2
अनिर्बंध पुरुष
1आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे पुन्हा येणे व आपले त्यांच्याजवळ एकवटणे यासंबंधी बंधूंनो आणि भगिनींनो मी तुम्हाला सांगतो, 2आमच्याद्वारे दिलेल्या तथाकथित शिक्षणाद्वारे तुम्ही सहज अस्थिर किंवा गोंधळून जाऊ नका. प्रभूचा दिवस येऊन ठेपला आहे, असे ठामपणे आपल्या संदेशाद्वारे किंवा बोलण्याद्वारे किंवा पत्राद्वारे सांगणार्यांना घाबरून जाऊ नका. 3कोणी तुमची कोणत्याही प्रकारे फसवणूक करू नये, जोपर्यंत विश्वासाचे पतन होणार नाही आणि नियम नसलेला#2:3 किंवा पापी पुरुष म्हणजे नाशाचा पुरुष प्रकट होणार नाही तोपर्यंत तो दिवस येणार नाही. 4तो तथाकथित देव किंवा भजनीय वस्तूंचा विरोध करेल व या सर्वांहून स्वतःला उंच करेल, तो परमेश्वराच्या मंदिरात बसेल व मीच परमेश्वर आहे, असे जाहीर करेल.
5मी तुमच्याबरोबर तिथे असताना, हे सांगितल्याचे तुम्हाला आठवत नाही का? 6आणि आता त्याने योग्य वेळेस प्रकट व्हावे म्हणून त्याला कोणत्या गोष्टीचे अडखळण आहे हे तुम्हाला माहीत आहे. 7कारण अधर्माचे गुप्त सामर्थ्य आधी कार्यान्वित आहे, ते आधीच सुरू झालेले आहे. परंतु जो प्रतिबंध करीत आहे, तो मार्गातून दूर होईपर्यंत ते तसेच सुरू राहणार आहे. 8मग हा अधर्मी पुरुष प्रकट होईल, पण प्रभू येशू त्याला मुख श्वासाने मारून टाकतील आणि आपल्या आगमनाच्या प्रतापाने त्याचा नाश करतील. 9सैतान कशाप्रकारे कार्य करतो त्यानुसार अनीतिमानाचे येणे असेल. तो विलक्षण सामर्थ्याच्याद्वारे खोटी चिन्हे आणि अद्भुते करून दाखवेल, 10आणि ज्यांचा नाश होत आहे त्यांना त्यांच्या सर्व मार्गात दुष्टतेने फसवेल. त्यांचा नाश होत आहे कारण त्यांनी आपल्या तारणासाठी सत्यावर प्रीती करण्यास नकार दिला. 11या कारणामुळे परमेश्वर त्यांच्यावर तीव्र भ्रांती पाठवतील यासाठी की ते लबाडीवर विश्वास ठेवतील, 12आणि ज्या सर्वांनी सत्यावर विश्वास ठेवला नाही आणि दुष्टपणात आनंद मानला, त्या सर्वांना दोषी ठरविण्यात येईल.
स्थिर उभे राहा
13परंतु प्रभूला प्रिय असलेल्या बंधू आणि भगिनींनो, आम्ही तुमच्यासाठी परमेश्वराची सतत उपकारस्तुती केली पाहिजे, कारण परमेश्वराने तुम्हाला आत्म्याद्वारे होणार्या पवित्रीकरणाच्या कार्यात व सत्यावरील विश्वासात प्रथमफळ#2:13 काही मूळ प्रतींमध्ये कारण प्रारंभापासून परमेश्वराने तुम्हास निवडले म्हणून तारणासाठी निवडले आहे. 14आमच्या शुभवार्तेद्वारे त्यांनी तुम्हाला यासाठी पाचारण केले की आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या गौरवात तुम्ही सहभागी व्हावे.
15बंधू आणि भगिनींनो, स्थिर राहा आणि जे शिक्षण#2:15 किंवा परंपरा आम्ही तुम्हाला शब्दाद्वारे किंवा पत्राद्वारे सोपवून दिले त्याला घट्ट धरून ठेवा.
16ज्यांनी कृपेद्वारे आपल्यावर प्रीती केली आणि युगानुयुगाचे प्रोत्साहन व चांगली आशा आपल्याला दिली, ते परमेश्वर आपले पिता व स्वतः आपले प्रभू येशू ख्रिस्त, 17तुमच्या अंतःकरणास प्रोत्साहित करोत आणि प्रत्येक चांगल्या कृतीत आणि बोलण्यात तुम्हाला समर्थ करोत.