1
1तकोवा येथील एक मेंढपाळ आमोसाची वचने—त्याने उज्जीयाह यहूदाहचा आणि योआश#1:1 योआश किंवा येहोआश चा पुत्र यरोबोअम इस्राएलचा राजा असता, भूकंपाच्या दोन वर्षे आधी इस्राएलाबद्दल जे दृष्टान्तामध्ये पाहिले ते हे.
2त्याने म्हटले:
“याहवेह सीयोनातून गर्जना करतात
आणि यरुशलेमातून गडगडाट करतात;
मेंढपाळांची कुरणे सुकून जातात,
आणि कर्मेलचा माथा कोमेजून जाईल.”
इस्राएलच्या शेजाऱ्यांचा न्याय
3याहवेह असे म्हणतात:
“दिमिष्कच्या तीन नव्हे
तर चार अपराधांसाठी शासन करण्यापासून मी अनुताप करणार नाही.
कारण तिने गिलआदला
मळणी करण्याच्या लोखंडी काट्यांनी मळले आहे,
4म्हणून मी हजाएलच्या घरावर अग्नी पाठवेन
व बेन-हदादच्या किल्ल्याला भस्म करेन.
5दिमिष्कचे प्रवेशद्वार तोडून टाकेन;
आणि आवेन#1:5 अर्थात् क्रूर खोर्यातील राजा#1:5 किंवा खोर्यातील रहिवासी
आणि बेथ-एदेनचा राजदंड धरणाऱ्यांना मी नष्ट करेन.
अरामाचे लोक कीर येथे गुलाम म्हणून जातील.”
याहवेह असे म्हणतात.
6याहवेह असे म्हणतात:
“गाझाच्या तीन नव्हे
तर चार अपराधांसाठी शासन करण्यापासून मी अनुताप करणार नाही.
कारण तिने सर्व लोकांना बंदिवासात घेतले
आणि त्यांना एदोमला विकले,
7म्हणून मी गाझाच्या तटांवर अग्नी पाठवेन
आणि तिच्या किल्ल्याला भस्म करेन.
8मी अश्दोदच्या राजाचा
आणि अष्कलोनचा राजदंड धरणार्याचा नाश करेन.
शेवटच्या पलिष्टीचा नाश होत नाही
तोपर्यंत मी आपला हात एक्रोनावर चालवेन,”
असे सार्वभौम याहवेह म्हणतात.
9याहवेह असे म्हणतात:
“सोरच्या तीन नव्हे
तर चार अपराधांसाठी शासन करण्यापासून मी अनुताप करणार नाही.
कारण बंदिवासातील सर्वांना एदोमास विकले
आणि बंधुत्वाच्या कराराची अवहेलना केली आहे.
10म्हणून मी सोरच्या तटांवर अग्नी पाठवेन
आणि तिच्या किल्ल्यांना भस्म करेन.”
11याहवेह असे म्हणतात:
“एदोमच्या तीन नव्हे
तर चार अपराधांसाठी शासन करण्यापासून अनुताप करणार नाही.
कारण त्याने तलवार घेऊन आपल्या भावाचा पाठलाग केला
आणि देशातील स्त्रियांचा वध केला,
कारण त्याचा क्रोध निरंतर वाढत होता,
आणि त्याच्या क्रोध अनियंत्रित वाढत गेला,
12म्हणून मी तेमानवर अग्नी पाठवेन
आणि ती आग बस्राचे किल्ले भस्म करून टाकील.”
13याहवेह असे म्हणतात,
“अम्मोनच्या तीन नाही
तर चार अपराधांसाठी शासन करण्यापासून मी अनुताप करणार नाही.
कारण आपल्या सीमा वाढविण्यासाठी
गिलआदाच्या गरोदर स्त्रियांना चिरले,
14म्हणून मी राब्बाहच्या तटांवर अग्नी पाठवेन
आणि त्यामुळे त्यांचे किल्ले व राजमहाल भस्म होतील.
महान वादळामध्ये वावटळीचा आवाज व्हावा
तसा भयानक रणगर्जना होतील;
15आणि तिचा राजा#1:15 किंवा मोलेख राजा
आणि राजाचे अधिपती बरोबरच बंदिवासात जातील.”
याहवेहने म्हटले.