YouVersion लोगो
सर्च आयकॉन

इफिसकरांस 4

4
मंडळीमध्ये ऐक्य व परिपक्वता
1प्रभुसाठी बंदिवान म्हणून, मी तुम्हाला आग्रहाची विनंती करतो, की तुम्हाला झालेल्या पाचारणास शोभेल असे जीवन जगावे. 2पूर्ण नम्रतेने आणि सौम्यतेने; सहनशीलतेने, एकमेकांचे प्रीतिने सहन करावे. 3शांतीच्या बंधनात व पवित्र आत्म्याद्वारे ऐक्य टिकविण्यास झटावे. 4जसे एक शरीर व एक आत्मा, तसेच आपल्याला एकाच गौरवी आशेसाठी पाचारण करण्यात आले होते. 5एक प्रभू, एक विश्वास, एक बाप्तिस्मा; 6एकच परमेश्वर असून ते सर्वांचे पिता आहेत. तेच सर्वांवर, सर्वांमधून आणि सर्वांमध्ये आहेत.
7तरी आपल्यापैकी प्रत्येकाला, ख्रिस्ताने नेमल्याप्रमाणे कृपा देण्यात आली आहे. 8यामुळे असे म्हटले आहे:
“जेव्हा त्यांनी उच्चस्थानी आरोहण केले,
त्यांनी अनेक बंदीवानांना नेले
आणि त्यांच्या लोकांना दाने दिली.”#4:8 स्तोत्र 68:18
9“त्यांचे आरोहण झाले” याचा अर्थ काय? की ते खाली पृथ्वीच्या अधोभागात उतरले होते. 10जे अधोभागात उतरले त्यांनी पूर्ण सृष्टी भरून जाण्याच्या उद्देशाने स्वर्गाच्या उच्च स्थानापर्यंत सन्मानाने आरोहण केले. 11म्हणून ख्रिस्ताने स्वतः मंडळीला काही प्रेषित, संदेष्टे, सुवार्तिक, पाळक आणि शिक्षक म्हणून दिले, 12हे यासाठी की त्यांच्या लोकांना सेवेच्या कार्यात सिद्ध करून ख्रिस्ताचे शरीर सुसज्ज व्हावे. 13जोपर्यंत आपण सर्व विश्वास आणि परमेश्वराच्या पुत्राच्या ज्ञानामध्ये एकता, प्रौढपणा व ख्रिस्ताची परिपूर्णता यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत हे दिले आहे.
14आता यापुढे आपण बाळांसारखे असू नये, आणि तर्‍हेतर्‍हेच्या शिक्षणरूपी वार्‍याने, मनुष्यांच्या धूर्तपणाने व कपटाने फसवले जाऊन लाटांनी इकडे तिकडे वाहणारे व हेलकावे खाणारे असे होऊ नये. 15त्याऐवजी प्रीतीमध्ये सत्य बोलत असताना, आपण प्रत्येक गोष्टींमध्ये ख्रिस्त ज्यांचे मस्तक आहेत, त्यांचे परिपक्व शरीर होण्यासाठी वाढत जावे. 16त्यांच्यापासून संपूर्ण शरीर प्रत्येक सांध्याशी एकत्र जोडून धरले जाते, प्रत्येक अवयव आपले कार्य करतो व प्रीतीमध्ये शरीराची वाढ व बांधणी होते.
ख्रिस्ती जीवनासंबंधी सूचना
17प्रभुच्या वतीने मी तुम्हाला आग्रहाने सांगतो की तुम्ही येथून पुढे ज्यांचे विचार भ्रष्ट झाले आहेत अशा गैरयहूदीयांसारखे जगू नका. 18कारण त्यांचे विचार व बुद्धी अंधकारमय झाली असून, ते त्यांच्या हृदयाच्या कठीणपणामुळे अज्ञानी झाले आहेत व परमेश्वराच्या जीवनापासून दूर गेले आहेत. 19सर्वसाधारण अकलेचा त्यांना गंध राहिला नाही, त्यांनी स्वतःला कामुकता व सर्व अशुद्धतेच्या स्वाधीन केले असून ते लोभाने भरलेले आहेत.
20पण अशाप्रकारे जीवनाचा मार्ग तुम्ही शिकला नाही तर, 21जेव्हा तुम्ही ख्रिस्ताबद्दल ऐकले आणि येशूंमध्ये जे सत्य आहे त्याबद्दल तुम्ही शिकला आहात; 22फसवणुकीच्या इच्छेने भ्रष्ट होत आलेला जुना मनुष्य काढून टाकणे, हे तुम्ही शिकला आहात; 23तुमची मनोवृत्ती नवी केली जावी; 24आणि खरे नीतिमत्व व पवित्रता यामध्ये परमेश्वरासारखा उत्पन्न केलेला नवा स्वभाव तुम्ही परिधान करावा.
25यास्तव तुम्ही प्रत्येकजण एकमेकांशी लबाडी करण्याचे सोडून, आपल्या शेजार्‍यांशी सत्य बोला, कारण आपण सर्व एकाच शरीराचे अवयव आहोत. 26“तुम्ही रागावले असला तरी पाप करू नका.”#4:26 स्तोत्र 4:4 तुम्ही रागात असताना सूर्य मावळू देऊ नका. 27आणि सैतानाला पाय ठेवण्यास जागा देऊ नका. 28चोरी करणार्‍यांनी चोरी न करता आपल्या हातांनी चांगले व उपयोगी असे काम करावे, म्हणजे गरजू लोकांना देण्याकरीता त्यांच्याजवळ काहीतरी असेल.
29आपल्या मुखाद्वारे अपायकारक शब्द बाहेर पडू देऊ नका. परंतु प्रसंगाला अनुसरून ऐकणार्‍यांसाठी उपयुक्त व त्यांच्या वृद्धीसाठी कारणीभूत होईल असे बोला. 30परमेश्वराच्या पवित्र आत्म्याला दुःखी करू नका, कारण त्याच्याद्वारे तुम्ही खंडणीच्या दिवसासाठी शिक्का मारलेले आहात. 31सर्वप्रकारचा कडूपणा, संताप आणि राग, भांडणे आणि निंदानालस्ती याबरोबरच सर्वप्रकारचा द्वेषभाव सोडून द्या. 32एकमेकांना दयाळू व कनवाळूपणे वागवा; जशी परमेश्वराने तुम्हाला ख्रिस्तामध्ये क्षमा केली, तशी तुम्ही एकमेकांना क्षमा करा.

सध्या निवडलेले:

इफिसकरांस 4: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन