस मारले. आता राजाच्या इतर प्रांतांत काय करावे अशी तुझी इच्छा आहे? तुझी काय विनंती आहे? ती मान्य करण्यात येईल. तुझी काय मागणी आहे? ती तुझ्यासाठी मान्य करण्यात येईल.”
13एस्तेर म्हणाली, “राजाची मर्जी असेल तर शूशनमध्ये यहूद्यांना आजच्यासारखेच उद्या करु द्यावे आणि हामानाच्या दहा पुत्रांचे देहही खांबावर टांगावे.” 14तेव्हा राजाने तशी आज्ञा दिली. शूशनमध्ये तोच कायदा दुसऱ्या दिवशीही चालू राहिला. हामानाच्या दहा मुलांना टांगले गेले.
15अदार महिन्याच्या चौदाव्या दिवशी शूशनमधील यहूदी एकत्र जमले आणि त्यांनी शूशनमधल्या तीनशे जणांना जिवे मारले पण त्यांच्या संपत्तीची लूट केली नाही.
पुरीमाचा आनंदोत्सव
16त्यावेळी राजाच्या प्रांतांमधले यहूदीदेखील आपल्या संरक्षणासाठी एकत्र जमले आणि आपल्या शत्रुपासून त्यांना विसावा मिळाला. जे त्यांचा द्वेष करत होते त्या पंचाहत्तर हजार लोकांस त्यांनी ठार केले, पण त्यांनी ज्यांना ठार केले त्यांच्या मालमत्तेला हात लावला नाही.
17अदार महिन्याच्या तेराव्या दिवशी हे घडले चौदाव्या दिवशी यहूद्यांनी विश्रांती घेतली आणि तो दिवस त्यांनी आनंदोत्सवाचा व मेजवाणीचा ठरविला. 18परंतु शूशनमधील यहूदी अदार महिन्याच्या तेराव्या आणि चौदाव्या दिवशी एकत्र आले होते. मग पंधराव्या दिवशी त्यांनी आराम केला. पंधरावा दिवस त्यांनी मेजवाणीचा व आनंदोत्सवाचा ठरविला. 19म्हणून खेडोपाडी राहणारे जे यहूदी गावकूस नसलेल्या गावात राहतात ते अदारच्या चतुर्दशीला पुरीम हा सण साजरा करतात. त्यांचा सण चतुर्दशीला असतो. त्यादिवशी ते मेजवान्या देतात आणि भेटवस्तूंची देवाणघेवाण करतात.
20मर्दखयाने जे घडले त्याची नोंद केली आणि त्याने राजा अहश्वेरोशच्या प्रांतातील जवळ व दूरच्या सर्व प्रांतातील यहूद्यांना पत्रे पाठवली, 21दरवर्षी अदार महिन्याचा चौदावा आणि पंधरावा दिवसही अगत्याने पाळावा, 22त्या दिवशी यहूद्यांना आपल्या शत्रूंपासून विसावा मिळाला म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करावा. या महिन्यात त्यांच्या शोकाचे रुपांतर आनंदात झाले. म्हणून हा महिनाही उत्सवासारखा साजरा करावा. या महिन्यात त्यांच्या आक्रोशाचे रुपांतर आनंदोत्सवाच्या दिवसात झाले. मर्दखयाने सर्व यहूद्यांना पत्रे लिहिली. सणासुदीचे दिवस म्हणून त्याने हे दिवस त्यांना साजरे करायला सांगितले. त्या दिवशी त्यांनी मेजवान्या द्याव्यात, भेटवस्तूंची देवाणघेवाण करावी आणि गरिबांना भेटवस्तू द्याव्यात.
23मर्दखयाने त्यांना लिहिले होते त्याप्रमाणे यहूद्यांनी सुरवात केली होती तो उत्सव त्यांनी पुढेही चालू ठेवला. 24हम्मदाथाचा पुत्र अगागी हामान सर्व यहूद्यांचा शत्रू होता. त्याने यहूद्यांचा नायनाट करण्याचे कपटी कारस्थान रचले होते. यहूद्यांच्या संहारासाठी त्याने चिठ्ठी टाकून दिवस ठरवला होता. 25परंतु राजासमोर ही गोष्ट आली तेव्हा त्याने अशी लिखीत आज्ञा काढली की, कपटी हामानाने यहूदी लोकांविरूद्ध रचलेल्या कारस्थानाचा दोष त्यांच्या माथी मारावा आणि त्यास व त्याच्या पुत्रांना फाशी देण्यात यावी. 26यास्तव पूर या शब्दावरून “पुरीम” असे म्हणत, म्हणून या दिवसास “पुरीम” नाव पडले. कारण त्या पत्रामध्ये लिहिलेल्या सर्व गोष्टी, त्यांनी पाहिलेले सर्व काही आणि त्याच्याबाबतीत जे घडले होते त्यामुळे यहूद्यांनी ही प्रथा स्विकारली. 27यहूद्यांनी नवीन रीत व कर्तव्य स्विकारले. ही रीत आपल्यासाठी, आपल्या वंशजासाठी व जो प्रत्येकजन त्यांना जोडलेले आहे तो. आपण हे दोन दिवस प्रत्येक वर्षी साजरे करावेत. ते त्यांच्या नियमानुसार आणि प्रत्येकवर्षी त्याच वेळी साजरे करावे. 28प्रत्येक पिढी आणि प्रत्येक कुटुंब या दिवसाची आठवण ठेवते. सर्व प्रांतांमध्ये आणि सर्व नगरामध्ये हा दिवस साजरा केला जातो. पुरीमचे हे दिवस साजरे करण्याची प्रथा यहूदी कधीही सोडणार नाहीत. यहूद्यांचे वंशजही हा सण नेहमी लक्षात ठेवतील. 29मग अबीहाईल ची कन्या राणी एस्तेर आणि यहूदी मर्दखय यांनी पुरीमविषयी एक फर्मान लिहिले. हे दुसरे पत्र ही पूर्णपणे सत्य आहे हे सिध्द करण्यासाठी त्यांनी ते फर्मान राजाच्या पूर्ण अधिकारानिशी काढले. 30राजा अहश्वेरोशाच्या राज्यातील एकशेसत्तावीस प्रांतांमधील समस्त यहूद्यांना मर्दखयाने पत्रे लिहिली. त्यामध्ये शांतीची सत्य वचने होती. 31पुरीम साजरा करायला लोकांस सांगण्यासाठी मर्दखयाने ही पत्रे लिहिली. आणि हा नवीन सण केव्हा साजरा करायचा हे ही त्याने सांगितले. यहूदी मर्दखय आणि राणी एस्तेर यांनी यहूद्यांसाठी आदेश पाठवले होते. यहूद्यांमध्ये आणि त्यांच्या वंशजामध्ये हा दोन दिवसाचा सण पक्का रुजावा म्हणून त्या दोघांनी ही कृती केली. इतर सणांच्या दिवशी जसे ते उपवास करून आणि शोक करून तो सण आठवणीने पाळतात तसा हा सण त्यांनी इथून पुढे पाळावा. 32पुरीमचे नियम एस्तेरच्या आज्ञेने ठरविण्यात आले. आणि या गोष्टींची लेखी नोंद ग्रंथात झाली.
सध्या निवडलेले:
एस्ते. 9: IRVMar
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
MAR-IRV
Creative Commons License
Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.