YouVersion लोगो
सर्च आयकॉन

रोम. 6

6
ख्रिस्ताशी एक असणे व पाप करत राहणे हे परस्परविरोधी आहे
1तर आता आपण काय म्हणावे? कृपा अधिक व्हावी म्हणून आपण पापात रहावे काय? 2कधीच नाही! आपण जे पापाला मरण पावलो आहोत ते त्यामध्ये ह्यापुढे कसे राहणार? 3किंवा आपण जितक्यांनी ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा घेतला, त्या आपण त्याच्या मरणात बाप्तिस्मा घेतला हे तुम्ही जाणत नाही काय? 4म्हणून आपण त्याच्या मरणातील बाप्तिस्म्याने त्याच्याबरोबर पुरले गेलो, ते ह्यासाठी की जसा ख्रिस्त पित्याच्या गौरवामुळे मरण पावलेल्यांमधून उठवला गेला तसेच आपणही जीवनाच्या नवेपणात चालले पाहिजे. 5कारण जर त्याच्या मरणाच्या रूपात आपण त्याच्याशी जोडलेले आहोत तर त्याच्या पुन्हा उठण्याच्या रूपात आपण त्याच्याशी जोडलेले होऊ. 6आपण जाणतो की आपल्यामधील जुना मनुष्य त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळला गेला आहे, म्हणजे पापाचे शरीर नष्ट होऊन आपण पुढे पापाचे दास्य करू नये. 7कारण जो मरण पावला आहे तो पापापासून मुक्त होऊन न्यायी ठरवलेला आहे. 8पण आपण जर ख्रिस्ताबरोबर मरण पावलो असलो, तर आपण त्याच्याबरोबर जिवंतही राहू असा आपण विश्वास ठेवतो. 9कारण आपण हे जाणतो की, मरण पावलेल्यांमधून उठलेला ख्रिस्त पुन्हा मरणार नाही. त्याच्यावर मरणाची सत्ता अजिबात राहिली नाही. 10कारण तो मरण पावला तो पापासाठी एकदाच मरण पावला, पण जिवंत आहे तो देवासाठी जिवंत आहे. 11तसेच आपण ख्रिस्त येशूमध्ये खरोखर पापाला मरण पावलेले पण देवाला जिवंत आहोत असे तुम्ही स्वतःला माना.
12म्हणून तुम्ही आपल्या मरणाधीन शरीरात त्याच्या वासनांच्या अधीन होण्यास पापाला राज्य चालवू देऊ नका. 13आणि तुम्ही आपले अवयव अनीतीची साधने म्हणून पापाला समर्पण करू नका. पण तुम्ही आपल्या स्वतःला मरण पावलेल्यातून जिवंत झालेले असे देवाला समर्पण करा आणि आपले स्वतःचे अवयव नीतिमत्त्वाची साधने म्हणून तुम्ही देवाला समर्पण करा. 14तुमच्यावर पापाची सत्ता चालणार नाही कारण तुम्ही नियमशास्त्राधीन नाही, पण कृपेखाली आणले गेला आहात.
गुलामगिरीवरुन केलेला बोध
15मग काय? मग आपण नियमशास्त्राखाली नसून कृपेखाली आणले गेलो आहोत, म्हणून आपण पाप करावे काय? कधीच नाही. 16तुम्ही ज्याला आपल्या स्वतःला दास म्हणून आज्ञा पाळण्यास समर्पण करता, तुम्ही ज्याच्या आज्ञा पाळता त्याचे तुम्ही दास आहात. ते मरणासाठी पापाचे किंवा नीतिमत्त्वासाठी आज्ञापालनाचे, हे तुम्ही जाणत नाही काय? 17पण देवाला धन्यवाद कारण तुम्ही पापाचे दास असतानाही तुम्ही ज्या शिक्षणाच्या शिस्तीखाली ठेवला गेला त्याच्या तुम्ही मनापासून आज्ञा पाळल्या.
18आणि पापापासून मुक्त केले जाऊन नीतिमत्त्वाचे दास झाला. 19मी तुमच्या देहाच्या अशक्तपणामुळे मनुष्यांच्या व्यवहारास अनुसरून बोलतो कारण जसे तुमचे अवयव अमंगळपणाला व अनाचाराला अनाचारासाठी दास होण्यास समर्पित केलेत तसेच आता तुमचे अवयव नीतिमत्त्वाला पवित्रीकरणासाठी दास होण्यास समर्पण करा. 20कारण तुम्ही पापाचे दास होता, तेव्हा तुम्ही नीतिमत्त्वाच्या बाबतीत स्वतंत्र होता. 21आता तुम्हास ज्यांची लाज वाटते त्या गोष्टींपासून तेव्हा तुम्हास काय फळ मिळत होते? कारण त्या गोष्टींचा शेवट मरण आहे. 22पण आता तुम्ही पापापासून मुक्त केले जाऊन देवाचे दास झाला असल्यामुळे, आता तुम्हास पवित्रीकरण हे फळ आहे आणि शेवटी सार्वकालिक जीवन आहे. 23कारण पापाचे वेतन मरण आहे, पण आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे सार्वकालिक जीवन हे देवाचे कृपादान आहे.

सध्या निवडलेले:

रोम. 6: IRVMar

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन