मार्क 14
14
येशूला धरण्याविषयी अधिकाऱ्यांची मसलत
मत्त. 26:1-5; लूक 22:1, 2; योहा. 11:45-53
1वल्हांडण व बेखमीर भाकरीच्या सणाच्या दोन दिवस अगोदर मुख्य याजक लोक आणि नियमशास्त्राचे शिक्षक कपटाने त्यास धरून जिवे मारण्याचा मार्ग शोधीत होते. 2कारण ते म्हणत होते “आपण ते सणात करू नये नाही तर लोक दंगा करतील.”
बेथानी येथे येशूला करण्यात आलेला तैलाभ्यंग
मत्त. 26:6-13; योहा. 12:1-8
3येशू बेथानी येथे शिमोन कुष्ठरोगी याच्या घरी मेजावर जेवायला बसला असता कोणीएक स्त्री वनस्पतीपासून बनवलेल्या शुद्ध सुगंधी तेलाची फार मौल्यवान अलाबास्त्र कुपी घेऊन आली. तिने अलाबास्त्र कुपी फोडली आणि सुगंधी तेल येशूच्या डोक्यावर ओतले. 4तेथे असलेले काही लोक रागावले, ते एकमेकांना म्हणाले, “सुगंधी तेलाचा असा नाश व्हावा हे बरे नाही. 5कारण हे सुगंधी तेल तीनशे सोन्याच्या नाण्यापेक्षा अधिक किंमतीला विकता आले असते आणि ते पैसे गरीबांना देता आले असते.” असे म्हणून त्यांनी तिच्याविरुद्ध कुरकुर केली. 6पण येशू म्हणाला, “तिला एकटे सोडा. तिला का त्रास देता? तिने माझ्यासाठी एक सुंदर कृत्य केले आहे. 7गरीब तर नेहमी तुमच्याजवळ असतील आणि पाहिजे तेव्हा त्यांना मदत करणे तुम्हास शक्य आहे. परंतु मी नेहमीच तुमच्याबरोबर असेन असे नाही. 8तिला शक्य झाले ते तिने केले. तिने दफनविधीच्या तयारीच्या काळाअगोदरच माझ्या शरीरावर सुगंधी तेल ओतले आहे. 9मी तुम्हास खरे सांगतो, सर्व जगात जेथे कोठे सुवार्तेची घोषणा केली जाईल तेथे तिची आठवण म्हणून तिने जे केले ते नेहमीच सांगितले जाईल.”
यहूदाची फितुरी
मत्त. 26:14-16; लूक 22:3-6
10नंतर बारा शिष्यांपैकी एक, यहूदा इस्कर्योत येशूला विश्वासघाताने धरून देण्यासाठी मुख्य याजकांकडे गेला. 11जेव्हा याजकांनी हे ऐकले तेव्हा त्यांना फार आनंद झाला आणि त्यांनी त्यास पैसे देण्याचे वचन दिले. मग यहूदा येशूला धरून त्यांच्या हातात देण्याची संधी पाहू लागला.
शेवटले भोजन
मत्त. 26:17-25; लूक 22:7-13; योहा. 13:21-30
12बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी जेव्हा वल्हांडण सणाचा कोकरा बळी करत असत तेव्हा येशूचे शिष्य त्यास म्हणाले, “आम्ही जातो आणि वल्हांडण सणाच्या भोजनाची तयारी करतो. आम्ही कोठे जाऊन तयारी करावी अशी आपली इच्छा आहे?” 13येशूने आपल्या दोघा शिष्यांना पाठवले आणि त्यांना सांगितले, “शहरात जा आणि पाण्याचे भांडे घेऊन जाणारा मनुष्य तुम्हास भेटेल, त्याच्यामागे जा. 14आणि जेथे तो आत जाईल त्या घराच्या मालकास सांगा, ‘गुरुजी म्हणतात, जेथे मला माझ्या शिष्यांबरोबर वल्हांडण सणाचे भोजन करणे शक्य होईल अशी खोली कोठे आहे?’ 15आणि तो तुम्हास माडीवरची एक मोठी नीटनेटकी केलेली खोली दाखवील, तेथे आपल्यासाठी तयारी करा.” 16शिष्य निघाले आणि ते शहरात गेले आणि येशूने सांगितल्याप्रमाणे त्यांना सर्व आढळले. मग त्यांनी वल्हांडण सणाच्या भोजनाची तयारी केली.
17संध्याकाळ झाली तेव्हा येशू बारा शिष्यांसह आला. 18मेजावर बसून ते जेवीत असता येशू म्हणाला, “मी तुम्हास खरे सांगतो, तुमच्यापैकी जो एकजण मला शत्रूच्या स्वाधीन करून देईल, तो माझ्याबरोबर येथे जेवण करीत आहे.” 19शिष्य अतिशय खिन्न झाले व प्रत्येकजण त्यास म्हणू लागला, “तो मी आहे का?” 20तो त्यांना म्हणाला, “बारा जणांपैकी एक जो माझ्याबरोबर ताटात भाकर बुडवत आहे तोच. 21त्याच्याविषयी पवित्र शास्त्रात जसे लिहिले आहे, तसा मनुष्याचा पुत्र जाईल, परंतु ज्याच्याकडून मनुष्याचा पुत्र धरून दिला जाईल, त्याची केवढी दुर्दशा होणार. तो जन्मला नसता तर ते त्याच्यासाठी बरे झाले असते.” 22ते भोजन करीत असता येशूने भाकर घेतली, उपकारस्तुती केली, ती मोडली आणि त्यांना दिली. तो म्हणाला, “घ्या, हे माझे शरीर आहे.” 23नंतर येशूने प्याला घेतला, उपकारस्तुती केली. तो प्याला त्यांना दिला आणि सर्व त्यातून प्याले. 24मग येशू म्हणाला, “हे माझे नव्या कराराचे रक्त आहे. पुष्कळांसाठी ते ओतले जात आहे. 25मी तुम्हास खरे सांगतो की, देवाच्या राज्यात मी नवा द्राक्षरस पिईन त्या दिवसापर्यंत मी यापुढे द्राक्षाचा उपज #द्राक्षरस पिणार नाही.”
26नंतर त्यांनी उपकारस्तुतीचे गीत गाईले व ते जैतुनाच्या डोंगराकडे निघून गेले.
शिष्य आपल्याला सोडून जातील हे येशूचे भविष्य
मत्त. 26:31-35; लूक 22:31-34; योहा. 13:36-38
27येशू शिष्यांना म्हणाला, “तुम्ही सर्व अडखळून पडाल कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की,
‘मी मेंढपाळास मारीन
आणि मेंढरांची दाणादाण होईल.’
28 परंतु माझे पुनरुत्थान झाल्यावर मी तुमच्यापुढे गालील प्रांतात जाईन.” 29पेत्र म्हणाला, जरी सर्व अडखळले तरी मी अडखळणार नाही. 30मग येशू त्यास म्हणाला, “मी तुला खरे सांगतो, आज रात्री दोनदा कोंबडा आरवण्यापूर्वी तू तीन वेळा मला नाकारशील.” 31तरीही पेत्र अधिक आवेशाने म्हणाला, “जरी मला आपणाबरोबर मरावे लागले तरीसुद्धा मी आपणाला नाकारणार नाही.” आणि इतर सर्वजण तसेच म्हणाले.
गेथशेमाने बागेत येशू
मत्त. 26:36-46; लूक 22:39-46
32नंतर ते गेथशेमाने म्हटलेल्या जागी आले, तेव्हा येशू त्याच्या शिष्यांना म्हणाला, “मी प्रार्थना करीपर्यंत येथे बसा.” 33येशूने आपल्याबरोबर पेत्र, याकोब व योहान यांना घेतले. दुःख व वेदनांनी त्याचे मन भरून आले. 34तो त्यांना म्हणाला, “माझा जीव मरण्याइतका वेदना सोशीत आहे. येथे राहा व जागृत असा.”
35त्यांच्यापासून थोडे दूर अंतरावर जाऊन तो जमिनीवर पडला आणि त्याने प्रार्थना केली की, “शक्य असेल तर ही घटका मजपासून टळून जावो.” 36तो म्हणाला, “अब्बा-पिता, तुला सर्वकाही शक्य आहे. हा प्याला मजपासून दूर कर तरी माझ्या इच्छेप्रमाणे नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे कर.”
37नंतर येशू आला आणि त्यांना झोपलेले पाहिले. तो पेत्राला म्हणाला, “शिमोना, तू झोपी गेलास काय? तासभर तुझ्याच्याने जागे राहवत नाही काय? 38जागृत राहा आणि प्रार्थना करा म्हणजे तुम्ही परीक्षेत पडणार नाही. आत्मा उत्सुक आहे पण देह अशक्त आहे.”
39पुन्हा येशू दूर गेला आणि त्याच गोष्टी उच्चारून त्याने प्रार्थना केली. 40नंतर तो परत आला व त्यास ते झोपलेले आढळले कारण त्यांचे डोळे जड झाले होते आणि त्यास काय उत्तर द्यावे हे त्यांना कळेना.
41तो पुन्हा तिसऱ्या वेळेस आला आणि त्यांना म्हणाला, “तुम्ही अजूनही झोपलेले आणि विश्रांती घेत आहात काय? पुरे झाले! आता वेळ आली आहे. मनुष्याचा पुत्र पाप्यांच्या हाती धरून दिला जात आहे. 42उठा, आपण जाऊ या. पाहा, मला धरून देणारा मनुष्य इकडे येत आहे.”
येशूला अटक
मत्त. 26:47-56; लूक 22:47-53; योहा. 18:1-11
43आणि येशू बोलत आहे तोपर्यंत बारा जणांपैकी एक यहूदा तेथे आला. त्याच्याबरोबर मुख्य याजक लोक व नियमशास्त्राचे शिक्षक आणि वडील यांनी पाठवलेले अनेक लोक तलवारी व सोटे घेऊन आले. 44घात करून देणाऱ्याने त्यांना अशी खूण दिली होती की, “मी ज्या कोणाचे चुंबन घेईन तोच तो आहे, त्यास धरा आणि सांभाळून न्या.” 45मग यहूदा आल्याबरोबर तो येशूकडे गेला आणि म्हणाला, “रब्बी!” आणि असे म्हणून यहूदाने येशूचे चुंबन घेतले. 46नंतर त्यांनी त्याच्यावर हात टाकले आणि त्यास अटक केली. 47तेथे जवळ उभे असलेल्यांपैकी एकाने आपली तलवार काढली आणि महायाजकाच्या नोकरावर वार करून त्याचा कान कापून टाकला. 48नंतर येशू त्यांना म्हणाला, “मी लुटारू असल्याप्रमाणे तुम्ही तलवारी आणि सोटे घेऊन मला पकडायला बाहेर पडलात काय? 49मी दररोज परमेश्वराच्या भवनात शिकवीत असता तुम्हाबरोबर होतो आणि तुम्ही मला अटक केली नाही. परंतु शास्त्रलेख पूर्ण झालाच पाहिजे.” 50सर्व शिष्य त्यास सोडून पळून गेले.
51एक तरूण मनुष्य अंगावर तागाचे वस्त्र पांघरून त्याच्यामागे चालत होता. त्यांनी त्यास धरले, 52परंतु तो तागाचे वस्त्र टाकून उघडाच पळून गेला.
मुख्य याजकांसमोर येशूची चौकशी
मत्त. 26:57-68; लूक 22:66-71; योहा. 18:12-14, 19-24
53नंतर त्यांनी येशूला तेथून महायाजकाकडे नेले आणि सर्व मुख्य याजक लोक, वडील व नियमशास्त्राचे शिक्षक जमा झाले. 54थोडे अंतर ठेवून पेत्र येशूच्या मागे सरळ महायाजकाच्या वाड्यात गेला. तेथे पेत्र कामदारांबरोबर विस्तवाजवळ शेकत बसला.
