106
इस्त्राएलाची बंडखोरी
1परमेश्वराची स्तुती करा.
परमेश्वर चांगला आहे म्हणून त्यास धन्यवाद द्या.
कारण त्याची कराराची विश्वसनीयता सर्वकाळ टिकून राहते.
2परमेश्वराच्या पराक्रमाची कृत्ये कोण कथन करू शकेल?
किंवा त्याची सर्व स्तुत्य कृत्ये कोण पूर्ण जाहीर करील?
3जे काही योग्य आहे ते करतात
आणि ज्याची कृत्ये न्याय्य आहेत ते आशीर्वादित आहेत.
4हे परमेश्वरा, तू जेव्हा आपल्या लोकांवर कृपा दाखवतोस तेव्हा माझी आठवण कर;
तू त्यांना जेव्हा तारशील मला मदत कर.
5मग मी तुझ्या निवडलेल्यांचा उत्कर्ष पाहिन, परमेश्वरा,
तुझ्या राष्ट्रांच्या आनंदाने मी हर्ष करीन,
आणि तुझ्या वतनाबरोबर उत्सव करीन.
6आम्ही आमच्या पूर्वजांसारखेच पाप केले;
आम्ही चूक केली आणि आम्ही दुष्कृत्ये केली.
7आमच्या वडिलांनी मिसर देशात तुझ्या आश्चर्यकारक कृत्याचे महत्व ओळखले नाही;
त्यांनी तुझ्या कराराच्या विश्वसनीयतेच्या कृत्यांकडे दुर्लक्ष केले;
तर समुद्राजवळ, लाल समुद्राजवळ त्यांनी बंडखोरी केली.
8तरीसुद्धा, आपल्या नावाकरिता त्याने त्यांचे तारण केले,
यासाठी की, त्याने आपले सामर्थ्य उघड करावे.
9त्याने लाल समुद्राला धमकावले आणि तो कोरडा झाला.
मग त्याने त्यांना मैदानातून चालावे तसे खोल पाण्याच्या जागेतून नेले.
10त्यांचा द्वेष करणाऱ्याच्या हातातून त्याने त्यास वाचवले,
आणि त्यांना त्यांच्या शत्रूंच्या शक्तीपासून सोडवले.
11परंतु त्यांच्या शत्रूंना पाण्याने झाकून टाकले.
त्यापैकी एकही जण वाचला नाही.
12नंतर त्यांनी त्याच्या वचनावर विश्वास ठेवला
आणि त्यांनी त्याची स्तुती गाइली.
13परंतु ते लवकरच त्याने जे केले ते विसरले;
त्यांनी त्याच्या सूचनेची वाट पाहिली नाही.
14रानात त्यांची अतृप्त हाव अनावर झाली,
आणि त्यांनी देवाला आव्हान दिले.
15त्याने त्यांना त्यांच्या विनंतीप्रमाणे दिले,
पण त्याने रोग पाठवला तो त्यांचे शरीर नष्ट करू लागला.
16त्यांनी छावणीत मोशे
आणि परमेश्वराचा पवित्र याजक अहरोन यास चिडीस आणले.
17जमीन दुभंगली आणि तिने दाथानाला गिळून टाकले,
आणि अबीरामाच्या अनुयांना झाकून टाकले.
18त्यांच्यात अग्नीने पेट घेतला;
अग्नीने त्या दुष्टांना खाऊन टाकले.
19त्यांनी होरेबात सोन्याचे वासरू केले.
आणि त्यांनी त्या ओतीव मूर्तीची पूजा केली.
20त्यांनी गवत खाणाऱ्या बैलाच्या मूर्तीसाठी
आपल्या वैभवी देवाची अदलाबदल केली.
21ते आपल्या तारणाऱ्या देवाला विसरले,
ज्याने मिसरात महान कृत्ये केली होती.
22त्याने हामाच्या देशात आश्चर्यकारक गोष्टी केल्या
आणि लाल समुद्राजवळ पराक्रमी कृत्ये केली.
23म्हणून तो म्हणाला, आपण त्यांचा नाश करू.
जर त्याचा निवडलेला मोशे त्यास क्रोध त्यांचा नाश करण्यापासून मागे फिरायला,
त्याच्यापुढे खिंडारात उभा राहिला नसता तर त्याने तसे केले असते.
24नंतर त्यानीं फलदायी देश तुच्छ मानला;
त्यांनी त्याच्या वचनावर विश्वास ठेवला नाही,
25पण आपल्या तंबूत त्यांनी कुरकुर केली,
आणि परमेश्वराचा शब्द मानिला नाही.
26म्हणून त्याने त्यांच्याविषयी शपथ वाहिली की,
मी त्यांना रानात मरू देईन.
27त्यांचे वंशज राष्ट्रामध्ये विखरीन,
आणि त्यांना परक्या राष्ट्रांमध्ये विखरवून टाकीन.
28त्यांनी बआल-पौराची पूजा केली,
आणि मरण पावलेल्यांना अर्पण केलेले बली त्यांनी खाल्ले.
29त्यांनी त्यांच्या कृतीने त्यास कोपविले,
आणि त्यांच्यात मरी पसरली.
30पण फिनहास मध्यस्थी उठला;
आणि मरी बंद झाली.
31हे त्यास नितीमत्व असे
सर्व पिढ्यानपिढ्या सर्वकाळ गणण्यात आले.
32त्यांनी मरीबा येथील जलाजवळही त्यास संताप आणला,
आणि त्यांमुळे मोशेला दुःख सोसावे लागले.
33त्यांनी त्याच्यात कडवटपणा आणला,
आणि तो अविचाराने बोलला.
34परमेश्वराने त्यांना आज्ञा दिल्याप्रमाणे
त्यांनी राष्ट्रांचा नाश केला नाही.
35पण ते अन्यजाती लोकांच्या राष्ट्रात मिसळले,
व त्यांचे मार्ग शिकले.
36आणि त्यांच्या मूर्तींची पूजा केली,
ते त्यांच्यासाठी सापळा बनले.
37त्यांनी आपली मुले आणि मुली यांचा भुतांना यज्ञ केला.
38त्यांनी निरपराध्यांचे रक्त पाडले,
त्यांनी आपली मुले आणि मुली,
ज्यांचा यज्ञ त्यांनी कनानाच्या मूर्तीस केला,
त्यांचे रक्त पाडले आणि भूमी रक्ताने विटाळली गेली.
39ते आपल्या कृत्यांनी अशुद्ध झाले,
आणि आपल्या कृतींत अनाचारी बनले.
40त्यामुळे परमेश्वर त्याच्या लोकांवर रागावला,
त्यास आपल्या स्वतःच्या वतनाचा वीट आला.
41त्याने त्यांना राष्ट्रांच्या हाती दिले,
आणि ज्यांनी त्यांचा द्वेष केला त्यांनी त्यांच्यावर राज्य केले.
42त्यांच्या शत्रूंनी त्यांना पीडीले,
आणि ते त्यांच्या अधिकाराखाली ते अधीन झाले.
43अनेक वेळा तो त्यांना मदत करण्यास आला,
पण ते त्याच्याविरुध्द बंड करीत राहीले,
आणि ते आपल्या पापाने नीच करण्यात आले.
44तथापि त्याने त्यांची मदतीसाठीची आरोळी ऐकली,
तेव्हा त्याने त्यांच्या क्लेशाकडे लक्ष दिले.
45त्यांच्यासाठी त्याने आपल्या कराराची आठवण केली,
आणि आपल्या अपार दयेने सौम्यता धारण केली.
46त्याने त्यांचा पाडाव करणाऱ्या सर्वांच्या मनात
त्यांच्यावर दया येईल असे केले.
47हे परमेश्वरा, आमच्या देवा, आम्हास तार.
आम्हास राष्ट्रातून काढून एकत्र गोळा कर;
म्हणजे आम्ही तुझ्या पवित्र नावाचे आभार मानू आणि तुझे गुणगान करू.
48इस्राएलाचा देव, माझा परमेश्वर,
ह्याचा अनादिकालापासून अनंतकालापर्यंत धन्यवाद होवो.
सर्व लोकांनी म्हणावे, “आमेन.”
परमेश्वराची स्तुती करा.