YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 करिंथ 8

8
मूर्तीला दाखवलेला नैवेद्य
1आता मूर्तीला दाखवलेल्या नैवेद्यांविषयी तुम्ही जे लिहिले होते, त्याच्याकडे मी वळतो. आपल्या सर्वांना ज्ञान आहे, असे म्हटले जाते, हे खरे आहे. असे ज्ञान अहंकार निर्माण करते परंतु प्रीती प्रगती साधत असते. 2जर कोणाला वाटत असेल की, आपल्याला एखादी गोष्ट कळते, तर ज्याप्रमाणे कळले पाहिजे, त्याप्रमाणे त्याला त्याचे आकलन झालेले नसते. 3मात्र जो देवावर प्रीती करतो, त्याला देव ओळखतो.
4मूर्तीला दाखवलेले नैवेद्य खाण्यासंबंधाने आपल्याला ठाऊक आहे की, जे खरोखर अस्तित्वात नाही त्याचे प्रतिनिधित्व मूर्ती करीत असते आणि एकाखेरीज दुसरा देव नाही. 5ज्यांना देव म्हणून मानतात अशी स्वर्गात किंवा पृथ्वीवर बरीच दैवते व बरेच प्रभू असतील, 6तरी आपला एकच देव म्हणजे पिता आहे, त्याने सर्व काही निर्माण केले व आपण त्याच्यासाठी जगतो आणि आपला एकच प्रभू येशू ख्रिस्त आहे, त्याच्याद्वारे सर्व काही निर्माण झाले व आपण त्याच्या कृपेने जगतो.
मनाची चलबिचल होऊ नये म्हणून खबरदारी
7तथापि हे ज्ञान सर्वांना असते असे नाही, तर कित्येकांवर मूर्तीपूजेच्या सवयीचा संस्कार अजून राहिल्यामुळे ते मूर्तीला दाखवलेले खाद्य नैवेद्य म्हणून खातात, तेव्हा त्यांची सदसद्विवेकबुद्धी दुर्बल असल्यामुळे ती विटाळते. 8देवापुढे आपली योग्यायोग्यता अन्नाने ठरत नाही; न खाण्याने आपण कमी होत नाही आणि खाण्याने आपण अधिक होत नाही.
9मात्र हे तुमचे स्वातंत्र्य दुर्बळास अडथळ्याचे कारण होऊ नये म्हणून जपा. 10जाणकार असलेल्या तुला मूर्तीच्या देवळात जेवायला बसलेले कोणी पाहिले व तो पाहणारा दुर्बल असल्यास, मूर्तीला दाखवलेले नैवेद्य खाण्यास त्याच्या सदसद्विवेकबुद्धीला चालना मिळेल ना? 11ह्याप्रमाणे ज्याच्यासाठी ख्रिस्त मरण पावला, असा जो दुर्बल बंधू, त्याचा तुझ्या ह्या ज्ञानाने नाश होईल. 12बंधूंविरुद्ध असे पाप करून व त्यांच्या दुर्बल सदसद्विवेकबुद्धीला धक्का देऊन तुम्ही ख्रिस्ताविरुद्ध पाप करता. 13म्हणून अन्नामुळे माझा बंधू पापात पडत असेल, तर तो पापात पडू नये म्हणून मी मांस कधीच खाणार नाही.

सध्या निवडलेले:

1 करिंथ 8: MACLBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन