25
फेस्तासमोर पौलाची चौकशी
1तीन दिवसानंतर प्रांतात आल्यानंतर, फेस्त कैसरीयाहून यरुशलेम येथे वर गेला, 2तेव्हा प्रमुख याजकांनी आणि यहूदी पुढार्यांनी त्याच्यासमोर पौलाविरुद्ध दोषपत्रे सादर केली. 3त्यांनी फेस्ताला विनंती केली की, पौलाची बदली यरुशलेमकडे करावी आणि आम्हावर कृपादृष्टी दाखवावी, कारण पौलाला घेऊन जाताना वाटेत अचानक त्याच्यावर हल्ला करून त्याला ठार मारण्याची योजना ते करीत होते. 4परंतु फेस्ताने त्यांना उत्तर दिले, “पौल कैसरीया येथे कैदेत आहे व मी लवकरच स्वतः तिथे जाणार आहे. 5तुमच्या काही पुढार्यांनी माझ्याबरोबर यावे आणि या मनुष्याने काही गुन्हा केला असेल तर त्यांनी त्याच्याविरुद्ध तसे आरोप तिथे सादर करावेत.”
6त्यानंतर आठ किंवा दहा दिवस त्यांच्याबरोबर घालविल्यानंतर, फेस्त कैसरीयास खाली गेला. दुसर्याच दिवशी न्यायालय भरवून पौलाला आपल्यासमोर आणावे असा त्याने हुकूम दिला. 7पौल आत आल्यावर, यरुशलेमहून आलेले यहूदी लोक त्याच्याभोवती उभे राहिले. त्यांनी त्याच्याविरुद्ध अनेक गंभीर असे आरोप लावले, परंतु ते आरोप ते सिद्ध करू शकले नाहीत.
8पौलाने त्याच्या बचावासाठी उत्तर दिले, “मी यहूदी लोकांच्या नियमशास्त्राविरुद्ध, मंदिराविरुद्ध किंवा कैसराविरुद्ध चुकीचे असे काहीही केलेले नाही.”
9तेव्हा यहूदी लोकांना प्रसन्न करण्यास आतुर असलेल्या फेस्ताने पौलाला विचारले, “यरुशलेमला जाऊन तिथे माझ्यापुढे तुझी चौकशी व्हावी, यासाठी तू तयार आहेस काय?”
10परंतु पौलाने त्याला उत्तर दिले: “मी कैसराच्या न्यायालयापुढे उभा आहे म्हणून इथेच माझा न्याय होईल. तुम्हाला चांगले ठाऊक आहे की, मी यहूदीयांच्या विरुद्ध काहीही उपद्रव केले नाही. 11जर मी मृत्यूस पात्र असे काही केले असेल, तर मी मरण्यास नकार देत नाही परंतु यहूदी माझ्यावर जे आरोप करतात, ते जर खरे नाहीत, तर कोणालाही मला यांच्या स्वाधीन करण्याचा अधिकार नाही. मी कैसराजवळ न्याय मागतो!”
12त्यावर फेस्ताने आपल्या सल्लागारांची मसलत घेऊन जाहीर केले, “ठीक आहे. तू कैसराजवळ न्यायाची याचना केली आहेस, तर तू कैसरापुढेच जाशील!”
फेस्त हा राजा अग्रिप्पाचा सल्ला घेतो
13पुढे थोड्याच दिवसांनी राजा अग्रिप्पा आणि बर्णीका कैसरीयास फेस्तास आदर देण्यासाठी आले. 14ते तिथे अनेक दिवस वास्तव्य करीत असल्यामुळे, फेस्ताला राजाबरोबर पौलाच्या प्रकरणाची चर्चा करण्यास वेळ मिळाला. तो म्हणाला: “फेलिक्साने ज्याला कैदेत तसेच ठेवले होते असा एक मनुष्य येथे आहे. 15मी यरुशलेम येथे गेलो होतो, तेव्हा तेथील प्रमुख याजकांनी व इतर यहूदी पुढार्यांनी त्याच्यावर दोषारोप करून त्याला शिक्षा द्यावी अशी मला विनंती केली.
16“मी त्यांना सांगितले की, रोमी प्रथेनुसार आरोपी व वादी समोरासमोर येणे व आरोपीला स्वतः आरोपाचे खंडन करण्याची संधी मिळाल्याशिवाय कोणालाही दंड देणे योग्य नाही. 17ते ज्यावेळी येथे चौकशीसाठी आले, त्यावेळी मी दुसर्याच दिवशी न्यायासनावर बसून तो वाद सुनावणीसाठी उशीर न करता घेतला व त्याला न्यायालयात आणण्याचा हुकूम केला. 18परंतु त्याच्याविरुद्ध केलेले आरोप माझ्या कल्पनेप्रमाणे मुळीच नव्हते. 19ते आरोप त्यांच्या धर्मासंबंधी आणि मरण पावलेल्या कोणा येशूंसंबंधी होते. पौल खात्रीने सांगतो की तो जिवंत आहे. 20अशा प्रकारच्या प्रकरणात कसा काय निर्णय द्यावा याविषयी मी गोंधळात पडलो. तेव्हा मी पौलाला या आरोपांची चौकशी यरुशलेममध्ये व्हावी यास त्याची मान्यता आहे का, असे विचारले. 21परंतु पौलाने कैसराकडे न्याय मागितला, तेव्हा मी त्याला बादशहाकडे नेण्याची व्यवस्था होईपर्यंत तुरुंगात ठेवण्याचा हुकूम दिला.”
22त्यावर अग्रिप्पा फेस्तास म्हणाला, “मला स्वतः या माणसाचे म्हणणे ऐकायला आवडेल.”
फेस्ताने उत्तर दिले. “तर उद्याच त्याचे भाषण ऐकावयास मिळेल.”
अग्रिप्पा यांच्यापुढे पौल
23तेव्हा दुसर्या दिवशी, अग्रिप्पा व बर्णीका ही न्यायालयात मोठ्या रुबाबाने लष्करी अधिकार्यांच्या समवेत व शहरातील प्रमुख पुरुषांसह आले. फेस्ताच्या आदेशानुसार पौलाला न्यायालयात आणण्यात आले. 24मग फेस्त म्हणाले: “अग्रिप्पा महाराज आणि सर्व उपस्थिती लोकहो, या मनुष्याला पाहा! याच्याविरुद्ध सर्व यहूदी समाजाने यरुशलेम व कैसरीया, यांनी माझ्याकडे विनंती केली आहे आणि अशी ओरड करीत आहेत की त्याने अधिक काळ जिवंत राहू नये. 25माझ्या मते त्याने मृत्युदंडास योग्य असे काहीही केलेले नाही, परंतु त्याने बादशहाजवळ न्याय मागितला म्हणून त्याला रोम या ठिकाणी पाठविण्याचे मी ठरविले आहे. 26परंतु मी महाराजांना निश्चित काय लिहून कळवावे हे मला समजत नाही आणि म्हणूनच मी त्याला तुम्हासर्वांपुढे व विशेषकरून अग्रिप्पा राजांपुढे तपासणीसाठी आणले आहे, यासाठी की मला जे योग्य ते लिहिता येईल. 27कारण एखाद्या कैद्यावर असलेल्या कोणत्याही आरोपाचे स्पष्ट वर्णन केल्याशिवाय त्याला रोमला पाठविणे योग्य होणार नाही.”