YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मार्क 10:46-52

मार्क 10:46-52 MACLBSI

ते यरिहो येथे आले. येशू, त्याचे शिष्य व मोठा लोकसमुदाय यरिहो सोडून जात असता, तिमयचा मुलगा बार्तिमय हा आंधळा भिकारी रस्त्याच्या कडेला बसला होता. हा नासरेथकर येशू आहे, हे ऐकून तो मोठ्याने ओरडू लागला, “अहो दावीदपुत्र येशू, माझ्यावर दया करा.” त्याने गप्प राहावे म्हणून अनेकांनी त्याला दटावले, पण तो अधिकच ओरडू लागला, “अहो दावीदपुत्र, माझ्यावर दया करा.” येशू थांबून म्हणाला, “त्याला बोलवा.” ते त्या आंधळ्याला बोलावून म्हणाले, “धीर धर, ऊठ, येशू तुला बोलावत आहे.” तो आपल्या अंगावरचे पांघरुण टाकून उठला व येशूकडे आला. येशू त्याला म्हणाला, “मी तुझ्यासाठी काय करावे, अशी तुझी इच्छा आहे?” आंधळा त्याला म्हणाला, “गुरुवर्य, मला पुन्हा दिसावे.” येशू त्याला म्हणाला, “जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.” तत्काळ त्याला दिसू लागले आणि तो येशूच्या मागे चालू लागला.