1
प्रस्तावना व नमस्कार येशू ख्रिस्ताचे प्रकटीकरण
1हे येशू ख्रिस्ताचे प्रकटीकरण आहे. ते देवाने ज्या गोष्टी लवकरच घडणे आवश्यक आहेत, त्या आपल्या दासांना दाखविण्यासाठी ख्रिस्ताला दिले, आणि ख्रिस्ताने त्याच्या देवदूताला पाठवून या सर्व गोष्टी योहानाला कळविण्यास सांगितले. 2योहानाने देवाच्या वचनाविषयी व येशू ख्रिस्ताविषयी म्हणजे त्याने जे जे पाहिले त्या सर्वांविषयी साक्ष दिली; 3या संदेशाची वचने वाचणारे, ती ऐकणारे व त्यामध्ये लिहिलेल्या गोष्टी पाळतात ते धन्य आहेत कारण काळ जवळ आला आहे.
4योहानाकडून, आशिया प्रांतातील सात मंडळ्यांना जो आहे, जो होता व जो येणार आहे त्याच्याकडून आणि त्याच्या राजासनासमोरील सात आत्म्यांकडून तुम्हास कृपा व शांती असो. 5आणि येशू ख्रिस्त विश्वासू साक्षी जो मरण पावलेल्यांमधून प्रथम जन्मलेला आणि पृथ्वीवरील राजांचा तो अधिपती आहे आणि ज्या येशूने आमच्यावर प्रीती केली आणि ज्याने आपल्या रक्ताने आमच्या पापांतून आम्हास मुक्त केले; 6ज्याने आम्हास त्याच्या देवपित्यासाठी एक राज्य आणि याजक बनविले त्यास गौरव व सामर्थ्य युगानुयुग असोत, आमेन.
7“पहा, तो ढगांसह येत आहे,”
“प्रत्येक डोळा त्यास पाहील,
ज्यांनी त्यास भोकसले तेसुध्दा त्यास पाहतील,”
पृथ्वीवरील सर्व वंश “त्याच्यामुळे आकांत करतील.”
असेच होईल, आमेन.
8“प्रभू देव जो आहे, जो होता आणि जो येणार आहे, जो सर्वसमर्थ तो म्हणतो मी अल्फा आणि ओमेगा आहे.”
मनुष्याच्या पुत्राचा साक्षात्कार
9मी योहान, जो तुमचा बंधू आणि येशूमधील क्लेश, राज्य व सहनशीलता ह्यांचा तुम्हाबरोबर भागीदार आहे, तो मी देवाच्या वचनामुळे आणि येशूच्या साक्षीमुळे मी पात्म नावाच्या बेटावर होतो. 10मी प्रभूच्या दिवशी आत्म्यात होतो. माझ्यामागे मी कर्ण्याच्या आवाजासारखी मोठी वाणी ऐकली. 11ती म्हणाली, “तू जो या सर्व गोष्टी पाहतोस त्या तू एका पुस्तकात लिही आणि इफिस, स्मुर्णा, पर्गम, थुवतीरा, सार्दीस, फिलदेल्फिया आणि लावदीकिया या सात शहरातील मंडळ्यांना पाठव.”
12माझ्याबरोबर बोलत असलेली वाणी पाहण्यासाठी मी मागे वळलो, मागे वळून पाहतो, तो सोन्याच्या सात दीपसमया पाहिल्या. 13त्या समयांच्या मध्यभागी मनुष्याच्या पुत्रासारखा व लांब पायघोळ झगा घातलेला, छातीवर सोन्याचा पट्टा बांधलेला, असा कोणीएक माझ्या दृष्टीस पडला. 14त्याचे डोके आणि केस बर्फासारख्या पांढऱ्या लोकरीप्रमाणे शुभ्र होते त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते; 15त्याचे पाय जणू काय भट्टीतून काढलेल्या जळजळीत सोनपितळेसारखे होते आणि त्याची वाणी अनेक जलप्रवाहांच्या ध्वनीसारखी होती. 16त्याच्या उजव्या हातात सात तारे होते; त्याच्या तोंडातून दोन्ही बाजूंनी तीक्ष्ण धार असणारी तलवार निघाली होती. त्याचा चेहरा दिवसाच्या अतिशय प्रखर तेजाने प्रकाशणाऱ्या सूर्यासारखा दिसत होता.
17मी त्यास पाहिले तेव्हा मी मरण पावल्यासारखा त्याच्या पायाजवळ पडलो त्याने त्याचा उजवा हात माझ्यावर ठेवला आणि म्हणाला, “घाबरू नको! मी पहिला आणि शेवटला 18आणि जो जिवंत तो मी आहे; मी मरण पावलो होतो, पण तरी पाहा, मी युगानुयुग जिवंत आहे! आणि माझ्याजवळ मरणाच्या व मृतलोकाच्या किल्ल्या आहेत. 19म्हणून ज्या गोष्टी तू पाहतोस, ज्या घडत आहेत आणि ज्या यानंतर घडणार आहेत त्याही लिही. 20जे सात तारे तू माझ्या हातात पाहिलेस आणि ज्या सात सोन्याच्या दीपसमया तू पाहिल्यास त्यांचा गुपित अर्थ हा आहे की सात समया या सात मंडळ्या आहेत आणि सात तारे हे सात मंडळ्यांचे देवदूत आहेत.”