लेवी. 15
15
शरीरातून वाहणारा अशुद्ध स्त्राव
1परमेश्वर मोशे व अहरोन ह्यांना आणखी म्हणाला, 2इस्राएल लोकांस सांगा की एखाद्या पुरुषाच्या शरीरातून स्त्राव होत असल्यास तो पुरुष अशुद्ध होय. 3त्याचा स्त्राव वाहत असो किंवा बंद पडो, ती त्याची अशुद्धताच होय.
4स्त्राव होणारा मनुष्य ज्या बिछान्यावर झोपेल तो अशुद्ध होय आणि ज्या वस्तूवर तो बसेल तीही अशुद्ध होय. 5जो कोणी त्याच्या बिछान्याला स्पर्श करेल त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे.
6स्त्राव होणारा मनुष्य बसलेल्या वस्तूवर कोणी बसेल तर त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे. 7स्त्राव होणाऱ्या मनुष्याच्या अंगाला जर कोणी स्पर्श केला तर त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे.
8स्त्राव होणारा मनुष्य जर एखाद्या शुद्ध मनुष्यावर थुंकला तर त्या शुद्ध मनुष्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे. 9स्त्राव होणारा मनुष्य ज्या खोगीराचा उपयोग करील ते खोगीर अशुद्ध होय.
10त्याच्या अंगाखालच्या कोणत्याही वस्तुला कोणी स्पर्श केला तर त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे, व त्या वस्तू जो उचलील त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे आणि संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे. 11स्त्राव होणारा मनुष्य पाण्याने हात न धुता कोणाला स्पर्श केला तर त्या दुसऱ्या मनुष्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे. 12परंतु स्त्राव होणारा मनुष्य एखाद्या मातीच्या पात्राला स्पर्श केला तर ते पात्र फोडून टाकावे, मात्र प्रत्येक लाकडी पात्र पाण्याने धुवावे.
13स्त्राव होणारा मनुष्य आपल्या स्त्रावापासून बरा झाल्यावर त्याने आपल्या शुद्धीकरणासाठी सात दिवस थांबावे आणि मग आपले कपडे धुऊन वाहत्या पाण्यात आपले अंग धुवावे म्हणजे तो शुद्ध ठरेल. 14आठव्या दिवशी त्याने दोन होले किंवा पारव्याची दोन पिल्ले घेऊन दर्शनमंडपाच्या दारापाशी परमेश्वरासमोर जावे व याजकाकडे ती द्यावी. 15मग याजकाने त्यातील एकाचे पापार्पण व दुसऱ्याचे होमार्पण करावे आणि त्या मनुष्याच्या स्त्रावाबद्दल परमेश्वरासमोर त्याच्यासाठी प्रायश्चित करावे.
16एखाद्या पुरुषाचा वीर्यपात झाला तर त्याने आपले सर्वांग पाण्याने धुवून संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे. 17ज्या कपड्याला किंवा चामड्याला वीर्य लागले असेल तेही पाण्याने धुऊन संध्याकाळपर्यंत अशुद्ध समजावे. 18स्त्री बरोबर निजला असताना पुरुषाचा वीर्यपात झाला तर त्या दोघांनी पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे.
19एखादी स्त्री ऋतुमती झाली तर तिने सात दिवस दूर बसावे; जो कोणी तिला स्पर्श करेल त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे; 20ती दूर असेपर्यंत ज्यावर ती झोपेल वा बसेल तेही अशुद्ध होय.
21जो कोणी तिच्या अंथरुणाला स्पर्श करेल, त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे. 22ती ज्यावर बसली असेल त्यास जो कोणी स्पर्श करेल त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे. 23तिच्या अंथरुणाला किंवा ज्यावर ती बसली असेल त्यास शिवणाऱ्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे.
24अशा स्त्रीबरोबर लैगिक संबंध केलेला पुरुषाने सात दिवस अशुद्ध रहावे व ज्या अंथरुणावर तो झोपेल तेही अशुद्ध समजावे.
25एखाद्या स्त्रीचा ऋतुकाल नसताना जर अनेक दिवस तिला रक्तस्राव होत असेल किंवा मुदतीच्या बाहेर ती ऋतुमती राहिली तर तिचे स्त्रावाचे सर्व दिवस तिच्या ऋतुकालाच्या दिवसाप्रमाणे समजावे. ती अशुद्ध होय. 26तिला स्त्राव होत असतानाच्या सर्व काळात ती ज्या अंथरुणावर झोपेल, ते अंथरुण तिच्या मासिक पाळीच्या वेळच्या अंथरुणाप्रमाणे समजावे. ती ज्यावर बसेल ती प्रत्येक गोष्ट तिच्या मासिक पाळीच्या काळात अशुद्ध असते. तशी अशुद्ध समजावी. 27जर कोणी त्या वस्तूंना स्पर्श करेल तर तो अशुद्ध होईल. त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे आणि संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे.
28त्या स्त्रीचा स्त्राव बंद झाल्यावर तिने सात दिवस थांबावे; त्यानंतर ती शुद्ध होईल. 29मग आठव्या दिवशी तिने दोन होले किंवा पारव्याची दोन पिल्ले घेऊन दर्शनमंडपाच्या दारापाशी याजकाकडे जावे. 30मग याजकाने एकाचे पापार्पण व दुसऱ्याचे होमार्पण करावे. अशाप्रकारे याजकाने तिच्या अशुद्धतेकरिता परमेश्वरासमोर प्रायश्चित करावे.
31ह्याप्रकारे तुम्ही इस्राएल लोकांस अशुद्धतेबद्दल बजावून ठेवावे; नाहीतर ते माझा पवित्र निवासमंडप भ्रष्ट करतील आणि मग त्याच्याबद्दल त्यांना मरावेच लागेल!
32स्त्राव होऊन किंवा वीर्यपात होऊन जो पुरुष अशुद्ध होतो; 33आणि जी स्त्री ऋतुमती होते आणि जो कोणी पुरुष, ऋतुमती असल्यामुळे अशुद्ध झालेल्या स्त्रीशी लैंगिक संबंध करून अशुद्ध होतो, त्यांच्या संबंधीचे हे नियम आहेत.
सध्या निवडलेले:
लेवी. 15: IRVMar
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
MAR-IRV
Creative Commons License
Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.