निर्गम 14
14
1मग याहवेह मोशेला म्हणाले, 2“इस्राएली लोकांस सांग मागे फिरा आणि पी-हाहीरोथ जवळ, मिग्दोल व समुद्र यांच्यामध्ये, समुद्राजवळ तळ द्या, जो थेट बआल-सफोनासमोर आहे. 3यामुळे फारोहला वाटेल की, इस्राएली लोक देशाभोवती गोंधळून भटकत आहेत, वाळवंटात अडकले आहेत. 4मी फारोहचे मन कठीण करेन, म्हणजे तो त्यांचा पाठलाग करेल. पण फारोह व त्याच्या सैन्याकडून मी माझे गौरव करून घेईन आणि इजिप्तच्या प्रजेला समजेल की, मी याहवेह आहे.” मग इस्राएली लोकांनी तसे केले.
5जेव्हा इजिप्तच्या राजाला सांगितले गेले की ते लोक पळून गेले, फारोहने व त्याच्या अधिकार्यांनी त्यांच्याविषयी आपले मन बदलले व ते म्हणाले, “आपण हे काय केले? आपण इस्राएली लोकांना जाऊ दिले व त्यांची सेवा गमावली!” 6मग त्याने ताबडतोब आपला रथ जोडून आपले सैन्य सोबत घेतले. 7सहाशे सर्वात उत्तम असे रथ व त्याबरोबर इजिप्तचे बाकी सर्व रथ व त्यावरील अधिकारी त्याने घेतले. 8याहवेहने इजिप्तचा राजा फारोह याचे हृदय कठीण केले म्हणून इस्राएली लोक जे मोठ्या धैर्याने इजिप्तमधून जात होते, त्यांचा त्याने पाठलाग केला. 9इजिप्तच्या लोकांनी—फारोहचे सर्व घोडे व रथ, घोडेस्वार व सैन्य यांच्यासह—इस्राएली लोकांचा पाठलाग केला आणि बआल-सफोनासमोर असलेल्या पी-हाहीरोथ, जिथे ते तळ देऊन होते तिथे त्यांना गाठले.
10फारोह जसा जवळ आला, इस्राएली लोकांनी पाहिले की इजिप्तचे सैन्य त्यांच्यावर चालून येत आहे. ते फार घाबरले व मोठ्याने याहवेहकडे आरोळी मारली. 11ते मोशेला म्हणाले, “इजिप्त देशात कबरा नव्हत्या म्हणून तू आम्हाला या रानात मरायला आणले काय? इजिप्तमधून आम्हास बाहेर आणून तू हे काय केले? 12आम्हाला असेच राहू दे; आम्हाला इजिप्त लोकांची सेवा करू दे, असे आम्ही तुला इजिप्तमध्ये असताना म्हणालो नव्हतो काय? या रानात मरण्याऐवजी इजिप्त लोकांची गुलामी करणे आम्हाला बरे होते!”
13मोशे लोकांना म्हणाला, “घाबरू नका. स्तब्ध राहा व आज याहवेह तुम्हाला अद्भुतरित्या कसे सोडविणार आहे ते पाहा. हे इजिप्तचे लोक जे तुम्हाला आज दिसतात ते पुन्हा दिसणार नाहीत. 14याहवेह तुमच्यासाठी लढतील; तुम्ही केवळ स्तब्ध राहा.”
15मग याहवेह मोशेला म्हणाले, “माझ्याकडे का रडतोस? इस्राएली लोकांना पुढे जायला सांग. 16समुद्रातील पाणी दुभागावे म्हणून तुझ्या हातातील काठी समुद्रावर उगार म्हणजे इस्राएली लोक समुद्रामधून कोरड्या जमिनीवरून जातील. 17मी इजिप्तच्या लोकांची मने कठीण करेन आणि ते त्यांच्यामागे समुद्राच्या आत येतील. मग फारोह, त्याचे सर्व सैनिक, रथ व घोडेस्वार यांच्याकडून मी माझे गौरव करून घेईन. 18आणि जेव्हा फारोह, त्याचे रथ व त्याचे घोडेस्वार यांच्याकडून मला गौरव मिळेल, तेव्हा इजिप्तचे लोक जाणतील की मी याहवेह आहे.”
19मग परमेश्वराचा दूत, जो इस्राएलांपुढे प्रवास करीत होता, तो आता त्यांच्या मागच्या बाजूला गेला. मेघस्तंभ देखील त्यांच्यापुढून निघून त्यांच्यामागे गेला, 20आणि इजिप्तचे सैन्य व इस्राएली लोक यांच्यामध्ये आला. त्या रात्रभर मेघांनी एका बाजूने प्रकाश तर दुसर्या बाजूने अंधकार आणला; म्हणून रात्रभर एक दल दुसर्यापर्यंत पोहोचला नाही.
21मग मोशेने आपला हात समुद्रावर उगारला आणि याहवेहने रात्रभर पूर्वेचा वारा वाहवून समुद्राचे पाणी मागे हटवून ती कोरडी जमीन केली व पाणी दुभागले. 22तेव्हा इस्राएली लोक, त्यांच्या उजवी व डावीकडे पाण्याची भिंत उभी असताना, समुद्रामधून कोरड्या भूमीवरून चालत गेले.
23इजिप्तच्या लोकांनी इस्राएली लोकांचा पाठलाग केला आणि फारोहचे घोडे, रथ व स्वार त्यांच्यामागे समुद्राच्या मध्ये गेले. 24पण पहाटेच्या वेळी अग्निस्तंभामधून व मेघस्तंभामधून याहवेहने इजिप्तच्या सेनेकडे पाहिले आणि त्यांचा गोंधळ उडविला. 25त्यांच्या रथांची चाके गच्च केली की त्यांना पुढे जाणे कठीण होऊ लागले. तेव्हा इजिप्तची लोक म्हणू लागले, “इस्राएलच्या लोकांपासून आपण दूर जाऊ या! कारण याहवेह त्यांच्यावतीने इजिप्तविरुद्ध लढत आहेत.”
26मग याहवेह मोशेला म्हणाले, “आपला हात समुद्रावर लांब कर म्हणजे समुद्राचे पाणी पूर्ववत होऊन इजिप्तचे सर्व सैन्य, त्यांचे रथ व घोडेस्वार यांच्यावर येईल.” 27मोशेने आपला हात समुद्रावर लांब केला आणि पहाटेच्या वेळी समुद्र त्याच्या ठिकाणी परत गेला. इजिप्तचे लोक त्याच्याकडे धावत असताना याहवेहने त्यांना समुद्रात बुडवून टाकले. 28पाणी परत वाहू लागले व फारोहचे सर्व सैन्य, घोडेस्वार व रथ—फारोहचे संपूर्ण सैन्य, ज्यांनी इस्राएली लोकांचा समुद्रामध्ये पाठलाग केला ते पाण्याखाली गेले. त्यांच्यातील एकही जिवंत राहिला नाही.
29पण इस्राएली लोक कोरड्या जमिनीवरून समुद्र पार करून गेले आणि त्यांच्या उजवीकडे व डावीकडे पाणी भिंतीप्रमाणे उभे राहिले. 30त्या दिवशी याहवेहने इस्राएलला इजिप्तच्या हातातून सोडविले, इस्राएली लोकांनी इजिप्तचे मेलेले लोक समुद्रकिनार्यावर पडलेले पाहिले. 31जेव्हा इस्राएली लोकांनी इजिप्तच्या लोकांविरुद्ध आलेला याहवेहचा पराक्रमी हात बघितला, त्यावेळी त्यांना याहवेहचे भय वाटले आणि त्यांनी याहवेह व त्यांचा सेवक मोशे यांच्यावर विश्वास ठेवला.
सध्या निवडलेले:
निर्गम 14: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.