YouVersion लोगो
सर्च आयकॉन

अनुवाद 1

1
होरेब सोडण्याची आज्ञा
1इस्राएली लोक यार्देन नदीच्या पूर्वेस असणार्‍या रानातील अराबा नावाच्या दरीमध्ये तळ देऊन राहिले होते, त्यावेळी मोशे जे बोलला त्या सर्व गोष्टीची नोंद या पुस्तकात केलेली आहे. या प्रदेशात सूफ, पारान, तोफेल, लाबान, हसेरोथ व दीजाहाब इत्यादी शहरांचा समावेश होतो. 2(सेईर डोंगरमार्गे होरेब ते कादेश-बरनेआपर्यंतचा प्रवास अकरा दिवसाचा होता.)
3चाळिसाव्या वर्षाच्या, अकराव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी, याहवेहने आज्ञा केल्याप्रमाणे मोशेने इस्राएली लोकांना हे सर्व सांगितले. 4हे मोशेने जाहीर करण्यापूर्वीच अमोर्‍यांचा राजा सीहोनाचा हेशबोन येथे पराभव करण्यात आला होता व एद्रेई जवळील अष्टारोथ येथे बाशानचा राजा ओगचाही पराभव करण्यात आला होता.
5यार्देनच्या पूर्वेकडील मोआब प्रदेशात मोशे इस्राएली लोकांशी नियमांसंबंधी बोलला. तो म्हणाला:
6आपल्या याहवेह परमेश्वरांनी चाळीस वर्षांपूर्वी होरेब येथे आपल्याला सांगितले होते, “तुम्ही या पर्वताजवळ खूप दिवस राहिलात; 7आता तुम्ही येथून जा व अमोर्‍यांचा डोंगराळ प्रदेश, अराबाची दरी, नेगेव, कनान व लबानोन आणि भूमध्य समुद्रकिनार्‍यापासून ते फरात#1:7 फरात ज्याला आजच्या काळात युफ्रेटिस या नावाने ओळखले जाते नदीच्या काठापर्यंत पसरलेल्या संपूर्ण प्रदेशात जाऊन वस्ती करा. 8पाहा, मी हा सर्व प्रदेश तुम्हाला देत आहे. तुम्ही जा व तो प्रदेश हस्तगत करा. कारण याहवेहने तो प्रदेश अब्राहाम, इसहाक व याकोब या तुमच्या पूर्वजास व त्यांच्या वंशजास दिलेला वचनदत्त देश आहे.”
पुढार्‍यांची नेमणूक
9त्यावेळी मी तुम्हाला सांगितले होते, “माझ्या शक्तीपलीकडे असलेले मी एकट्यानेच वाहून नेणारे तुमचे मोठे ओझे माझ्यावर पडले आहे. 10कारण याहवेह तुमच्या परमेश्वराने तुमची संख्या आकाशातील तार्‍यांप्रमाणे अगणित केली आहे, 11याहवेह तुमच्या पूर्वजांच्या परमेश्वरांनी जे तुम्हाला अभिवचन दिले होते, त्यानुसार तुमची संख्या हजारपटीने वाढवो आणि तुम्हाला आशीर्वाद देवो! 12तुमच्या समस्या, तुमचे ओझे व तुमची भांडणे माझ्यासारखा एकटा मनुष्य कसा सोडवू शकेल? 13तेव्हा तुम्हीच प्रत्येक गोत्रांमधून सुज्ञ, समजूतदार व प्रतिष्ठित अशी काही माणसे निवडा, म्हणजे मी त्यांना तुमचे पुढारी नेमीन.”
14तुम्ही मला उत्तर देऊन म्हणाला, “तुम्ही जे करण्याचा प्रस्ताव दिला ते उत्तम आहे.”
15म्हणून मी तुमच्या प्रत्येक गोत्रांतून प्रमुख, ज्ञानी आणि आदरणीय पुरुष घेतले आणि त्यांना हजारांवर, शंभरांवर, पन्नासांवर व दहांवर प्रमुख व अधिकारी म्हणून नेमले. 16आणि त्यावेळी मी तुमच्या न्यायाधीशांना आज्ञा केली, “तुमच्या लोकांचा वाद ऐकून त्यावर न्याय करावा, मग तो दोन इस्राएली लोकांमधील असो किंवा इस्राएली आणि तुमच्यामध्ये राहणारे परदेशी यांच्यातील असो. 17न्याय करताना पक्षपातीपणा दाखवू नका; लहान व मोठे यांचे म्हणणे समानतेत ऐकून घ्या. कोणालाही घाबरू नका; कारण न्याय हा परमेश्वराकडूनच असतो. ज्या तक्रारी तुम्हाला सोडविण्यास कठीण वाटतील, त्या माझ्याकडे आणा आणि मी ऐकेन.” 18आणि त्यावेळी मी तुम्हाला जे काही करावयाचे आहे ते सर्व सांगितले होते.
हेर पाठविले जातात
19नंतर आम्ही होरेब येथून प्रस्थान केले व जो तुम्ही पाहिला होता अशा अफाट आणि भयानक अशा अरण्यातून प्रवास करीत, याहवेह आमच्या परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे शेवटी अमोर्‍यांच्या डोंगराळ प्रदेशात पोहोचलो आणि आम्ही कादेश-बरनेआस आलो. 20तेव्हा मी तुम्हाला सांगितले, “आता तुम्ही अमोर्‍यांच्या डोंगराळ प्रदेशात येऊन पोहोचला आहात, जो याहवेह आमचे परमेश्वर आम्हाला देणार आहेत. 21पाहा, याहवेह तुमच्या परमेश्वराने हा देश तुम्हाला दिला आहे. तुमच्या पूर्वजांचे देव परमेश्वरांनी सांगितल्याप्रमाणे वर जा आणि तो आपल्या ताब्यात घ्या. घाबरू नका; निराश होऊ नका.”
22तेव्हा तुम्ही सर्व लोक माझ्याकडे आले आणि म्हणाले, “आधी आपण आपले हेर पाठवू म्हणजे कुठल्या मार्गाने त्या देशात प्रवेश करावा व त्यांची कोणती शहरे लागतील हे शोधून काढणे सोपे होईल.”
23ही गोष्ट मला चांगली वाटली; म्हणून मी प्रत्येक गोत्रातून एक असे बारा हेर निवडले. 24तिथून निघून ते डोंगराळ प्रदेशात पोहोचले आणि ते अष्कोल दरीपर्यंत आले व त्यांनी त्या प्रदेशाची पाहणी केली. 25तिथून परत येताना त्यांनी त्या ठिकाणची फळे आपल्याबरोबर आणली व असा अहवाल दिला: “जो देश याहवेह आमचे परमेश्वर आम्हाला देत आहेत तो खरोखरच चांगला आहे.”
याहवेहविरुद्ध बंड
26परंतु तुम्ही वर जाण्यास नाकारले व याहवेह तुमच्या परमेश्वराच्या आज्ञेविरुद्ध बंड केले. 27आपल्या तंबूत बसून तुम्ही कुरकुर केली आणि म्हटले, “याहवेह आमचा द्वेष करीत आहेत, म्हणून अमोर्‍यांच्या हातून आमचा नाश व्हावा यासाठी त्यांनी आम्हाला इजिप्त देशातून इकडे आणले आहे. 28आम्ही आता कुठे जावे? आमच्या हेरबंधूंच्या वार्तेमुळे आम्ही भयभीत झालो आहोत. ते म्हणतात की, ‘त्या देशातील लोक आपल्यापेक्षा धिप्पाड आणि बलवान आहेत. त्यांची नगरे खूप मोठी असून नगरतट तर इतके उंच आहेत की ते जणू काही आकाशाला भिडले आहेत. आम्ही तिथे अनाकाचे वंशज देखील पाहिले आहेत.’ ”
29तेव्हा मी त्यांना म्हणालो, “असे भयभीत होऊ नका, त्यांना घाबरू नका. 30-31कारण याहवेह तुमचे परमेश्वर तुमच्यापुढे जात आहेत, ते तुमच्यावतीने त्यांच्याशी लढतील, जसे तुमच्या डोळ्यादेखत त्यांनी इजिप्त देशात आणि अरण्यात असताना केले. ज्याप्रमाणे पिता आपल्या मुलांची सर्वतोपरी काळजी घेतो, त्याप्रमाणे याहवेह परमेश्वराने इथे पोहोचेपर्यंत तुमची सतत काळजी घेतली.”
32पण तरीही तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वरावर विश्वास ठेवण्याचे नाकारले. 33ज्यांनी प्रवासात तुमच्यापुढे राहून रात्री अग्नीने आणि दिवसा मेघांनी तुमचे मार्गदर्शन केले, वाटेत विश्रांतीसाठी उत्तमोत्तम जागा निवडल्या, ते रात्री अग्नीने आणि दिवसा मेघांनी तुमचे मार्गदर्शन करीत.
34तुम्ही जे म्हटले ते याहवेहनी ऐकले आणि ते रागावले व त्यांनी शपथपूर्वक म्हटले: 35“या पिढीतील एकाच्याही दृष्टीस मी त्यांच्या पूर्वजांना वचनदत्त केलेली उत्तम भूमी पडू देणार नाही. 36परंतु यफुन्नेहचा पुत्र कालेब, जो मला पूर्णपणे अनुसरून चालला, त्याचे पाय ज्या भूमीला लागतील ती भूमी मी त्याच्या वंशजांना देईन, कारण तो याहवेहच्या मागे पूर्ण अंतःकरणाने चालला.”
37तुमच्यामुळे याहवेह माझ्यावरही रागावले व म्हणाले, “तू या वचनदत्त देशात प्रवेश करणार नाहीस. 38पण तुझा मदतनीस, नूनाचा पुत्र यहोशुआ प्रवेश करेल. तू त्याला प्रोत्साहन दे, कारण तो या वतनाचा ताबा घेण्यासाठी इस्राएली लोकांचे मार्गदर्शन करेल. 39जी बालके पारतंत्र्यात जातील असे तुम्ही म्हणता, ज्यांना त्यांचे बरेवाईटही कळत नाही, त्यांना मी तो देश बहाल करेन आणि ते त्याला आपल्या ताब्यात घेतील. 40परंतु तुम्ही मागे वळून वाळवंटातून तांबड्या समुद्राच्या वाटेने कूच करावे.”
41तेव्हा लोकांनी कबुली दिली, “आम्ही याहवेहविरुद्ध पाप केले आहे; आम्ही आमच्या वचनदत्त देशात जाऊ व तो मिळविण्यासाठी याहवेह परमेश्वराच्या आज्ञेनुसार आम्ही वर जाऊन लढाई करू.” असे म्हणून त्यांना आपली शस्त्रे सरसावली. त्यांना वाटले की हा सर्व डोंगराळ प्रदेश आपण सहज जिंकून घेऊ.
42परंतु याहवेह मला म्हणाले, “त्यांना सांग, ‘लढाई करण्यास वर जाऊ नका, कारण मी तुमच्याबरोबर राहणार नाही. तुमचा तुमच्या शत्रूकडून पराभव होईल.’ ”
43तुम्हाला मी तसे सांगितले, पण तुम्ही माझे ऐकले नाही. उलट पुन्हा याहवेहच्या आज्ञेविरुद्ध बंड केले आणि धिटाई करून त्या डोंगराळ देशात शत्रूवर चाल करून गेले. 44तिथे डोंगराळ देशात राहणार्‍या अमोर्‍यांनी तुमच्यावर चाल करून मधमाश्यांप्रमाणे सेईरपासून होरमाहपर्यंत तुमचा पाठलाग केला व तुम्हाला मार दिला. 45यानंतर तुम्ही परत येऊन याहवेहसमोर शोक करू लागलात, परंतु त्यांनी तुमच्या रडण्याकडे लक्ष दिले नाही. 46म्हणून तुम्ही कादेश येथेच दीर्घकाल राहिला, असे तुम्ही तिथे दिवस घालविले.

सध्या निवडलेले:

अनुवाद 1: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन