27
नवसांसंबंधी नियम
1परमेश्वर मोशेला म्हणाला, 2इस्राएल लोकांस सांग: एखाद्या मनुष्याने परमेश्वरास मानवाचा विशेष नवस केला तर त्या मनुष्याचे मोल याजकाने याप्रमाणे ठरवावे.
3वीस ते साठ वर्षे वयाच्या आतील पुरुषाचे मोल पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे पन्नास शेकेल रुपे असावे, 4आणि त्याच वयाच्या स्त्रीचे मोल तीस शेकेल रुपे असावे.
5मुलगा पाच वर्षे ते वीस वर्षांच्या आतील वयाचा असेल तर त्याचे मोल वीस शेकेल रुपे व मुलीचे दहा शेकेल रुपे असावे. 6मुलगा एक महिन्याहून मोठा व पाचवर्षाहून लहान असला तर त्याचे मोल पाच शेकेल रुपे व मुलीचे तीन शेकेल रुपे असावे.
7साठ वर्षे वा साठ वर्षाहून अधिक वर्षे वयाच्या पुरुषाचे मोल पंधरा शेकेल रुपे व स्त्रीचे दहा शेकेल रुपे असावे. 8परंतु तू ठरविलेले मोल न देण्याइतका कोणी गरीब असेल तर त्यास याजकापुढे आणावे; आणि याजकाने नवस करणाऱ्याच्या ऐपतीप्रमाणे नवसाच्या मानवाचे मोल ठरवावे.
9काही पशू परमेश्वरास अर्पण करता येतात त्यापैकी कोणी एखाद्या पशूचा नवस केला तर परमेश्वरास अर्पावयाचा असा प्रत्येक प्राणी पवित्र समजावा. 10त्याने तो बदलू नये किंवा त्याच्या ऐवजी दुसरे काही देण्याचा प्रयत्न करु नये. त्याने वाईट पशू ऐवजी चांगला किंवा चांगल्याबद्दल वाईट असा बदल करू नये त्याने जर तसा बदल करण्याचा प्रयत्न केला तर मग ते दोन्ही पवित्र होतील व दोन्ही परमेश्वराच्या मालकीचे होतील.
11काही पशू परमेश्वरास अर्पण करावयास योग्य नसतात ते अशुद्ध असतात कोणी अशुद्ध पशूपैकी एखादा परमेश्वरास अर्पण करावयास आणला तर त्याने तो याजकाकडे आणावा. 12तो पशू चांगला असो किंवा वाईट असो याजकाने त्याचे मोल ठरवावे; याजक ठरवील ते त्याचे मोल समजावे. 13पण नवस करणाऱ्याला तो पशू सोडवावयाचा असला तर त्या किंमतीत आणखी एकपंचमांश भर घालून त्याने तो सोडवावा.
14एखाद्याने आपले घर परमेश्वरास वाहिले तर ते चांगले असो किंवा वाईट असो याजकाने त्या घराचे मोल ठरवावे; याजक ठरवील ते त्याचे मोल समजावे. 15परंतु घर वाहणाऱ्याला ते सोडवून परत घ्यावयाचे असेल तर त्याने, याजकाने ठरवलेल्या किंमतीत एकपंचमांश भर घालून ते सोडवावे; मग ते घर त्याचे होईल.
16एखाद्याने आपल्या शेतीचा काही भाग परमेश्वरास वाहिला तर त्यामध्ये किती बियाणे पेरले जाते त्यावरुन त्याचे मोल ठरेल#त्यामध्ये किती धान्य प्राप्ती झाली त्यावरुन त्याचे मोल ठरेल; एक होमर#साधारण 300 किलोग्राम, सुमारे सहा बुशेल जवासाठी पन्नास शेकेल रुपे अशी किंमत असावी.
17योबेल वर्षापासून त्याने आपले शेत देवाला वाहिले तर याजक ठरविल त्याप्रमाणे त्याचे मोल होईल. 18परंतु योबेल वर्षानंतर जर एखाद्याने आपले शेत परमेश्वरास वाहिले तर पुढच्या योबेल वर्षापर्यंत जितकी वर्षे उरली असतील तितक्या वर्षाचा हिशोब करून याजकाने त्याचे नक्की मोल ठरवावे.
19शेत वाहणाऱ्याला, मोल देऊन आपले शेत सोडवून परत घ्यावयाचे असले तर त्याच्या ठरवलेल्या किंमतीत एकपंचमांश भर घालून त्याने ते सोडवावे. मग ते शेत परत त्याच्या मालकीचे होईल. 20त्याने ते शेत सोडविले नसेल किंवा दुसऱ्या कोणाला ते विकले असेल तर त्या पहिल्या मालकाला ते सोडवून घेता येणार नाही; 21पण योबेल वर्षी ते शेत परत विकत घेतले नाही तेव्हा पूर्णपणे समर्पित केलेल्या शेताप्रमाणे परमेश्वराकरिता ते पवित्र ठरेल, अर्थात ते याजकाचे कायमचे वतन होईल.
22स्वत:च्या कुळाचे नसलेले म्हणजे एखाद्याने स्वत: खरेदी केलेले शेत त्यास परमेश्वराकरिता अर्पण करावयाचे असेल, 23तर याजकाने योबेल वर्षापर्यंत त्याचा हिशोब करावा व जितके मोल ठरेल तितके परमेश्वराकरिता पवित्र समजून त्याने त्याच दिवशी ते देऊन टाकावे.
24ज्याच्याकडून त्याने ते शेत पहिल्यांदा खरेदी केलेले असेल म्हणजे ज्याच्या वतनाचे ते असेल त्याच्या ताब्यात ते योबेल वर्षी परत जावे. 25मोल देताना ते पवित्रस्थानातील चलनाप्रमाणे ठरविलेले असावे. शेकेल म्हणजे वीस गेरा.
26लोकांस गुरेढोरे, शेरडेमेढंरे विशेष देणग्या म्हणून अर्पण करता येतील परंतु त्यापैकी प्रथम जन्मलेला नर परमेश्वराचा ठरलेला आहेच; त्याला, ते विशेष भेट म्हणून वाहू शकणार नाहीत. 27तो प्रथम जन्मलेला नर अशुद्ध पशूपैकी असला तर याजकाने ठरवलेल्या मोलात एकपंचमांश भर घालून अर्पण करणाऱ्याने तो सोडवावा; पण तो सोडवीत नसला तर याजकाने ठरवलेल्या किंमतीला तो विकून टाकावा.
28लोक परमेश्वरास काही विशेष देणगी देतात, ती देणगी माणसे, पशू किंवा वतनांची शेते या प्रकारची असेल, ती देणगी परमेश्वराचीच आहे; ती सोडवून परत घेता येणार नाही किंवा विकता येणार नाही. 29ती वाहिलेली विशेष देणगी मानव प्राण्यांपैकी असेल तर त्या मानवाला सोडवून घेता येणार नाही; त्याचा अवश्य वध करावा.
30भूमीच्या सर्व उत्पन्नाचा एक दशांश भाग म्हणजे, शेतातील सर्व उपज, आणि झाडे, वेली यांची फळे ह्यांचा एक दशांश भाग परमेश्वराकरिता पवित्र आहे. 31म्हणून एखाद्याला आपला एक दशांश भाग सोडवून घ्यावयाचा असला तर त्याच्या किंमतीत एक पंचमांशाची भर घालून त्याने तो सोडवावा.
32गुरेढोर किंवा शेरडेमेंढरे ह्यापैकी ज्यांची गणना काठीखालून चालवून होते अशा प्रत्येक दहांपैकी एक पशू याजक घेईल. प्रत्येक दहावे जनावर परमेश्वराचे वेगळे केलेले असेल. 33निवडलेला पशू चांगला आहे किंवा वाईट आहे या विषयी त्याच्या धन्याने चिंता करु नये किंवा त्यास बदलू नये; त्याने बदल करावयाचे ठरविले तर मग तो पशू व त्याच्या बदलीचा पशू असे दोन्ही पशू परमेश्वराकरिता पवित्र होतील; किंमत देऊन ते सोडविता येणार नाहीत.
34परमेश्वराने इस्राएल लोकांकरिता सीनायपर्वतावर मोशेला दिलेल्या आज्ञा याच आहेत.