14
शुद्ध आणि अशुद्ध अन्न
1याहवेह तुमच्या परमेश्वराची तुम्ही संतती आहात. मृतांसाठी स्वतःला जखमा करून घेऊ नका किंवा डोक्याचे मुंडण करून घेऊ नका, 2कारण तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराचे पवित्रजन आहात. पृथ्वीवरील इतर सर्व राष्ट्रांमधून तुम्हीच त्यांचा मौल्यवान ठेवा असावे म्हणूनच याहवेहने तुम्हाला निवडले आहे.
3कोणतेही निषिद्ध ठरविण्यात आलेले अन्न तुम्ही खाऊ नये. 4तुम्ही हे प्राणी खाऊ शकता: बैल, मेंढरे व शेरडे, 5सांबर, हरिण, भेकर, रानबोकड, रोही, गवा व डोंगरी मेंढा. 6ज्यांचे खूर दुभागलेले आहेत आणि जे प्राणी रवंथ करतात असे कोणतेही प्राणी तुम्ही खाऊ शकता. 7तरी, जे प्राणी फक्त रवंथ करतात अथवा ज्यांचे फक्त खूर दुभागलेले असतात, हे प्राणी तुम्ही खाऊ नयेत: उंट, ससा आणि रानससा; कारण हे प्राणी रवंथ करतात, परंतु त्यांचे खूर दुभागलेले नसतात; ते प्राणी तुमच्यासाठी विधिनियमानुसार अशुद्ध आहेत. 8डुकरे देखील अशुद्ध आहेत; त्यांचे खूर जरी दुभागलेले आहेत, तरी ते रवंथ करीत नाहीत, त्यांचे मांस तुम्ही खाऊ नये किंवा त्यांच्या मृतशरीरांना स्पर्श करू नये.
9पाण्यात राहणार्या सर्व प्राण्यांपैकी ज्यांना कल्ले व खवले आहेत, त्यांना तुम्ही खाऊ शकता. 10परंतु ज्यांना कल्ले व खवले नाहीत ते तुम्ही खाऊ नये; तुमच्यासाठी ते अशुद्ध आहे.
11कोणतेही शुद्ध पक्षी खाण्यास योग्य आहेत. 12परंतु हे पक्षी तुम्ही खाऊ नये: गरुड, गिधाड, काळे गिधाड, 13लाल पतंग, काळे पतंग, निरनिराळ्या जातीच्या घारी, 14कोणत्याही जातीचे कावळे, 15शिंग असलेले घुबड, किंचाळणारे घुबड, समुद्रपक्षी, सर्व जातीचे बहिरी ससाणे, 16लहान घुबड, पिंगळा, मोठे घुबड, पांढरे घुबड, 17वाळवंटी घुबड, कुरर, करढोक, 18करकोचा, कोणत्याही प्रकारचे बगळे, टिटवी आणि वटवाघूळ.
19सर्वप्रकारचे उडणारे कीटक तुमच्यासाठी अशुद्ध आहेत; ते तुम्ही खाऊ नये. 20पण पंख असलेले कोणतेही पक्षी जे शुद्ध आहेत ते तुम्ही खाऊ शकता.
21आधीच मृत्यू पावलेले असे काहीही तुम्ही खाऊ नये. तुमच्या नगरात राहणार्या एखाद्या परकियाने ते खाण्यास हरकत नाही. किंवा परकियाला विकत द्यावा, परंतु तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराचे पवित्रजन आहात.
त्याच्या आईच्या दुधात करडाला कधीही शिजवू नये.
दशांश
22तुमच्या शेतात प्रत्येक वर्षी होणार्या उत्पन्नाचा दशांश भाग वेगळा ठेवण्याची खात्री करा. 23धान्याचा, नवीन द्राक्षारसाचा व जैतुनाच्या तेलाचा दशांश आणि तुमच्या गुरांच्या व शेरडामेंढरांच्या प्रथम वत्सांनाही याहवेह तुमच्या परमेश्वरासमोर त्यांच्या नावाप्रित्यर्थ खाण्यासाठी, ते जे पवित्रस्थान निवडतील त्या ठिकाणी खा, म्हणजे तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराचे नेहमीच आदर करण्याचे शिकाल. 24परंतु जर ते ठिकाण खूप दूर असेल आणि तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराद्वारे आशीर्वादित झाला असाल आणि तुमचा दशांश घेऊन जाणे गैरसोईचे असेल (कारण जे ठिकाण याहवेह त्यांच्या नावाच्या स्थापनेसाठी निवडतील ते खूप दूर आहे), 25तर मग तुमचे दशांश चांदीच्या मोबदल्यात घ्या, ही चांदी तुमच्याबरोबर घ्या आणि याहवेह तुमचे परमेश्वर निवडतील त्या ठिकाणी जा. 26त्या चांदीने तुम्हाला आवडेल ते विकत घ्या: गाई, बैल, मेंढी, थोडा द्राक्षारस अथवा आंबलेले पेय आणि तुम्हाला हवे असलेले काहीही. त्या ठिकाणी याहवेह तुमच्या परमेश्वरासमोर तुम्ही आणि तुमच्या कुटुंबासह खाऊन पिऊन आनंद करावा. 27आणि तुमच्या नगरात राहत असलेल्या लेवी वंशजांकडे तुम्ही कधीही दुर्लक्ष करू नये; कारण त्यांना तुमच्यासारखा वाटा अथवा वतन नाही.
28प्रत्येक तिसर्या वर्षाच्या शेवटी संपूर्ण उत्पन्नाचा दशांश आणावा आणि तुमच्या नगरात एकत्र साठवून ठेवावा, 29म्हणजे लेवी वंशजांना (ज्यांना स्वतःचा वाटा अथवा वतन नाही) तो दशांश द्यावा किंवा परकियांना द्यावा अथवा तुमच्या नगरात असणार्या विधवांना आणि अनाथांना द्यावा. म्हणजे ते खाऊन तृप्त होतील आणि मग याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला आणि तुमच्या हाताच्या कार्याला आशीर्वादित करतील.