YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांचे कार्य 19

19
इफिस येथे पौल
1अपुल्‍लो करिंथ येथे असताना पौल त्या विभागाच्या मधल्या मार्गे जाऊन इफिस येथे पोहचला, तेथे काही शिष्य त्याला आढळले. 2त्यांना त्याने विचारले, “तुम्ही विश्वास ठेवला तेव्हा तुम्हांला पवित्र आत्मा मिळाला काय?” त्यांनी त्याला म्हटले, “पवित्र आत्मा आहे, हेच आम्ही कधी ऐकले नाही.”
3तो त्यांना म्हणाला, “तर तुम्ही कसला बाप्तिस्मा घेतला?” ते म्हणाले, “योहानचा बाप्तिस्मा.”
4पौलाने म्हटले, “योहान पश्चात्तापाचा बाप्तिस्मा देत असे. तो लोकांना सांगत असे की, ‘माझ्यामागून येणाऱ्यावर म्हणजे येशूवर तुम्ही विश्वास ठेवावा.’”
5हे ऐकून त्यांनी प्रभू येशूच्या नावाने बाप्तिस्मा घेतला. 6पौलाने त्यांच्यावर हात ठेवले तेव्हा त्यांच्यावर पवित्र आत्मा आला. ते अपरिचित भाषा बोलू लागले व ईश्वरी संदेश देऊ लागले. 7ते सगळे सुमारे बारा पुरुष होते.
इफिस येथे पौल
8पौल सभास्थानात जाऊन देवाच्या राज्याविषयी वादविवाद करीत व प्रमाण पटवीत तीन महिने निर्भीडपणे संदेश देत गेला. 9परंतु काही जण निगरगट्ट बनून श्रद्धा न ठेवता लोकांसमक्ष प्रभूच्या मार्गाची निंदा करू लागले. पौलाने त्यांच्यामधून निघून शिष्यांना वेगळे केले आणि तुरन्नच्या सभागृहात तो दररोज वादविवाद करू लागला. 10असे दोन वर्षे चालल्यामुळे आशियात राहणाऱ्या सर्व यहुदी व ग्रीक लोकांनी प्रभूचे वचन ऐकले.
11परमेश्वर पौलाच्या हातून असामान्य चमत्कार घडवीत होता. 12त्याने वापरलेले रुमाल किंवा त्याच्या अंगावरचे कपडे रोग्यांकडे आणले तरीदेखील त्यांचे रोग दूर होत व दुष्ट आत्मे त्यांच्यांतून निघून जात असत. 13काही भटके यहुदी, दुष्ट आत्मे लागलेल्या लोकांना प्रभू येशूचे नाव उच्चारून म्हणू लागले, “ज्या येशूची पौल घोषणा करतो त्याची तुम्हांला शपथ घालतो.” 14एक मुख्य यहुदी याजक स्किवा ह्याला सात मुलगे होते, ते असे करत होते.
15त्यांना दुष्ट आत्म्याने उत्तर दिले, “येशूला मी ओळखतो व पौलाची मला माहिती आहे, पण तुम्ही कोण आहात?”
16ज्या माणसाला दुष्ट आत्मा लागला होता त्याने त्यांच्यावर उडी घालून त्या सर्वांना हटविले आणि त्यांना इतका मार दिला की, ते घायाळ होऊन उघडे-नागडे त्या घरातून पळून गेले. 17इफिस येथे राहणारे यहुदी व ग्रीक ह्या सर्वांना हे कळले, तेव्हा ते भयभीत झाले आणि प्रभू येशूच्या नावाचा महिमा वाढला. 18विश्वास ठेवणाऱ्या लोकांपैकी पुष्कळ जणांनी येऊन आपली पापे उघडपणे पदरात घेतली. 19जादूटोणा करणाऱ्यांपैकी बऱ्याच जणांनी आपली पुस्तके जमा करून सर्वांदेखत ती जाळून टाकली आणि त्यांच्या किंमतीची बेरीज केली तेव्हा ती पन्नास हजार चांदीच्या नाण्यांइतकी झाली. 20ह्याप्रमाणे प्रभूच्या सामर्थ्याने वचन पसरत जाऊन प्रबल झाले.
पौलाची पुढची योजना
21हे झाल्यावर मासेदोनिया व अखया ह्या प्रांतांतून यरुशलेम येथे जावे असे पौलाने आपल्या मनात ठरवून म्हटले, ‘तेथे गेल्यावर मला रोम शहरही पाहिले पाहिजे.’ 22त्याची सेवा करणाऱ्यांपैकी तीमथ्य व एरास्त ह्या दोघांना मासेदोनियात पाठवून तो स्वतः काही दिवस आशिया प्रांतात राहिला.
इफिस येथील दंगा
23ह्या सुमारास प्रभूच्या मार्गाविषयी इफिस येथे बराच तणाव निर्माण झाला. 24देमेत्रिय नावाचा एक सोनार अर्तमी देवीच्या मंदिराच्या रुप्याच्या प्रतिकृती करून कारागिरांना बराच कामधंदा मिळवून देत असे. 25त्याने त्यांना व तसल्याच इतर कारागिरांना एकत्र जमवून म्हटले, “गड्यांनो, ह्या धंद्यात आपल्याला पैसे मिळतात हे तुम्हांला ठाऊकच आहे. 26तुम्ही पाहता व ऐकता की, हाताने केलेले देव हे देवच नाहीत, असे त्या पौलाने केवळ इफिस येथेच नव्हे तर बहुतेक सर्व आशिया प्रांतात सांगून व पुष्कळ लोकांच्या मनात भरवून त्यांना फितविले आहे. 27ह्यामुळे ह्या आपल्या धंद्याची बदनामी होण्याचा धोका आहे. इतकेच नव्हे तर ज्या महादेवी अर्तमीची पूजा सर्व आशिया प्रांत किंबहुना जगसुद्धा करते, तिचे मंदिर निरुपयोगी ठरण्याचा व तिचे स्वतःचे महत्त्व नष्ट होण्याचा धोका आहे.”
28हे ऐकल्यावर ते क्रोधाविष्ट होऊन ओरडू लागले, “इफिसकरांची अर्तमी थोर आहे!” 29त्यामुळे शहरात गोंधळ उडाला आणि पौलाचे सहप्रवासी, मासेदोनियाचे गायस व अरिस्तार्ख ह्यांना पकडून त्यांना ओढीत ओढीत ते एकजुटीने रंगभवनात धावत गेले. 30तेव्हा गर्दीला सामोरे जावे असे पौलाच्या मनात होते, पण शिष्यांनी त्याला तसे करू दिले नाही. 31शिवाय आशिया प्रांताच्या अधिकाऱ्यांपैकी कित्येक जण त्याचे मित्र होते. त्यांनीही त्याला निरोप पाठवून आग्रह केला की, “रंगभवनात जाऊन स्वतःला धोक्यात घालू नका.” 32तेव्हा वेगवेगळ्या प्रकारची आरडाओरड होऊ लागली, लोकांचा एकच गोंधळ उडाला कारण आपण कशासाठी जमलो आहोत, हेदेखील बहुतेकांना कळले नाही. 33यहुदी लोकांच्या गर्दीतून काही लोकांनी आलेक्सांद्राला प्रवृत्त करून पुढे केले, तेव्हा तो हाताने खुणावून लोकांपुढे समर्थन करण्याचा प्रयत्न करीत होता. 34परंतु तो यहुदी आहे, असे समजल्यावर सुमारे दोन तासपर्यंत “इफिसकरांची अर्तमी देवी महान आहे!” असा उद्घोष सर्वांनी सुरू ठेवला.
35शेवटी नगराचा प्रशासक लोकांना शांत करून म्हणाला, “अहो इफिसकरांनो, महान अर्तमीचे देऊळ व स्वर्गातून पडलेली मूर्ती ह्यांचे इफिस नगर हे संरक्षक आहे, हे कोणाला ठाऊक नाही? 36ह्या गोष्टी निर्विवाद आहेत. तुम्ही शांत व्हा. काही अविचार करू नका. 37जी माणसे तुम्ही येथे आणली आहेत, ती देवळे लुटणारी किंवा आपल्या देवीची निंदा करणारी नाहीत. 38देमेत्रिय व त्याच्या सोबतीचे कारागीर ह्यांचा कोणाशी वाद असल्यास न्यायालये उघडी आहेत व न्यायाधीशही आहेत, त्यांच्यापुढे त्यांनी एकमेकांवर फिर्यादी कराव्यात. 39पण ह्यापलीकडे तुमची काही मागणी असली, तर तिच्याबद्दल नागरिकांच्या रीतसर सभेत ठरवले जाईल. 40ह्या दंग्याचे कारण काय, ह्याचा जबाब आपणास देता येण्यासारखा नसल्यामुळे आजच्या प्रसंगावरून आपणांवर दंगल केल्याचा आरोप येण्याचा धोका आहे.” 41असे बोलून त्याने गर्दी पांगवली.

सध्या निवडलेले:

प्रेषितांचे कार्य 19: MACLBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन