30
हिज्कीयाह वल्हांडण सण साजरा करतो
1हिज्कीयाहने सर्व इस्राएल आणि यहूदीया या ठिकाणी संदेश पाठविला आणि एफ्राईम व मनश्शेह यांनाही पत्र लिहून आमंत्रण दिले की, त्यांनी यरुशलेममधील याहवेहच्या मंदिरात यावे आणि इस्राएलचे परमेश्वर याहवेहसाठी वल्हांडण सण साजरा करावा. 2राजा आणि त्याचे अधिकारी आणि यरुशलेममधील सर्व मंडळी यांनी असे ठरविले की, दुसऱ्या महिन्यात वल्हांडण सण साजरा करावा. 3नेहमीच्या वेळेप्रमाणे त्यांना तो सण साजरा करता आला नव्हता, कारण स्वतःचे शुद्धीकरण केलेले असे पुरेसे याजक तिथे नव्हते आणि लोक यरुशलेममध्ये एकत्र जमले नव्हते. 4ही योजना योग्य आहे असे राजाला आणि संपूर्ण मंडळीला वाटले. 5त्यांनी ठरविले की, बेअर-शेबापासून दानपर्यंत संपूर्ण इस्राएलमध्ये एक घोषणापत्र पाठवावे आणि इस्राएलचे परमेश्वर याहवेह यांचा वल्हांडण सण साजरा करण्यासाठी लोकांना यरुशलेमकडे बोलावून घ्यावे. जसे लिहिले गेले होते त्याप्रमाणे तो मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आलेला नव्हता.
6राजाज्ञेनुसार, राजा आणि त्याच्या अधिकार्यांकडून पत्रे घेऊन संदेशवाहक संपूर्ण इस्राएल आणि यहूदीयामध्ये गेले, ज्यात लिहिले होते:
“अहो, इस्राएलचे लोकहो, अब्राहाम, इसहाक आणि इस्राएलचे परमेश्वर याहवेहकडे परत या, म्हणजे, अश्शूरी राजांच्या हातातून जे निसटले आहेत त्यांच्याकडे ते परत येतील. 7तुमच्या पालकांसारखे होऊ नका आणि तुमच्याबरोबर असलेल्या इस्राएली लोकांसारखे होऊ नका, जे त्यांच्या पूर्वजांचे परमेश्वर याहवेहबरोबर अविश्वासू राहिले, त्यामुळे त्यांनी त्यांना उपहासाचे पात्र केले, जसे ते तुम्हाला दिसतात. 8तुम्ही तुमच्या पूर्वजांसारखे ताठ मानेचे होऊ नका. याहवेहना शरण जा. त्यांनी सनातनकाळासाठी पवित्र केलेल्या त्यांच्या पवित्रस्थानात या. तुमचे परमेश्वर याहवेहची सेवा करा, म्हणजे त्यांचा भयंकर क्रोध तुमच्यापासून दूर होईल. 9जर तुम्ही याहवेहकडे परत याल, तर तुमच्याबरोबर असणारे इस्राएली लोक आणि तुमच्या मुलाबाळांवर त्यांना कैद करणाऱ्यांकडून दया करण्यात येईल आणि ते या देशात परत येतील, कारण तुमचे परमेश्वर याहवेह हे कृपाळू आणि दयाळू आहेत. जर तुम्ही त्यांच्याकडे परत आलात तर ते तुमच्यापासून मुख फिरविणार नाहीत.”
10संदेशवाहक एफ्राईम आणि मनश्शेह येथील गावोगाव तसेच जबुलूनपर्यंत गेले, परंतु लोकांनी त्यांचा तिरस्कार केला आणि त्यांची थट्टा केली. 11तरीसुद्धा आशेर, मनश्शेह आणि जबुलून येथील काही लोकांनी स्वतःला नम्र केले आणि ते यरुशलेमला गेले. 12याहवेहच्या वचनास अनुसरून राजा आणि त्याच्या अधिकाऱ्यांनी जे आदेश दिले होते, ते एकमताने पूर्ण करण्यासाठी यहूदीयामध्येही परमेश्वराचा हात लोकांवर होता.
13दुसऱ्या महिन्यामध्ये बेखमीर भाकरीचा सण साजरा करण्यासाठी यरुशलेममध्ये बरेच लोक एकत्र आले. 14त्यांनी यरुशलेममधील वेद्या काढून टाकल्या आणि धूपाच्या वेद्यांची जागा मोकळी केली आणि त्या किद्रोन खोऱ्यात फेकून दिल्या.
15वल्हांडणाचा कोकरा त्यांनी दुसऱ्या महिन्याच्या चौदाव्या दिवशी कापला. याजकांना आणि लेवीय लोकांना स्वतःची लाज वाटली आणि त्यांनी स्वतःला पवित्र केले आणि याहवेहच्या मंदिरात होमार्पणे आणली. 16नंतर त्यांनी परमेश्वराचा मनुष्य मोशेच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे त्यांची नियमित पदे स्वीकारली. लेव्यांनी त्यांच्या हाती दिलेले रक्त याजकांनी वेदीवर शिंपडले. 17जमलेल्या समुदायामधील पुष्कळ लोकांनी स्वतःला पवित्र केलेले नसल्यामुळे जे विधिपूर्वक शुद्ध झालेले नव्हते आणि त्यांना व त्यांच्या कोकऱ्यांना याहवेहसमक्ष पवित्र करू शकले नव्हते, त्यामुळे लेवीय लोकांनी त्या सर्वांकरिता वल्हांडणाच्या कोकरांचा वध केला. 18एफ्राईम, मनश्शेह, इस्साखार आणि जबुलून येथून आलेल्या पुष्कळ लोकांपैकी बहुतेक लोकांनी स्वतःला शुद्ध केलेले नव्हते, तरीही जे लिहिलेले होते त्याविरुद्ध जाऊन त्यांनी वल्हांडण सणाचे अन्न खाल्ले. परंतु हिज्कीयाहने त्यांच्यासाठी प्रार्थना केली आणि म्हणाला, “याहवेह, जे चांगले आहेत, त्यांनी प्रत्येकांना क्षमा करावी. 19जरी ते पवित्रस्थानाच्या नियमानुसार शुद्ध नसले तरीसुद्धा, ते त्यांचे अंतःकरण त्यांच्या पूर्वजांचे परमेश्वर याहवेह यांच्याकडे लावतात.” 20आणि याहवेहनी हिज्कीयाहचे ऐकले आणि लोकांना बरे केले.
21यरुशलेममध्ये जे इस्राएली लोक उपस्थित होते, त्यांनी बेखमीर भाकरीचा सण सात दिवस मोठ्या आनंदात साजरा केला, तर लेवीय लोकांनी आणि याजकांनी याहवेहना समर्पित केलेल्या प्रतिध्वनीच्या वाद्यांसहित दररोज याहवेहची स्तुती केली.
22ज्यांनी याहवेहच्या सेवेसाठी योग्य समज दाखविला, त्या सर्व लेवीय लोकांना हिज्कीयाहने प्रोत्साहित केले. सात दिवस त्यांना नेमून दिलेला त्यांचा भाग त्यांनी खाल्ला आणि शांत्यर्पणाचे अर्पण केले आणि त्यांच्या पूर्वजांच्या परमेश्वराची स्तुती#30:22 किंवा त्यांच्या पापांची कबुली दिली केली.
23तेव्हा संपूर्ण सभेने पुढे अधिक सात दिवस हा सण साजरा करण्याचे मान्य केले; त्यामुळे आणखी सात दिवस त्यांनी हा उत्सव आनंदाने साजरा केला. 24यहूदीयाचा राजा हिज्कीयाहने या सभेसाठी एक हजार बैल आणि सात हजार मेंढ्या आणि शेळ्या दिल्या आणि अधिकाऱ्यांनी त्यांना एक हजार बैल आणि दहा हजार मेंढ्या व शेळ्या दिल्या. तेव्हा मोठ्या संख्येने याजकांनी स्वतःला पवित्र केले. 25यहूदीयाच्या संपूर्ण सभेने याजक आणि लेवीय आणि इस्राएलमधून जमलेले सर्व लोक, इस्राएलमधून आलेले परदेशी आणि यहूदीयामधील रहिवाशांनी आनंद साजरा केला. 26त्यावेळेस तिथे यरुशलेममध्ये मोठा आनंद झाला होता, कारण इस्राएलचा राजा दावीदाचा पुत्र शलोमोनच्या दिवसांपासून यरुशलेममध्ये यासारखे काहीही घडले नव्हते. 27याजक आणि लेवीय हे लोकांना आशीर्वाद देण्यासाठी उभे राहिले आणि परमेश्वराने त्यांचे ऐकले, कारण त्यांची प्रार्थना स्वर्गात, परमेश्वराच्या पवित्र निवासस्थानापर्यंत पोहोचली.