33
पहारेकऱ्याचे कर्तव्य
1मग परमेश्वराचे वचन मजकडे आले व म्हणाले, 2“मानवाच्या मुला, तुझ्या लोकांशी बोल त्यांना सांग की, जेव्हा मी कोणत्याही देशाविरूद्ध तलवार आणीन, तेव्हा त्या देशाचे लोक आपल्यातील एका मनुष्यास घेतात आणि त्यास आपल्यासाठी पहारेकरी करतात. 3तो देशावर तलवार येत आहे असे पाहून आणि तो त्याचे शिंग फुंकून लोकांस सावध करतो. 4जर लोकांनी शिंगाचा आवाज ऐकला पण त्याकडे लक्ष दिले नाही, आणि जर त्यांच्यावर तलवार आली व त्यांना मारले, तर प्रत्येकाचे रक्त त्यांच्या स्वतःच्या डोक्यावर राहिल. 5जर कोणी एखाद्याने शिंगाचा आवाज ऐकला आणि लक्ष दिले नाही, त्याचे रक्त त्यावर राहिल. पण जर त्याने लक्ष दिले, तो आपला स्वतःचा जीव वाचवील. 6पण, कदाचित्, जर जसे पहारेकरी तलवार येत आहे असे पाहील, पण जर त्याने शिंग फुंकले नाही, त्याचा परीणाम लोकांस सावध केले नाही, आणि जर तलवार आली आणि कोणाचा जीव घेतला, तर तो त्याच्या पापात मरेल, पण त्याचे रक्त मी पहारेकऱ्याकडून मागून घेईन. 7आता, मानवाच्या मुला, मी तुला इस्राएलाच्या घराण्यासाठी पहारेकरी केले आहे. तू माझ्या मुखातून वचन ऐकून आणि माझ्यावतीने त्यांना सावध कर. 8जर मी दुष्टाला म्हणतो, अरे दुष्टा तू खचित मरशील, पण जर तू दुष्टाला त्याच्या मार्गापासून फिरवण्यासाठी तू त्यास बजावून सांगण्यासाठी त्याच्याशी बोलणार नाही तर तो दुष्ट आपल्या पापत मरेल, पण त्याचे रक्त मी तुझ्यापासून मागेन. 9पण तू त्या पाप्यास सावध करून कुमार्ग सोडून सन्मार्ग धरण्यास सांगितलेस आणि त्याने ह्यास नकार दिला, तर तो मनुष्य त्याच्या पापामुळे मरेल. पण तू वाचशील.
देवाचा मार्ग न्याय्य आहे
10म्हणून हे मानवाच्या मुला, इस्राएलाच्या घराण्याला सांग, तुम्ही म्हणता, की, आमचे अपराध व आमची पापे यांचा बोजा आम्हावर आहे व त्यामुळे त्यामध्ये आम्ही कुजत आहोत. आम्ही कसे जगावे? 11त्यांना सांग, प्रभू परमेश्वर असे म्हणतो, जसा मी जिवंत आहे, मला ‘दुष्टांच्या मरणाने आनंद होत नाही, कारण जर दुष्टाने आपल्या मार्गापासून पश्चाताप केला, तर मग तो जिवंत राहील! पश्चाताप करा! तुमच्या दुष्ट मार्गापासून पश्चाताप करा! कारण इस्राएल घराण्यांनो, तुम्ही का मरावे?’ 12आणि मानवाच्या मुला, तू तुझ्या लोकांस सांग, धार्मिक पाप करील तर त्याची धार्मिकता त्यास वाचविणार नाही. आणि दुष्टाने आपल्या पापाचा पश्चाताप केला तर दुष्टतेमुळे त्याचा नाश होणार नाही. कारण धार्मिक पाप करू लागला तर तो आपल्या धार्मिकतेमुळे वाचू शकणार नाही. 13जर मी धार्मिकाला म्हणालो, तो खचित जिवंत राहिल! आणि जर तो आपल्या धार्मिकतेवर भाव ठेवून अन्याय करील, तर त्याची सर्व धार्मिकतेची कृत्ये मी आठवणार नाही. त्याने केलेल्या दुष्कृत्यांमुळे तो मरेल. 14आणि जर मी दुष्टाला म्हणालो तू खचित मरशील! पण जर त्याने त्याच्या पापापासून पश्चाताप केला आणि जे काही योग्य व न्याय्य आहे ते केले, 15जर दुष्ट गहाण परत देईल, व जे चोरून घेतलेले ते परत भरून देईल, जर तो अन्याय न करता जीवनाच्या नियमांमध्ये वागेल तर तो वाचेलच, तो मरणार नाही. 16त्याने पूर्वी केलेली पापे मी स्मरणार नाही. जे योग्य व न्यायाने ते त्याने केले आहे, तो खचित जगेल. 17पण तुझे लोक म्हणतात, प्रभूचे मार्ग योग्य नाहीत, परंतु तुझे मार्ग योग्य नाहीत! 18जेव्हा धार्मिक आपल्या धार्मिकतेपासून फिरून व पाप करू लागला, तर तो त्यामध्ये मरेल. 19आणि जेव्हा दुष्ट आपल्या दुष्टतेपासून फिरून जे योग्य व न्याय्य आहे ते करतो तर तो त्या गोष्टीमुळे जगेल. 20पण तुम्ही लोक म्हणता, प्रभूचा मार्ग बरोबर नाही! इस्राएलाच्या घराण्यांनो मी तुमच्या प्रत्येकाचा न्याय त्याच्या मार्गाप्रमाणे करीन.”
यरूशलेमेच्या पाडावाचे वृत्त
21आमच्या बंदिवासाच्या बाराव्या वर्षाच्या दहाव्या महिन्याच्या पाचव्या दिवशी असे झाले की, यरूशलेमेमधून एक फरारी माझ्याकडे आला व म्हणाला, “नगर काबीज झाले आहे.” 22तो फरारी संध्याकाळी येण्यापूर्वी परमेश्वराचा हात माझ्यावर होता, आणि तो सकाळी माझ्याकडे येण्याच्या वेळी परमेश्वराने त्याने माझे मुख उघडले होते. म्हणून माझे मुख उघडे होते; मी मुका राहिलो नाही. 23मग परमेश्वराचे वचन मजकडे आले आणि म्हणाले, 24“मानवाच्या मुला, जे इस्राएल देशाच्या विध्वंस झालेल्या नगरातून राहत आहेत ते बोलतात व म्हणतात, अब्राहाम फक्त एकच पुरुष होता आणि त्यास या देशाचे वतन मिळाले परंतु आम्ही तर पुष्कळ आहोत! देश आम्हास वतनासाठी दिला आहे. 25म्हणून तू त्यांना सांग की प्रभू परमेश्वर, असे म्हणतो, तुम्ही रक्तासकट मांस खाता. तुम्ही आपल्या मूर्तीकडे डोळे लावता, तुम्ही लोकांचे रक्त पाडता. तर मग तुम्ही खरोखर देश वतन करून घ्याल का? 26तुम्ही तुमच्या स्वत:च्या तलवारीवर अवलंबून राहता आणि तुम्ही अमंगळ गोष्टी करता. प्रत्येक मनुष्य आपल्या शेजाऱ्याच्या पत्नीला अशुद्ध करतो, तुम्ही खरोखर देश वतन करून घ्याल का? 27तू त्यांना हे सांग की, प्रभू परमेश्वर असे म्हणतो, मी जिवंत आहे; त्या नाश झालेल्या नगरात राहणारे लोक तलवारीने खचित मारले जातील. जर एखादा शेतांत असेल, तर त्यास मी पशूचे भक्ष्य म्हणून देईन आणि जे कोणी किल्ल्यात व गुहेत आहेत ते मरीने मरतील. 28मग मी ती भूमी ओसाड व निर्जन करीन आणि त्याच्या सामर्थ्याचा गर्वाचा अंत होईल. इस्राएलचे पर्वत ओसाड होतील. तेथून कोणीही जाणारसुद्धा नाही. 29म्हणून त्यांनी ज्या अमंगळ गोष्टी केल्या त्यामुळे जेव्हा मी तो देश ओसाड आणि दहशत असा करीन. तेव्हा त्यांना समजेल की, मीच परमेश्वर आहे. 30आणि, मानवाच्या मुला, आता तुझ्याबद्दल तुझे लोक भिंतीला टेकून, त्यांच्या घराच्या दारांत उभे राहून, व एक दुसऱ्याशी व प्रत्येक आपल्या भावाशी बोलतो, ते म्हणतात चला, व परमेश्वराकडून संदेष्ट्याकडे आलेले वचन जाऊन ऐकू या. 31म्हणून ते लोक येत असतात तसे ते तुझ्याकडे येतात. आणि ते माझ्या लोकांप्रमाणे तुझ्यापुढे बसतात तुझी वचने ऐकतात, परंतु ते ती आचरीत नाहीत. जरी ते आपल्या मुखाने फार प्रीती दाखवतात तरी त्यांचे चित्त त्यांच्या लाभाच्या मागे चालत जाते. 32कारण पाहा, ज्याचा स्वर गोड व तू त्यांना मनोहर गीतासारखा, तंतुवाद्यांवर मधुर आवाजात वाजवणारा, असा तू त्यांना आहे. म्हणून ते तुझे वचने ऐकतात, पण त्याप्रमाणे ते चालत नाहीत. 33म्हणून जेव्हा हे सर्व होईल, पाहा! हे होईल! मग त्यांना समजेल की आपल्यामध्ये एक संदेष्टा होता.”