55मुख्य याजक लोक आणि सर्व यहूदी सभा येशूला जिवे मारण्यासाठी पुरावा गोळा करण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु त्यांना काही मिळेना. 56पुष्कळांनी त्याच्याविरुध्द खोटी साक्ष दिली. परंतु त्यांची साक्ष सारखी नव्हती. 57नंतर काहीजण उभे राहीले आणि त्याच्याविरुध्द साक्ष देऊन म्हणाले, आम्ही त्यास असे म्हणताना ऐकले की, 58“हाताने बांधलेले परमेश्वराचे भवन मी पाडून टाकीन आणि हातांनी न बांधलेले असे दुसरे भवन तीन दिवसात उभारीन.” 59परंतु तरीही याबाबतीत त्यांच्या साक्षीत मेळ नव्हता. 60नंतर महायाजक त्यांच्यापुढे उभा राहिले आणि त्याने येशूला विचारले, “तू उत्तर देणार नाहीस काय? हे लोक तुझ्याविरुद्ध आरोप करताहेत हे कसे?” 61परंतु येशू गप्प राहिला. त्याने उत्तर दिले नाही. नंतर महायाजकाने पुन्हा विचारले, “धन्यवादिताचा पुत्र ख्रिस्त तो तू आहेस काय?” 62येशू म्हणाला, “मी आहे,
आणि तुम्ही मनुष्याच्या पुत्राला सर्वसमर्थ
देवाच्या उजवीकडे बसलेले
व आकाशातील मेघांसह येताना पाहाल.”
63महायाजकाने आपले कपडे फाडले आणि म्हणाला, “आपणाला अधिक साक्षीदारांची काय गरज आहे? 64तुम्ही निंदा ऐकली आहे. तुम्हास काय वाटते?” सर्वांनी त्यास मरणदंड योग्य आहे अशी शिक्षा फर्मावली. 65काहीजण त्याच्यावर थुंकू लागले. त्याचे तोंड झाकून बुक्क्या मारू लागले व त्यास म्हणू लागले, “ओळख बरे, तुला कोणी मारले?” कामदारांनी त्यास ताब्यात घेतले आणि मारले.
पेत्र येशूला नाकारतो
मत्त. 26:69-75; लूक 22:54-62; योहा. 18:15-18, 25-27
66पेत्र अंगणात असतानाच महायाजकाच्या दासीपैकी एक तेथे आली. 67आणि तिने पेत्राला शेकताना पाहिले. तेव्हा तिने त्याच्याकडे निरखून पाहिले व म्हणाली, “तू सुद्धा नासरेथकर येशूबरोबर होतास ना?” 68परंतु पेत्राने ते नाकारले आणि म्हणाला, “तू काय म्हणतेस हे मला कळत नाही व समजतही नाही.” पेत्र अंगणाच्या दरवाजाच्या देवडीवर गेला आणि कोंबडा आरवला. 69जेव्हा दासीने त्यास पाहिले तेव्हा जे लोक तेथे होते त्यांना ती म्हणू लागली की, “हा मनुष्य त्यांच्यापैकीच एक आहे.” 70पेत्राने पुन्हा ते नाकारले. नंतर थोड्या वेळाने तेथे उभे असलेले लोक पेत्राला म्हणाले, “खात्रीने तू त्यांच्यापैकी एक आहेस, कारण तू सुद्धा गालीली आहेस.” 71पेत्र निर्भत्सना करीत व शपथ वाहून म्हणाला, “तुम्ही ज्या मनुष्याविषयी बोलत आहात त्यास मी ओळखत नाही!” 72आणि लगेच दुसऱ्यांदा कोंबडा आरवला, “दोन वेळा कोंबडा आरवण्यापूर्वी तू मला तीन वेळा नाकारशील,” असे येशू म्हणाला होता याची पेत्राला आठवण झाली व तो अतिशय दुःखी झाला व मोठ्याने रडला.
सध्या निवडलेले:
मार्क 14: IRVMar
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
MAR-IRV
Creative Commons License
Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.