YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मार्क 5

5
गरसेकर भूतग्रस्ताला येशू बरे करतो
मत्त. 8:28-9:1; लूक 8:26-39
1मग येशू आणि त्याचे शिष्य सरोवराच्या पलीकडे, गरसेकरांच्या प्रदेशात आले. 2तो तारवातून उतरताच अशुद्ध आत्मा लागलेला एक मनुष्य कबरांतून निघून त्यास भेटला. 3तो कबरांमध्ये राहत असे व त्यास साखळदंडाने आणखी बांधून ठेवणे आता कोणाला शक्य नव्हते. 4कारण त्यास पुष्कळ वेळा बेड्यांनी व साखळदंडांनी बांधले असताही, त्याने साखळदंड तोडून टाकले होते व बेड्यांचे तुकडे तुकडे केले होते आणि त्यास ताब्यात ठेवण्याचे सामर्थ्य कोणालाही नव्हते. 5तो नेहमी रात्रंदिवस कबरांमध्ये व डोंगरांमध्ये राहून ओरडत असे व टोकदार दगडांनी आपले अंग ठेचून घेत असे. 6येशूला दुरून पाहताच, तो धावत आला व त्याच्या पाया पडला. 7आणि मोठ्याने ओरडून म्हणाला, “हे येशू, परात्पर देवाच्या पुत्रा, तू मध्ये का पडतोस? मी तुला देवाची शपथ घालतो, मला छळू नकोस.” 8कारण येशू त्यास म्हणत होता, “अरे अशुद्ध आत्म्या, या मनुष्यातून निघ.” 9त्याने त्यास विचारले, “तुझे नाव काय?” त्याने उत्तर दिले, “माझे नाव सैन्य, कारण आम्ही पुष्कळ आहोत. 10आणि आम्हास या देशातून घालवू नकोस” अशी तो त्यास आग्रहाने विनंती करत होता. 11तेथे डोंगराच्या कडेला डुकरांचा एक मोठा कळप चरत होता. 12तेव्हा अशुद्ध आत्म्यांनी त्यास विनंती केली की, “आम्ही त्या डुकरांत शिरावे, म्हणून त्यांच्याकडे आम्हास लावून दे.” 13मग त्याने त्यास परवानगी दिली. तेव्हा ते अशुद्ध आत्मे निघून डुकारात शिरले आणि तो सुमारे दोन हजार डुकरांचा कळप तडक धावत जाऊन कड्यावरून सरोवरात पडला व पाण्यात गुदमरून मरण पावला. 14डुकरे राखणारे पळाले व त्यांनी गावात व शेतमळ्यांत हे वर्तमान सांगितले, तेव्हा काय झाले हे पाहण्यास लोक आले. 15ते येशूजवळ आल्यावर तो भूतग्रस्त, म्हणजे ज्यात सैन्य होते तो, कपडे घातलेला आणि शुद्धीवर आलेला त्यांच्या दृष्टीस पडला आणि त्यांना भीती वाटली. 16ज्यांनी ते पाहिले होते त्यांनी भूतग्रस्ताला काय झाले ते व डुकरांविषयीची हकीकत इतरांना सांगितली. 17तेव्हा आपण आमच्या प्रांतातून निघून जावे असे ते त्यास विनवू लागले. 18मग तो तारवात जात असता, पूर्वी भूतग्रस्त असलेला मनुष्य त्यास विनंती करू लागला की, मलाही तुमच्या सोबत घ्या. 19परंतु त्याने त्यास आपल्या सोबत येऊ दिले नाही, तर त्यास म्हटले, “तू आपल्या घरी स्वकीयांकडे जा आणि प्रभूने तुझ्यासाठी केवढी मोठी कामे केली व तुझ्यावर कशी दया केली हे त्यांना सांग.” 20तेव्हा तो निघाला आणि येशूने जी मोठी कामे त्याच्यासाठी केली होती ती दकापलीस येथे जाहीर करू लागला. तेव्हा सर्वांस आश्चर्य वाटले.
याईराची कन्या
मत्त. 9:18-26; लूक 8:40-56
21मग येशू तारवात बसून पलीकडे परत गेल्यावर त्याच्याजवळ लोकांचा मोठा समुदाय जमला आणि तो सरोवराजवळ होता. 22तेव्हा याईर नावाचा सभास्थानाचा एक अधिकारी येथे आला व त्यास पाहून त्याच्या पाया पडला. 23त्याने आग्रहाने त्यास विनवणी केली की, “माझी लहान मुलगी मरायला टेकली आहे. तिने बरे होऊन जगावे म्हणून आपण येऊन तिच्यावर हात ठेवा.” 24मग तो त्याच्याबरोबर निघाला तेव्हा पुष्कळ लोक त्याच्यामागून चालत होते आणि त्याच्याभोवती गर्दी करीत होते.
येशू एका स्त्रीचा रक्तस्राव नाहीसा करतो
25आणि तेथे रक्तस्रावाने बारा वर्षे पीडलेली एक स्त्री होती. 26तिने बऱ्याच वैद्यांच्या हातून पुष्कळ हाल सोसून आपल्याजवळ जे काही होते ते सर्व खर्च केले होते तरी तिला काही गुण न येता तिचे दुखणे अधिकच झाले होते. 27येशूविषयीच्या गोष्टी ऐकून ती त्या गर्दीत शिरली आणि त्याच्यामागे येऊन त्याच्या वस्त्राला स्पर्श केला. 28कारण ती म्हणत होती, “केवळ याच्या वस्त्रांना स्पर्श जरी केला तरी मी बरी होईन.” 29तेव्हा लगेचच तिचा रक्तस्राव थांबला आणि आपण त्या पीडेपासून बरे झालो आहोत असा तिला शरीरात अनुभव आला. 30आपणामधून शक्ती निघाली आहे हे येशूने आपल्याठायी लगेच ओळखले आणि गर्दीमध्ये वाळून म्हटले, “माझ्या वस्त्रांना कोणी स्पर्श केला?” 31त्याचे शिष्य त्यास म्हणाले, “लोकसमुदाय आपणाभोवती गर्दी करत आहे हे आपण पाहत आहा, तरी आपण म्हणता, मला कोणी स्पर्श केला?” 32मग जिने हे केले होते तिला पाहण्यास त्याने सगळीकडे बघितले. 33तेव्हा ती स्त्री आपल्या बाबतीत जे काही घडले, ते जाणून भीत भीत व कापत कापत त्याच्याकडे आली व त्याच्या पाया पडून तिने त्यास सर्वकाही सत्य सांगितले. 34तो तिला म्हणाला, “मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. शांतीने जा आणि तुझ्या पीडेपासून मुक्त हो.”
येशू याईराच्या मुलीला जिवंत करतो
35येशू हे बोलत आहे इतक्यात सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घराकडून काही माणसे येऊन त्यास म्हणाली, “आपली मुलगी मरण पावली, आता गुरुजींना त्रास कशाला देता?” 36परंतु येशू त्यांच्या बोलण्याकडे लक्ष्य न देता, सभास्थानाच्या अधिकाऱ्याला म्हणाला, “भिऊ नकोस. विश्वास मात्र धर.” 37त्याने पेत्र, याकोब व याकोबाचा भाऊ योहान, यांच्याशिवाय कोणालाही आपल्याबरोबर येऊ दिले नाही. 38मग ते सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घराजवळ आले, तेव्हा रडत असलेल्या व फारच आकांत करीत असलेल्या लोकांची गडबड त्याने पाहिली. 39तो आत जाऊन त्यास म्हणाला, “तुम्ही कशाला रडता व गडबड करता? मूल मरण पावले नाही, झोपी गेले आहे.” 40तेव्हा ते त्यास हसू लागले. पण त्याने त्या सर्वांना बाहेर काढून दिले आणि मुलीचे आई-वडील व आपल्याबरोबरचे शिष्य यांना घेऊन मुलगी होती तेथे तो आत गेला. 41नंतर मुलीच्या हातास धरून तो म्हणाला, “तलीथा कूम,” याचा अर्थ, “मुली, मी तुला सांगतो, ऊठ.” 42आणि लगेच ती मुलगी उठून चालू लागली; (ती बारा वर्षाची होती.) ते अत्यंत आश्चर्यचकित झाले. 43हे कोणाला कळता कामा नये, अशी त्याने त्यांना निक्षून आज्ञा केली आणि तिला खाण्यास द्या असे सांगितले.

सध्या निवडलेले:

मार्क 5: IRVMar

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन