9
शौलाचा अभिषेक
1बिन्यामीन वंशातील एक मनुष्य होता, त्याचे नाव कीश होते, तो अबीएलचा पुत्र होता, तो सरोराचा पुत्र, तो बेकोराथचा पुत्र, तो अफिया याचा पुत्र होता. तो बिन्यामीन घराण्यातील असून सन्माननीय मनुष्य होता. 2कीशला शौल नावाचा एक पुत्र होता, त्याच्यासारखा देखणा तरुण पुरुष इस्राएलमध्ये कोणीही नव्हता आणि तो सर्वांपेक्षा उंच होता.
3शौलाचा पिता कीशची गाढवे हरवली होती आणि कीश त्याचा पुत्र शौलास म्हणाला, “सेवकांपैकी एकाला तुझ्याबरोबर घेऊन जा आणि गाढवांचा शोध कर.” 4तेव्हा तो एफ्राईमच्या संपूर्ण डोंगराळ प्रदेशात आणि शलीशाह भागाच्या सभोवती फिरला, परंतु त्यांना ते सापडले नाहीत. ते तसेच पुढे शालीम प्रांतात गेले, परंतु गाढवे तिथेही नव्हती. नंतर तो बिन्यामीनच्या हद्दीतून फिरला परंतु त्यांना ते सापडले नाहीत.
5जेव्हा ते सूफ प्रांतात पोहोचले, तेव्हा शौल त्याच्याबरोबर असलेल्या सेवकाला म्हणाला, “चल, आपण परत जाऊ या, नाहीतर माझा पिता गाढवांचा विचार करण्याचे सोडून आपलीच काळजी करू लागेल.”
6परंतु सेवक म्हणाला, “पाहा, या शहरात परमेश्वराचा एक मनुष्य आहे; तो फार सन्माननीय आहे आणि जे काही तो सांगतो ते खरे होते. तर चल, आपण तिकडे जाऊ. कदाचित आपण कोणत्या मार्गाने जावे ते तो आपल्याला सांगेल.”
7शौल त्याच्या सेवकाला म्हणाला, “जर आपण जात आहोत, तर आपण त्याला काय द्यावे? आपल्या पिशवीतील खाद्य तर संपले आहे. परमेश्वराच्या मनुष्याला देण्यासाठी आपल्याकडे काही बक्षीस नाही. आपल्याकडे काय आहे?”
8तो सेवक पुन्हा शौलाला म्हणाला, “पाहा, माझ्याजवळ पाव शेकेल#9:8 अंदाजे 3 ग्रॅम चांदी आहे. मी ते परमेश्वराच्या मनुष्याला देईन म्हणजे आपण कोणत्या मार्गाने जावे हे तो आपल्याला सांगेल.” 9त्याकाळी इस्राएलमध्ये जर कोणी परमेश्वराविषयी चौकशी करण्यास गेला तर ते म्हणत असत, “चला, आपण पाहणार्याकडे जाऊ,” कारण आज ज्याला संदेष्टा म्हणतात त्याला पाहणारा असे संबोधले जाई.
10“ठीक आहे,” शौल त्याच्या सेवकाला म्हणाला, “चल, जाऊ या.” असे म्हणत ज्या नगरात परमेश्वराचा मनुष्य राहत होता त्याकडे ते निघाले.
11जसे ते डोंगर चढून त्या गावाकडे जात होते, त्यांना काही तरुणी भेटल्या ज्या पाणी काढण्यासाठी बाहेर पडल्या होत्या आणि त्यांनी त्यांना विचारले, “येथे कोणी संदेष्टा आहे काय?”
12“होय तो आहे,” त्यांनी उत्तर दिले. “तो तुमच्यापुढेच जात आहे. आता घाई करा; तो आजच आमच्या गावात आला आहे, कारण लोक उच्च स्थानावर यज्ञ करणार आहेत. 13तुम्ही शहरामध्ये प्रवेश करताच उंच टेकड्यावर भोजन करण्यास जाण्याआधी तो तुम्हाला सापडेल. तो येईपर्यंत लोक भोजन करीत नाहीत, कारण त्याने यज्ञाला आशीर्वाद दिल्यानंतरच, ज्यांना आमंत्रित केले आहे ते भोजन करतील. आता वर जा; आताच तो तुम्हाला सापडेल.”
14ते वर नगरापर्यंत गेले आणि जसे ते त्यात प्रवेश करीत होते, तिथे शमुवेल होता, तो उंच टेकड्यावर जात असताना ते शौलाच्या दिशेने येत होते.
15शौल येण्याच्या एक दिवस आधी याहवेहने शमुवेलला हे प्रकट केले होते: 16“याच वेळेस उद्या मी तुझ्याकडे बिन्यामीनच्या प्रदेशातील एक मनुष्य पाठवेन. माझ्या इस्राएल लोकांवर शासनकर्ता म्हणून त्याचा अभिषेक कर; तो माझ्या लोकांना पलिष्ट्यांच्या हातून सोडवेल. मी माझ्या लोकांकडे पाहिले आहे, कारण त्यांचा आकांत माझ्यापर्यंत पोहोचला आहे.”
17जेव्हा शौल शमुवेलाच्या दृष्टीस पडला, याहवेह त्याला म्हणाले, “हाच मनुष्य आहे, ज्याच्या विषयी मी तुला सांगितले होते; तो माझ्या लोकांवर शासन करेल.”
18शौलाने नगराच्या प्रवेशद्वारातच शमुवेलकडे जाऊन विचारले, “संदेष्ट्याचे घर कुठे आहे हे मला कृपा करून सांगाल काय?”
19“मीच पाहाणारा आहे,” शमुवेलने शौलास उत्तर दिले. “माझ्यापुढे वर उंचस्थानी जा, कारण आज तुला माझ्याबरोबर भोजन करावयाचे आहे आणि सकाळी मी तुला तुझ्या मार्गाने पाठवून देईन आणि जे तुझ्या अंतःकरणात आहे ते मी तुला सांगेन. 20आणि तुझी जी गाढवे तीन दिवसांपूर्वी हरवली होती, त्यांची काळजी करू नकोस; ती सापडली आहेत. इस्राएलची सर्व इच्छा कोणाकडे वळली आहे, तुझ्याकडे व तुझ्या संपूर्ण कुटुंबाकडे ती वळली नाही काय?”
21शौलाने उत्तर दिले, “परंतु मी बिन्यामीन गोत्र जे इस्राएलचे सर्वात लहान, त्यातील नाही काय आणि माझे कूळ बिन्यामीनच्या गोत्रातील सर्वात लहान कूळ नाही काय? तर मग तुम्ही मला असे का बोलत आहात?”
22नंतर शमुवेलने शौल आणि त्याच्या सेवकास भोजनगृहात आणले आणि जिथे आमंत्रित केलेले सुमारे तीस लोक होते तिथे प्रमुखस्थानी त्यांना बसविले. 23शमुवेल आचार्याला म्हणाला, “मांसाचा जो तुकडा तुला देऊन मी बाजूला ठेवायला सांगितला होता, तो घेऊन ये.”
24तेव्हा आचार्याने मांडीचा भाग#9:24 लेवी मांडीचा भाग आणि त्याच्याबरोबर जे होते ते उचलून शौलासमोर मांडले. शमुवेल म्हणाला, “हे तुझ्यासाठी राखून ठेवलेले आहे. हे खा, कारण मी जेव्हा म्हणालो, ‘मी पाहुण्यांना आमंत्रित केले आहे,’ तेव्हापासून हे तुझ्यासाठी या प्रसंगासाठी बाजूला राखून ठेवण्यात आले होते.” त्या दिवशी शौलाने शमुवेलबरोबर भोजन केले.
25उच्च स्थानावरून खाली नगराकडे आल्यानंतर, शमुवेल त्याच्या घराच्या धाब्यावर शौलाबरोबर बोलला. 26पहाटेच ते उठले आणि शमुवेलने शौलाला धाब्यावर बोलाविले, “तयार हो, म्हणजे मी तुला तुझ्या मार्गाने पाठवेन.” जेव्हा शौल तयार झाला, तो आणि शमुवेल एकत्र बाहेर पडले. 27नगराच्या कडेने चालत असताना, शमुवेल शौलास म्हणाला, “सेवकाला सांग, की त्याने आपल्यापुढे चालावे.” आणि सेवकाने त्याप्रमाणे केले; “परंतु तू थोडा वेळ येथेच राहा म्हणजे मी परमेश्वराचा संदेश तुला देईन.”