1
शमुवेलाचा जन्म
1एफ्राईम येथील डोंगराळ भागात रामाथाईम-सोफीम या गावात एलकानाह नामक एक मनुष्य राहत होता, जो यरोहामचा पुत्र होता, तो एलीहूचा पुत्र, तो तोहूचा पुत्र, तो सूफाचा पुत्र, तो एफ्राईम गोत्रातील होता. 2त्याला दोन पत्नी होत्या; एकीचे नाव हन्नाह आणि दुसरीचे नाव पनिन्नाह असे होते. पनिन्नाहला मुलेबाळे होती, परंतु हन्नेहला एकही मूल नव्हते.
3दरवर्षी हा मनुष्य त्याच्या नगरापासून शिलोह येथे सर्वसमर्थ याहवेहची उपासना आणि यज्ञ करण्यासाठी जात असे, जिथे एलीचे दोन पुत्र होफनी आणि फिनहास हे याहवेहचे याजक होते. 4यज्ञ करण्यासाठी जेव्हा एलकानाहचा दिवस येत असे, तेव्हा तो आपली पत्नी पनिन्नाह आणि तिच्या सर्व मुलांना आणि मुलींना मांसाचा वाटा देत असे. 5परंतु हन्नेहला तो दुप्पट वाटा देई, कारण त्याची तिच्यावर प्रीती होती, आणि याहवेहने तिचे उदर बंद केले होते. 6कारण याहवेहने हन्नाहचे उदर बंद केले होते, यामुळे तिची सवत तिला चिडवून त्रास देत असे. 7वर्षानुवर्षे हे असेच चालू होते. जेव्हा हन्नाह याहवेहच्या मंदिरात#1:7 हे शलमोनाने बांधलेले मंदिर नाही. याहवेहचे निवासस्थान जात असे, तेव्हा तिची सवत पनिन्नाह, ती रडेपर्यंत चिडवीत असे आणि मग ती काही खात नसे. 8तिचा पती एलकानाह तिला म्हणत असे, “हन्नाह तू का रडत आहेस? तू काही का खात नाहीस? मी तुला दहा पुत्रांपेक्षा अधिक नाही काय?”
9एकदा, शिलोह येथे त्यांनी खाणेपिणे संपविल्यानंतर हन्नाह उठली. तेव्हा एली याजक याहवेहच्या मंदिराच्या दारात त्याच्या खुर्चीवर बसलेला होता. 10तीव्र वेदनेने हन्नेहने याहवेहकडे प्रार्थना केली, मोठ्या दुःखाने ती रडली. 11आणि तिने एक शपथ घेतली, ती म्हणाली, “हे सर्वसमर्थ याहवेह, जर तुम्ही तुमच्या दासीच्या दुर्दशेकडे लक्ष द्याल आणि माझी आठवण कराल आणि तुमच्या दासीला विसरणार नाही परंतु तिला एक पुत्र द्याल, तर मी त्याला त्याच्या आयुष्याचे सर्व दिवस याहवेहसाठी देईन आणि त्याच्या डोक्यावर कधीही वस्तरा फिरणार नाही.”
12ती याहवेहकडे प्रार्थना करीत असता, एली तिच्या मुखाकडे पाहत होता. 13हन्नाह तिच्या मनात प्रार्थना करीत होती, आणि तिचे ओठ हालत होते, परंतु तिचा आवाज मात्र ऐकू येत नव्हता. एलीला वाटले की ती नशेत आहे 14आणि एली तिला म्हणाला, “किती वेळ तू नशेत राहशील? मद्यपान सोडून दे.”
15“तसे नाही, माझ्या स्वामी,” हन्नाहने उत्तर दिले, “मी फार त्रस्त झालेली स्त्री आहे. मी द्राक्षारस किंवा मद्य घेतले नाही; मी माझे हृदय याहवेहकडे मोकळे करीत होते. 16तुमच्या दासीला दुष्ट स्त्री असे समजू नका; मी या ठिकाणी वेदना आणि तीव्र दुःखाने प्रार्थना करीत आहे.”
17तेव्हा एलीने उत्तर दिले, “शांतीने जा, आणि तू जे काही मागितले आहेस, ते इस्राएलचे परमेश्वर तुला देवो.”
18ती म्हणाली, “तुमची दासी तुमच्या दृष्टीत कृपा पावो.” नंतर ती आपल्या मार्गाने निघून गेली आणि तिने अन्न सेवन केले आणि त्यानंतर तिचा चेहरा उदास राहिला नाही.
19दुसर्या दिवशी सकाळी त्यांनी उठून याहवेहची उपासना केली आणि परत रामाह येथे आपल्या घरी परतले. एलकानाहने आपली पत्नी हन्नाह हिच्याशी प्रीतिसंबंध केला आणि याहवेहने तिची आठवण केली. 20तेव्हा नेमलेल्या काळात हन्नाह गर्भवती झाली आणि एका पुत्राला जन्म दिला. तिने त्याचे नाव शमुवेल#1:20 शमुवेल इब्री भाषेत याचा अर्थ परमेश्वराने ऐकलेला असे ठेवले, ती म्हणाली, “कारण याहवेहकडे मी याला मागितले होते,”
हन्ना शमुवेलाचे समर्पण करते
21जेव्हा तिचा पती एलकानाह त्याच्या सर्व कुटुंबाबरोबर याहवेहसाठी वार्षिक यज्ञ अर्पण करण्यासाठी आणि त्याचा नवस पूर्ण करण्यासाठी गेला, 22तेव्हा हन्नाह गेली नाही. ती तिच्या पतीला म्हणाली, “मुलाचे दूध तोडल्यानंतर, मी त्याला घेऊन जाईन आणि त्याला याहवेहसमोर सादर करेन आणि तो सदैव#1:22 सदैव मूळ प्रतींनुसार त्याच्या जीवनाच्या सर्व दिवसांपर्यंत मी त्याला नाजीर म्हणून समर्पण केले आहे. तिथेच राहील.”
23“तुला जे उत्तम वाटते ते तू कर,” तिचा पती एलकानाह तिला म्हणाला. “त्याचे दूध तुटेपर्यंत तू येथेच राहा; याहवेह त्यांच्या वचनाप्रमाणे करो.” म्हणून ती स्त्री घरीच राहिली आणि मुलाचे दूध तोडेपर्यंत तिने त्याचे पालनपोषण केले.
24त्याचे दूध तोडल्यानंतर तिने बालकास लहान असतानाच तिच्याबरोबर घेतले, तसेच तीन वर्षाचा बैल,#1:24 मूळ प्रतीनुसार तीन बैल. एक एफा#1:24 अंदाजे 16 कि.ग्रॅ. सपीठ आणि द्राक्षारसाचा बुधला घेतला आणि त्याला शिलोह येथे याहवेहच्या मंदिरात आणले. 25बैलाचा यज्ञ केल्यानंतर, त्यांनी त्या मुलाला एलीकडे आणले, 26आणि हन्ना त्याला म्हणाली, “माझ्या स्वामी, मला क्षमा करा. तुमच्या जीविताची शपथ, मी तीच स्त्री आहे जी येथे तुमच्या बाजूला उभी राहून याहवेहकडे प्रार्थना करीत होती. 27या बाळासाठी मी प्रार्थना केली, आणि याहवेहकडे मी जे मागितले त्यांनी ते मला दिले आहे. 28तर मी आता त्याला याहवेहला समर्पित करीत आहे. त्याचे संपूर्ण जीवनभर तो याहवेहसाठी दिलेला आहे.” आणि त्याने तिथे याहवेहची उपासना केली.