YouVersion लोगो
सर्च आयकॉन

इब्री 7

7
मलकीसदेकसारखा प्रमुख याजक प्रभू येशू ख्रिस्त
1हा मलकीसदेक शालेमचा राजा व परात्पर देवाचा याजक होता; अब्राहाम जेव्हा राजांना पराभूत करून परत आला, तेव्हा ह्याने त्याला सामोरे जाऊन आशीर्वाद दिला 2व अब्राहामने ह्याला सर्व लुटीचा दशमांश दिला; तो आपल्या नावाच्या अर्थाप्रमाणे एक तर नीतिमत्त्वाचा राजा आणि दुसरे शालेमचा राजा म्हणजे शांतीचा राजा होता; 3त्याचे मातापिता, वंशावळ, जन्मदिवस अथवा त्याच्या आयुष्याचा शेवट ह्यांचा उल्लेख कोठेही सापडत नाही. तरी त्याला देवाच्या पुत्रासारखे करण्यात आल्यामुळे तो शाश्वत याजक राहतो.
4तर आता कुलाधिपती अब्राहाम ह्याने ज्याला लुटीतील उत्तम वस्तूंचा दशमांश दिला तो केवढा मोठा असावा हे ध्यानात घ्या. 5लेवीच्या संतानांपैकी ज्यांना याजकपण मिळते त्यांना लोकांकडून, म्हणजे अब्राहामच्या पोटी जन्म घेतलेल्या आपल्या बांधवांकडून, नियमशास्त्राप्रमाणे दशमांश घेण्याची आज्ञा आहे; 6परंतु मलकीसदेक त्यांच्या वंशातला नव्हता. त्याने अब्राहामकडून दशमांश घेतला आणि ज्याला वचने मिळाली होती, त्याला त्याने आशीर्वाद दिला. 7श्रेष्ठाकडून कनिष्ठाला आशीर्वाद मिळतो, हे निर्विवाद आहे. 8याजकांच्या बाजूने पाहिले तर, मर्त्य माणसांना दशमांश मिळतात, परंतु मलकीसदेकच्या बाजूने पाहिले तर, अमर आहे असे ज्याच्याविषयी धर्मशास्त्रात म्हटले आहे त्याला मिळाले; 9तसेच दशमांश घेणारा लेवी ह्यानेही अब्राहामच्याद्वारे दशमांश दिला, असे म्हणता येईल, 10कारण त्याचा पूर्वज अब्राहाम ह्याला मलकीसदेक भेटला त्या वेळेस लेवी अब्राहाममध्ये बीजरूपाने होता.
11लेवीय याजकपणाच्या आधारे इस्राएली लोकांना नियमशास्त्र प्राप्त झाले. जर ह्या याजकांची कृत्ये परिपूर्ण असती, तर अहरोनच्या संप्रदायाला सोडून मलकीसदेकच्या संप्रदायानुसार निराळ्या याजकाचा उद्भव व्हावा ह्याची आवश्यकता उरली नसती. 12कारण याजकपण बदलले म्हणजे नियमशास्त्रही अवश्य बदलते. 13ज्याच्याविषयी हे सांगितले आहे, तो आपला प्रभू निराळ्या वंशातला आहे. त्या वंशातल्या कोणीही वेदीजवळ काम केले नव्हते. 14कारण आपला प्रभू हा यहुदा वंशांतून उद्भवला हे सर्वपरिचित आहे आणि याजकांविषयी बोलताना मोशेने ह्या वंशाचा उल्लेख केला नाही.
15-16मानवी नियम निर्बंधांनी नव्हे तर अक्षय जीवनाच्या सामर्थ्याने झालेला असा मलकीसदेकसारखा निराळा याजक जर उद्भवला आहे, तर ह्यावरून आम्ही सांगितले ते अधिकच स्पष्ट होते.
17त्याच्याविषयी अशी साक्ष आहे,
तू मलकीसदेकच्या संप्रदायाप्रमाणे
युगानुयुगे याजक असशील.
18पूर्वीचा नियम कमजोर व निरुपयोगी झाल्यामुळे रद्द झाला आहे, 19कारण मोशेच्या नियमशास्त्राने कशाचीही पूर्णता केली नाही आणि ज्या आशेद्वारे आपण देवाजवळ जातो, अशा अधिक चांगल्या आशेची स्थापना झाली आहे;
20शिवाय येशूविषयी देवाची शपथ आहे. 21इतर शपथेवाचून याजक झालेले आहेत; पण येशूविषयी ‘तू युगानुयुगे याजक असशील’, अशी शपथ प्रभूने वाहिली आणि ती तो बदलणार नाही, असे सांगितले. त्याच्या त्या शपथेने येशू हा याजक झाला. 22ह्या फरकामुळे तो अधिक चांगल्या कराराचा जामीन झाला आहे.
23दुसरा फरक म्हणजे इतर पुष्कळ याजक होऊन गेले; कारण त्यांना निरंतर याजक राहण्यास मृत्यूचा अडथळा होत असे; 24पण येशू युगानुयुगे राहणारा असल्यामुळे, ह्याचे याजकपण अढळ आहे. 25ह्यामुळे ह्याच्याद्वारे देवाजवळ जाणाऱ्यांना पूर्णपणे तारण्यास हा समर्थ आहे; कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास हा सर्वदा जिवंत आहे.
26असाच आपला प्रमुख याजक असणे योग्य होते; तो भक्तिमान, निर्दोष, शुद्ध व पापी जनांपासून वेगळा असताना आकाशांच्या पलीकडे त्याचा गौरव करण्यात आला. 27त्याला इतर प्रमुख याजकांप्रमाणे पहिल्याने स्वतःच्या पापांसाठी, मग लोकांच्या पापांसाठी रोज यज्ञ करण्याची गरज नाही; कारण त्याने स्वतःला अर्पण केले, तेव्हा ते अर्पण एकदाच करून ठेवले आहे. 28नियमशास्र दुर्बल अशा माणसांना प्रमुख याजक नेमते; पण नियमशास्त्रानंतरचे शपथ वाहून दिलेले वचन युगानुयुगे परिपूर्ण केलेल्या पुत्राची नेमणूक करते.

सध्या निवडलेले:

इब्री 7: MACLBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन