33
अलीहू ईयोबाला दोष लावतो
1“ईयोब, मी तुला विनंती करतो, माझे बोलने ऐक.
माझे सर्व शब्दांकडे लक्ष दे.
2पाहा, मी आता बोलायला माझे मुख उघडले आहे,
माझी जीभ माझ्या तोंडात हालू लागली आहे.
3माझे शब्दच माझ्या अंत:करणाचे प्रामाणिकपण सांगतील,
माझ्या ओठांना जे माहीती आहे, तेच ते प्रामाणिकपणे बोलतील.
4देवाच्या आत्म्याने मला निर्माण केले आहे,
मला सर्वशक्तिमान देवाच्या श्वासाद्ववारे जीवन मिळाले आहे.
5तुला शक्य झाले तर मला उत्तर दे,
माझ्याशी वाद घालण्याकरता तुझी उत्तरे तयार ठेव.
6पाहा, देवासमोर मी आणि तू सारखेच आहोत,
मलाही माती पासून उत्पन्न केले आहे.
7पाहा, माझी दरारा तुला घाबरवणार नाही,
माझा दाब तुला जड होणार नाही.
8तू जे बोललास ते मी निश्चित ऐकले,
मी तुझ्या शब्दांचा आवाज असे म्हणतांना ऐकला,
9‘मी शुध्द आहे, मी निरपराध आहे, मी काहीही चूक केली नाही
मी निर्दोष आहे, आणि माझ्यामध्ये पाप नाही.
10पाहा, देव माझ्यावर हल्ला करण्याची संधी पाहतो
देवाने मला शत्रूप्रमाणे वागवले आहे.
11देवाने माझ्या पायला साखळदंड बांधले
देव माझी प्रत्येक हालचाल बघतो.’
12पाहा, मी तुला उत्तर देईल तू या बाबतीत चुकतो आहेस,
देव कोणत्याही मनुष्यापेक्षा महान आहे.
13तू त्याच्याशी का वाद घालत आहेस?
तो आपल्या कोणत्याही करणीचे कारण सांगत नाही.
14देव एकदा बोलतो,
होय दोनदा बोलतो, तरी मनुष्य त्याकडे लक्ष देत नाही.
15देव लोकांशी रात्री ते गाढ झोपेत असताना स्वप्नात किंवा दृष्टांतात बोलत असेल,
जेव्हा मनुष्य गाढ झोपेत असतो.
16नंतर देव मनुष्याची कानउघडणी करतो,
आणि त्याच्या धमकीने घाबरवितो.
17मनुष्यास त्यांना पापाच्या हेतूपासून मागे ओढण्यासाठी,
आणि गर्व न करण्याचेही सांगतो.
18देव गर्तेतून मनुष्याचे जीवन वाचवितो,
त्याच्या जीवनाला मरणापासून वाचवितो.
19मनुष्याला केलेल्या शिक्षेमुळे अंथरुणात पडून दु:ख भोगत असेल
वेदनेने त्याची सगळी हाडे तळमळतात.
20नंतर तो मनुष्य खाऊ शकत नाही
चांगल्या अन्नाचासुध्दा त्यास तिरस्कार वाटतो.
21त्याचे शरीर इतके क्षीण होते की तो जवळ जवळ दिसेनासा होतो.
त्याची सगळी हाडे जी कधी दिसली नाही ती आता दिसतात.
22खरोखर, तो मृत्यूलोकाजवळ येऊन ठेपतो
आणि त्याचे जीवन मरणपंथाला लागलेले असते.
23परंतू एखादा देवदूत जर त्याचा मध्यस्थ झाला,
मध्यस्थ, हजारो देवदुतापैकी एक,
त्यास चांगला मार्ग दाखवणारा.
24आणि देवदूत त्याच्याशी दयेने वागेल, आणि देवाला सांगेल.
‘या मनुष्यास मृत्युलोकात जाण्यापासून वाचव
त्याच्या पापाची किंमत मोजण्याचा दुसरा एक मार्ग मला सापडला आहे.’
25मग त्याचे शरीर पुन: बालकासारखे जोमदार बनेल.
तो तरुणपणी जसा मजबूत होता तसाच पुन्हा होईल.
26तो देवाची प्रार्थना करेल आणि देव त्यास दया देईल.
म्हणजे तो देवाचे मुख आनंदाने पाहील.
नंतर तो मनुष्य पुन्हा चांगले जीवन जगायला लागेल.
27नंतर तो लोकांस कबुली देईल. तो म्हणेल, ‘मी पापकर्म केले.
मी पाप केले चांगल्याचे वाईट केले.
पंरतू माझ्या पापाला शिक्षा झाली नाही.
28त्याने माझ्या आत्म्याला मृत्युलोकात जाण्यापासून वाचवेल.
माझ्या जीव नियमीत त्याचा प्रकाश पाहील.
29पाहा, देव या गोष्टी मनुष्यासाठी करतो,
दोनदा, होय तीनदा,
30त्याच्या जीवाला मृत्युलोकात जाण्यापासून वाचवण्यासाठी असे करतो
म्हणजे त्याचे जीवन प्रकाशाने प्रकाशीत होते.
31ईयोबा, मी काय म्हणतो त्याकडे लक्ष दे.
माझे ऐक! तू गप्प रहा आणि मला बोलू दे.
32पण ईयोबा, जर तुला माझे बोलणे पटत नसेल तर तू खुशाल बोल.
मला तुझे मुद्दे सांग. कारण मला तुझे बोलणे सुधारायचे आहे.
33परंतु ईयोबा, तुइयाजवळ बोलण्यासारखे काही नसेल तर माझे ऐक.
तू गप्प रहा आणि मी तुला शहाणपण शिकवेन.”