लूक 8
8
येशूची सेवा करण्याऱ्या स्त्रिया
1त्यानंतर लवकरच असे झाले की, तो उपदेश करीत व देवाच्या राज्याची सुवार्ता सांगत नगरोनगरी व गांवोगांवी फिरत होता, तेव्हा ते बारा शिष्य त्याच्याबरोबर होते. 2दुष्ट आत्मे व दुखणी यांपासून मुक्त केलेल्या अशा कित्येक स्त्रिया त्याच्याबरोबर होत्या, म्हणजे मग्दालीया नगराची मरीयेतून सात भूते निघाली होती, ती, 3हेरोदाचा कारभारी खुजा याची पत्नी योहान्ना तसेच सूसान्ना व इतर पुष्कळ स्त्रिया, या आपल्या द्रव्याने त्यांची सेवा करीत असत.
पेरणी करणाऱ्याचा दृष्टांत
मत्त. 13:1-9; मार्क 4:1-9
4आणि मोठा समुदाय एकत्र जमला असता व गावोगावचे लोक त्याच्याजवळ येत असता तो दाखला देऊन म्हणाला, 5“पेरणारा आपले बी पेरायला निघाला; आणि तो पेरीत असता काही बी पाय वाटेवर पडले आणि ते तुडवले गेले व आकाशातील पाखरांनी ते खाऊन टाकले. 6आणि काही खडकाळीवर पडले आणि ते उगवल्यावर वाळून गेले, कारण त्यास ओलावा नव्हता. 7आणि काही काटेरी झाडाझुडपांमध्ये पडले आणि झाडाझुडपांबरोबर वाढून त्याची वाढ खुंटवली. 8आणि काही चांगल्या जमिनीवर पडले आणि ते उगवून त्यास शंभरपट पीक आले.” असे म्हटल्यावर तो मोठ्याने म्हणाला, “ज्याला ऐकायला कान आहेत तो ऐको.”
9तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्यास विचारले, या दाखल्याचा अर्थ काय आहे? 10मग तो म्हणाला, “देवाच्या राज्याची गुजे जाणण्याची देणगी तुम्हास दिली आहे, परंतु बाकीच्या लोकांस ती दाखल्यांनी सांगितली आहेत, यासाठी की त्यांनी दिसत असता पाहू नये व त्यांनी ऐकत असता समजू नये. 11तर दाखला हा आहे बी हे देवाचे वचन आहे. 12आणि जे वाटेवरचे ते ऐकणारे आहेत, पण त्यानंतर सैतान येतो आणि त्यांनी विश्वास धरून तारण पावू नये म्हणून त्यांच्या अंतःकरणातून वचन काढून घेतो. 13आणि जे खडकाळीवरचे हे आहेत की, ते ऐकतात तेव्हा वचन आनंदाने घेतात, पण त्यांना मूळ नसते; ते काही वेळेपर्यंत विश्वास धरतात व परीक्षेच्या वेळी गळून पडतात. 14आणि काटेरी झाडांमध्ये पडणारे बी हे ऐकणारे आहेत, पण पुढे जाता जाता चिंता व धन व या जीवनातली सुखे यांनी गुदमरून जातात व भरदार फळ देत नाहीत. 15पण चांगल्या जमिनीत पडणारे बी हे असे आहेत, की ते वचन ऐकून ते भल्या व चांगल्या अंतःकरणात घट्ट धरून ठेवतात आणि धीराने पीक देत जातात.
दिव्यावरून धडा
मार्क 4:21-25
16 आणि कोणी दिवा लावल्यावर तो भांड्याने झाकत नाही किंवा पलंगाखाली ठेवत नाही तर आत येणाऱ्यांना उजेड दिसावा म्हणून तो दिवठणीवर ठेवतो. 17कारण प्रकट होणार नाही असे काही झाकलेले नाही किंवा कळणार नाही व उघडकीस येणार नाही असे काही गुप्त नाही. 18म्हणून तुम्ही कसे ऐकता यांविषयी जपा, कारण ज्याच्याजवळ आहे त्यास दिले जाईल आणि ज्याच्याजवळ नाही त्याच्याजवळ जे आहे म्हणून त्यास वाटते ते देखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल.”
प्रभू येशूचे नातलग
मत्त. 12:46-50; मार्क 3:31-35
19तेव्हा त्याची आई व भाऊ त्याच्याकडे आली आणि दाटीमुळे त्यांना त्याच्याजवळ जाता येईना. 20तेव्हा कोणी त्यास सांगितले, तुझी आई व तुझे भाऊ तुला भेटायला पाहत असून बाहेर उभे राहिले आहेत. 21आणि त्याने त्यांना उत्तर देऊन म्हटले, “देवाचे वचन ऐकणारे व पाळणारे हेच माझे आई व भाऊ.”
येशू वादळ शांत करतो
22आणि त्या दिवसात असे झाले की, तो आपल्या शिष्यांबरोबर होडीत बसला आणि “आपण सरोवराच्या पलीकडे जाऊ” असे तो त्यांना म्हणाला आणि त्यांनी होडी हाकारली. 23नंतर ते जहाज हाकारत असता येशू झोपी गेला. मग सरोवरात वाऱ्याचे वादळ सुटले आणि होडी पाण्याने भरू लागले व ते संकटात पडले. 24तेव्हा ते त्याच्याजवळ येऊन त्यास जागे करून म्हणाले, गुरुजी, आम्ही बुडत आहोत. तेव्हा त्याने झोपेतून उठून वाऱ्याला व खवळलेल्या पाण्याला धमकावले; मग ते बंद होऊन अगदी निवांत झाले. 25तेव्हा तो त्यांना म्हणाला, “तुमचा विश्वास कोठे आहे?” आणि ते भयभीत होऊन थक्क झाले व एकमेकांना म्हणाले, हा आहे तरी कोण? की, वारा व पाणी यांना देखील हा आज्ञा करतो व ती यांचे ऐकतात.
गरसेकराच्या प्रदेशातील भूतग्रस्त
मत्त. 8:28-9:1; मार्क 5:1-20
26मग ते गालील सरोवराच्या समोरील गरसेकरांच्या प्रदेशास पोहोचले. 27आणि तो जमिनीवर उतरला, तेव्हा नगरातील कोणीएक मनुष्य त्यास भेटला; त्यास पुष्कळ भूते लागली होती व त्याने बऱ्याच काळापासून कपडे घातली नव्हती व घरात न राहता तो थडग्यांमध्ये राहत होता. 28तेव्हा तो येशूला पाहून फार ओरडला व त्याच्यापुढे पडून मोठ्याने म्हणाला, हे येशू, परात्पर देवाच्या पुत्रा, माझा तुझा काय संबध? मी तुला विनंती करतो, मला पिडू नकोस. 29कारण तो त्या अशुद्ध आत्म्याला त्या मनुष्यांतून निघून जाण्याची आज्ञा करीत होता; कारण त्याने त्यास पुष्कळ वेळा धरले होते; आणि लोक त्यास पहाऱ्यात ठेवून साखळ्यांनी व बेड्यांनी बांधीत असत पण तो ती बंधने तोडून भूताकडून रानांमध्ये हाकून लावला जात असे. 30आणि येशूने त्यास विचारले, “तुझे नाव काय?” तेव्हा त्याने म्हटले, सैन्य, कारण त्याच्यामध्ये पुष्कळ भूते शिरली होती. 31आणि तू आम्हास अगाधकूपात जाण्याची आज्ञा करू नको, अशी ती भूते त्यास विनंती करीत होती. 32तेव्हा तेथे पुष्कळ डुकरांचा कळप डोंगरावर चरत होता; आणि त्यांमध्ये शिरायला तू आम्हास परवानगी द्यावी, अशी त्यांनी विनंती केली. मग त्याने त्यांना परवानगी दिली. 33तेव्हा ती भूते त्या मनुष्यांतून निघून त्या डुकरांमध्ये शिरली आणि तो कळप कड्यावरून धडक धावंत जाऊन खाली सरोवरात पडला व गुदमरून मरण पावला. 34मग कळप चारणारे जे घडले ते पाहून पळाले व त्यांनी ते नगरांमध्ये व शेतांमध्ये जाऊन सांगितले. 35तेव्हा जे झाले ते पाहायला ते लोक बाहेर निघाले आणि येशूकडे आले आणि ज्या मनुष्यांतून भूते निघाली होती तो वस्त्र पांघरलेला व शुद्धीवर आलेला असा येशूच्या पायांजवळ बसलेला त्यांना आढळला; आणि ते भ्याले. 36मग ज्यांनी ते पाहिले होते त्यांनी तो भूतग्रस्त कसा बरा झाला हे त्यांना सांगितले. 37तेव्हा गरसेकरांच्या चहूकडल्या भागांतील सर्व लोकांनी त्यास विनंती केली की तू आमच्यापासून जावे कारण ते मोठ्या भयाने व्याप्त झाले होते. मग तो मचव्यात बसून माघारी आला. 38आणि ज्या मनुष्यांतून भूते निघाली होती, तो, मला तुमच्याबरोबर राहू दयावे, अशी येशूजवळ विनंती करीत होता, परंतु तो त्यास निरोप देऊन म्हणाला, 39“तू आपल्या घरी परत जा व देवाने तूझ्यासाठी केवढी मोठी कामे केली ते साग.” मग तो निघून येशूने त्याच्यासाठी केवढी मोठी कामे केली होती ते त्या सबंध नगरांतून घोषित करत गेला.
याईराची कन्या व रक्तस्रावी स्त्री
मत्त. 9:18-26; मार्क 5:21-43
40नंतर येशू परत आल्यावर समुदायाने त्यास आनंदाने अंगीकारले, कारण ते सर्व त्याची वाट पाहत होते. 41तेव्हा पाहा, याईर नावाचा कोणी मनुष्य आला; तो तर सभास्थानाचा अधिकारी होता; आणि त्याने येशूच्या पाया पडून, तू माझ्या घरी यावे, अशी त्यास विनंती केली.
42कारण त्यास सुमारे बारा वर्षाची एकुलती एक मुलगी होती व ती मरणास टेकली होती. मग तो जात असता लोकसमुदाय त्याच्याजवळ दाटी करीत होते. 43आणि बारा वर्षे रक्तस्राव होत असलेली कोणीएक स्त्री, जी (आपली सर्व उपजीविका वैद्यांवर खर्ची घालून) कोणाकडूनही निरोगी होईना, 44तिने त्याच्या पाठीमागे येऊन त्याच्या वस्त्राच्या काठाला स्पर्श केला आणि लागलीच तिचा रक्तस्राव बंद झाला. 45मग येशू म्हणाला, “मला कोणी स्पर्श केला?” तेव्हा सर्वजण नाकारीत असता पेत्र व जे त्याच्याबरोबर होते ते त्यास म्हणाले, हे गुरूजी, समुदाय दाटी करून तुम्हास चेंगरीत आहेत. 46तेव्हा येशू म्हणाला, “कोणीतरी मला स्पर्श केला, कारण माझ्यातून सामर्थ्य निघाले हे मला समजले.” 47मग ती स्त्री, आपण गुप्त राहिलो नाही असे पाहून, थरथर कांपत आली आणि त्याच्यापुढे उपडी पडून आपण कोणत्या कारणासाठी स्पर्श केला व लागलीच आपण कसे बरे झालो, हे तिने सर्व लोकांच्या देखत सांगितले. 48तेव्हा त्याने तिला म्हटले, “मुली, तुझ्या विश्वासाने तुला तारले आहे. शांतीने जा.”
49तो अजून बोलत आहे इतक्यात सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या येथून कोणी आला व म्हणाला, तुझी मुलगी मरण पावली आहे; गुरूजीला आणखी श्रम देऊ नका. 50पण येशूने ते ऐकून त्यास उत्तर दिले, “भिऊ नको, विश्वास मात्र धर, म्हणजे ती बरी केली जाईल.” 51मग घरात आल्यावर पेत्र व योहान व याकोब आणि मुलीचा पिता व तिची आई यांच्यावाचून कोणालाही आपणाबरोबर आत येऊ दिले नाही. 52आणि सर्व तिच्यासाठी रडत व शोक करीत होते, पण तो म्हणाला, “रडू नका, कारण ती मरण पावली नाही, तर झोपेत आहे.” 53तरी ती मरण पावली आहे हे जाणून ते त्यास हसू लागले. 54पण त्याने तिचा हात आपल्या हातात घेऊन तिला हाक मारून म्हटले, “मुली, ऊठ.” 55तेव्हा तिचा आत्मा परत आला व ती लागलीच उठली; मग तिला खायला द्यावे अशी त्याने आज्ञा केली. 56आणि तिचे आई-वडील थक्क झाले; परंतु जे झाले ते कोणाला सांगू नका असे त्याना निक्षून सांगितले.
सध्या निवडलेले:
लूक 8: IRVMar
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
MAR-IRV
Creative Commons License
Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.