13
प्रथमपुत्राचे समर्पण
1याहवेहने मोशेला सांगितले, 2“इस्राएली लोकांचे प्रथम जन्मलेले प्रत्येक नर मला समर्पित कर. उदरातून आलेले इस्राएलातील प्रत्येक प्रथम संतान माझ्या मालकीचे आहे, ते मनुष्याचे असो किंवा पशूंचे.”
3तेव्हा मोशे लोकांना म्हणाला, हा दिवस स्मरणात ठेवा, याच दिवशी याहवेहने आपल्या पराक्रमी हाताने इजिप्त देशातून, गुलामगिरीतून तुम्हाला बाहेर आणले. खमीर असलेले तुम्ही काहीही खाऊ नये. 4आज, अवीव महिन्यात तुम्ही निघालात. 5जेव्हा तुम्हाला कनानी, हिथी, अमोरी, यबूसी आणि हिव्वी यांचा देश, ज्यात दूध व मध वाहतो, ते तुम्हाला देतील अशी तुमच्या पूर्वजांशी शपथ वाहिली, त्यात याहवेह तुम्हाला नेतील; तेव्हा या महिन्यात हा विधी तुम्ही पाळावा. 6सात दिवस तुम्ही बेखमीर भाकर खावी आणि सातव्या दिवशी याहवेहचा उत्सव साजरा करावा. 7या सात दिवसात बेखमीर भाकर खावी; खमीर असलेले काहीही तुमच्यात आढळू नये किंवा तुमच्या सीमेत कुठेही खमीर दृष्टीस पडू नये. 8त्या दिवशी आपल्या लेकरांना सांगा, जेव्हा आम्ही इजिप्तमधून बाहेर आलो तेव्हा याहवेहने आमच्यासाठी जे केले, त्याचे चिन्ह म्हणून आम्ही हे करतो. 9हे तुम्हाला तुमच्या हातावरील खूण व कपाळावर स्मरणचिन्हासारखे असणार. याहवेहचा हा नियम तुमच्या मुखात असावा. कारण याहवेहने आपल्या पराक्रमी हाताने तुम्हाला इजिप्त देशातून बाहेर आणले. 10दरवर्षी हा सण तुम्ही ठराविक वेळी पाळावा.
11“तुम्हाला व तुमच्या पूर्वजांना दिलेल्या शपथेनुसार याहवेह तुम्हाला कनानी लोकांच्या देशात घेऊन जातील व तो देश तुम्हाला देतील, 12तेव्हा प्रत्येक उदराचे पहिले संतान तुम्ही याहवेहला द्यावे. तुमच्या पशूंचे प्रथम जन्मलेले नर याहवेहचे आहेत. 13गाढवाच्या प्रथम जन्मलेल्या शिंगरूला कोकरू खंडणी म्हणून भरून सोडव, पण खंडणी भरून ते तू सोडविले नाहीस, तर त्याची मान मोड. मनुष्याच्या प्रत्येक नराला खंडणी भरून सोडव.
14“भविष्यकाळात तुमची मुले तुम्हाला विचारतील, ‘याचा अर्थ काय आहे?’ तेव्हा त्यांना सांगा, ‘याहवेहने आपल्या पराक्रमी हाताने आम्हाला इजिप्तमधून, त्यांच्या गुलामगिरीतून बाहेर आणले. 15जेव्हा फारोह हट्टाने आम्हाला जाऊ देत नव्हता, तेव्हा याहवेहने संपूर्ण इजिप्त देशातील लोकांचे व जनावरांचे प्रथम जन्मलेले मारून टाकले. म्हणून प्रत्येक उदरातून प्रथम जन्मलेला नर आम्ही याहवेहला समर्पित करतो आणि ते आम्ही खंडणी भरून सोडवितो.’ 16आणि हे तुमच्या हातावर खूण व कपाळावर चिन्ह असे असावे, की याहवेहने आपल्या बलवान हाताने आम्हाला इजिप्त देशातून बाहेर आणले.”
तांबडा समुद्र पार करतात
17शेवटी फारोहने जेव्हा लोकांस जाऊ दिले, तेव्हा परमेश्वराने त्यांना पलिष्ट्यांच्या देशातून जवळचा मार्ग असूनही तिथून चालविले नाही. कारण परमेश्वर म्हणाले, “जर युद्धाला सामोरे जावे लागले तर त्यांचे मन बदलेल व ते पुन्हा इजिप्तकडे जातील.” 18म्हणून परमेश्वराने त्यांना तांबड्या समुद्राकडून रानाच्या मार्गाने नेले. इस्राएली लोक लढाईसाठी सज्ज होऊन इजिप्तमधून बाहेर पडले.
19मोशेने योसेफाची हाडे आपल्याबरोबर घेतली. कारण, योसेफाने इस्राएली लोकांकडून शपथ घेतली होती. तो म्हणाला होता, “परमेश्वर खरोखर तुमच्या मदतीला येईल, तेव्हा तुमच्याबरोबर माझी हाडे या ठिकाणातून घेऊन जा.”
20सुक्कोथ शहर सोडल्यावर त्यांनी वाळवंटाच्या सीमेवर एथाम येथे तळ दिला. 21दिवस व रात्र ते प्रवास करू शकतील, म्हणून दिवसा मेघस्तंभातून त्यांचे मार्गदर्शन करीत व रात्री अग्निस्तंभातून प्रकाश देत याहवेह त्यांच्या पुढे चालले. 22दिवसाचा मेघस्तंभ व रात्रीचा अग्निस्तंभ यांनी लोकांसमोरून आपले स्थान सोडले नाही.