YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यिर्म. 46

46
मिसराविषयीची भविष्ये
1परमेश्वराचे वचन राष्ट्रांविषयी यिर्मया संदेष्ट्याकडे आले ते असे. 2मिसरासाठीः मिसराचा राजा फारो नखो याचे जे सैन्य फरात नदीजवळ कर्कमीशात होते. योशीयाचा मुलगा यहोयाकीम यहूदाचा राजा याच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सर याने पराभव केला. त्याविषयीः
3लहान ढाली व मोठ्या ढाली तयार करा आणि लढावयास कूच करा
4तुम्ही स्वारांनो घोडे जुंपून त्यावर बसा, तुमच्या शिरावर शिरस्त्राण घालून तुमची जागा घ्या.
भाल्यांना धार करा आणि तुमचे चिलखत घाला.
5हे मी काय पाहतो? ते भयभीत झाले आहेत आणि दूर पळत आहेत, कारण त्यांच्या सैनिकांचा पराभव झाला आहे. ते संरक्षणासाठी पळत आहेत आणि मागे वळून पाहत नाहीत. असे परमेश्वर म्हणतो.
6चपळ दूर पळून जाऊ शकणार नाहीत आणि सैनिक निसटू शकणार नाहीत.
ते अडखळतील आणि फरात नदीच्या उत्तरेस पडतील.
7नील नदीप्रमाणे हा कोण चढून येत आहे ज्याचे पाणी नदीप्रमाणे वर व खाली उसळत आहे
8उसळणाऱ्या नील नदीप्रमाणे मिसर येत आहे आणि त्याचे पाणी नदीप्रमाणे वर व खाली उसळत आहे.
तो म्हणतो, मी वर जाईन; मी पृथ्वी व्यापून टाकीन. मी नगरे व त्यामध्ये राहणाऱ्यांचा नाश करीन.
9घोड्यांनो, वर जा. रथांनो, तुम्ही, क्रोधीत व्हा. सैनिकांना बाहेर जाऊ द्या, जे पारंगत ढालकरी माणसे कूश व पूट आणि त्यांचे धनुष्य वाकविणारे पारंगत लूदीम माणसे त्यांच्याबरोबर जा.
10कारण तो दिवस प्रभू सेनाधीश परमेश्वर याने आपल्या शत्रूंचा सूड घ्यावा म्हणून तो दिवस त्यास सूड घेण्याचा दिवस होईल.
तेव्हा तलवार खाऊन तृप्त होईल. ती त्यांचे भरपूर रक्त पिईल.
कारण प्रभू, सेनाधीश परमेश्वरास फरात नदीच्या काठी उत्तरेच्या देशात यज्ञ करायचा आहे.
11“हे मिसराच्या कुमारी कन्ये, गिलादाला वर जा आणि औषध मिळव.
तू व्यर्थ खूप औषधे स्वतःला लावतेस. तुझ्यासाठी काही इलाज नाही.
12राष्ट्रांनी तुझी बदनामी ऐकली आहे. पृथ्वी तुझ्या विलापाने भरली आहे, कारण सैनिक सैनिकाविरूद्ध अडखळत आहेत. ते दोघेही एकत्र पडतील.”
13जेव्हा बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सर आला आणि मिसर देशावर हल्ला केला, याविषयी परमेश्वराचे वचन यिर्मया संदेष्ट्याला म्हणाले ते असे की,
14मिसरास कळवा आणि मिग्दोलात व नोफात ऐकू द्या.
तहपन्हेस ते म्हणाले तू उभा राहा व सज्ज हो, कारण तुमच्या भोवती तलवारीने सर्व काही खाऊन टाकले आहे.
15तुझा देव अपीस का दूर पळून गेला आहे? तुझा बैल-देव का उभा राहत नाही? परमेश्वराने त्यास खाली फेकून दिले आहे.
16जे कोणी अडखळतील त्यांची संख्या वाढवली आहे. प्रत्येक सैनिक एकावर एक पडले. ते म्हणत आहेत,
उठा, आपण या पीडणाऱ्या तलवारीपासून जी आपणाला मारून खाली पाडत आहे, तिच्यापासून पळून आपल्या स्वतःच्या लोकांकडे, आपल्या मातृभूमीला परत जाऊ.
17त्यांनी तेथे घोषणा केली, मिसराचा राजा फारो केवळ गर्जनाच आहे, जी त्याची सुसंधी त्याने गमावली आहे.
18ज्याचे नाव सेनाधीश परमेश्वर आहे, तो राजेश्वर म्हणतो, मी जिवंत आहे.
जसा डोंगरामध्ये ताबोर व जसा समुद्राजवळील कर्मेल पर्वताप्रमाणे तसा कोणीएक येईल.
19अगे कन्ये, जी तू मिसरात राहते, ती तू बंदिवासात जाण्यासाठी आपल्या प्रवासाचे सामान तयार कर.
कारण नोफचा नाश होऊन व ते भयकारक होईल याकरिता तेथे कोणी राहणार नाही.
20मिसर खूप सुंदर कालवड आहे, पण उत्तरेकडून नांगी असणारा किटक येत आहे. तो येत आहे.
21तिचे भाडोत्री सैनिक तिच्यामध्ये गोठ्यातल्या वासराप्रमाणे आहेत, पण ते सुद्धा पाठ फिरवून व दूर पळून जातील.
ते एकत्रित उभे राहत नाहीत, कारण त्यांच्या विपत्तीचा दिवस, त्यांच्या शिक्षेचा समय त्यांच्या विरोधात आला आहे.
22मिसर फूत्कारणाऱ्या व दूर सरपटणाऱ्या सापासारखा आहे, कारण तिचे शत्रू तिच्याविरोधात सैन्यासह कूच करत आहेत.
ते लाकूड तोड्याप्रमाणे कुऱ्हाडीसह तिच्याकडे जात आहेत.
23परमेश्वर असे म्हणतो, ते तिचे वन तोडत आहेत, जरी ते खूप घनदाट आहे.
कारण शत्रू टोळांपेक्षा असंख्य आहेत, मोजण्यास असमर्थ आहेत.
24मिसराच्या कन्येला लज्जीत करण्यात येईल. तिला उत्तरेच्या लोकांच्या हाती दिले जाईल.
25सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, म्हणतो, “पाहा, मी नो येथल्या आमोनाला व फारोला, मिसराला आणि त्याच्या देवांना व त्याच्या राजांना म्हणजे फारोला आणि जे त्याच्यावर भरवसा ठेवतात त्यांना शिक्षा करीन. 26मी त्यांना त्यांचे जीव घेऊ पाहणारे, बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सर व त्याचे सेवक ह्यांच्या हाती देईन. यानंतर पूर्वीप्रमाणे मिसरात वस्ती होईल. असे परमेश्वराने सांगितले आहे.
27परंतु तू, माझ्या सेवक याकोबा, भिऊ नकोस. हे इस्राएला, घाबरु नकोस. कारण पाहा, मी तुला दूर देशातून आणि तुझ्या वंशजाला त्यांच्या बंदिवासाच्या देशातून परत आणील. मग याकोबाला पुन्हा शांतता व संरक्षण लाभेल. तेथे कोणीही त्यास भीती दाखविणार नाही. 28परमेश्वर म्हणतो, तू, माझ्या सेवका, याकोबा घाबरु नकोस. कारण मी तुजबरोबर आहे, ज्या राष्ट्रांमध्ये मी तुला विखरले आहे त्या सर्वांचा मी पूर्ण नाश करीन. पण मी तुझा पूर्ण नाश करणार नाही. तरी मी तुला न्यायाने शिक्षा करीन आणि तुला अगदीच शिक्षा केल्यावाचून सोडणार नाही.”

सध्या निवडलेले:

यिर्म. 46: IRVMar

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन