18
इथ्रो मोशेला भेटतो
1आता परमेश्वराने मोशे व त्यांच्या इस्राएली लोकांसाठी काय केले आणि याहवेहने इस्राएली लोकांना कशाप्रकारे इजिप्तमधून बाहेर आणले, याविषयी सर्वकाही मिद्यानी याजक व मोशेचा सासरा इथ्रो याने ऐकले.
2मोशेने आपली पत्नी सिप्पोराहला व त्याच्या दोन मुलांना आपला सासरा इथ्रो याच्याकडे सोडले होते, 3मोशेच्या एका मुलाचे नाव गेर्षोम#18:3 अर्थात् परकीय असे होते; कारण मोशे म्हणाला, “मी परक्या देशात विदेशी झालो आहे.” 4दुसर्या मुलाचे नाव एलिएजर#18:4 अर्थात् माझे परमेश्वर माझे साहाय्य आहेत असे ठेवले होते. कारण मोशे म्हणाला, “माझ्या वडिलांचे परमेश्वर माझे साहाय्य झाले; व त्यांनी मला फारोहच्या तलवारीपासून सोडविले.”
5इथ्रो, मोशेचा सासरा, मोशेची पत्नी व मुलांसोबत, परमेश्वराच्या डोंगराजवळ रानात जिथे त्यांनी तळ दिला होता तिथे आला. 6इथ्रोने मोशेला निरोप पाठविला, “मी तुझा सासरा इथ्रो, तुझी पत्नी व दोन मुले घेऊन तुझ्याकडे येत आहे.”
7तेव्हा मोशे त्याच्या सासर्याला भेटायला बाहेर आला आणि नमन करून त्याचे चुंबन घेतले. ते एकमेकांना अभिवादन करून तंबूत गेले. 8मोशेने आपल्या सासर्याला सर्वकाही सांगितले जे इस्राएली लोकांसाठी याहवेहने फारोह व इजिप्तच्या लोकांबरोबर केले आणि वाटेत ज्या अडचणी त्यांना आल्या आणि कशाप्रकारे याहवेहने त्यांची सुटका केली.
9इजिप्तच्या लोकांच्या हातातून इस्राएलची सुटका करण्यासाठी याहवेहने जी चांगली कृत्ये केली, ती ऐकून इथ्रोला फार आनंद झाला. 10इथ्रो म्हणाला, “याहवेहचे नाव धन्यवादित असो, ज्यांनी तुला इजिप्त व फारोहच्या तावडीतून सोडविले आणि ज्यांनी लोकांना इजिप्तच्या लोकांच्या हातातून सोडविले. 11आता मला समजले की, याहवेह सर्व दैवतांपेक्षा श्रेष्ठ आहे, कारण ज्यांनी इस्राएली लोकांना क्रूरतेने वागविले होते त्यांचा त्यांनी नाश केला आहे.” 12मग मोशेचा सासरा इथ्रोने परमेश्वरासाठी होमार्पण व इतर अर्पणे आणली आणि अहरोन व इस्राएली लोकांचे सर्व वडील मोशेच्या सासर्याबरोबर भोजन करावयास परमेश्वराच्या समक्षतेत आले.
13दुसर्या दिवशी मोशे इस्राएली लोकांचा न्याय करावयाला त्याच्या आसनावर बसला आणि लोक सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्याच्याभोवती उभे राहिले. 14जेव्हा मोशे लोकांसाठी जे सर्व करीत होता ते त्याच्या सासर्याने पाहिले, तो म्हणाला, “हे तू लोकांसाठी काय करीत आहेस? तू एकटाच न्यायाधीश म्हणून का बसतोस व ते सर्व लोक दिवसभर तुझ्याभोवती उभे असतात?”
15मोशे त्याला म्हणाला, “कारण लोक परमेश्वराची इच्छा जाणावी म्हणून माझ्याकडे येतात. 16जेव्हा त्यांच्यात वाद होतात, ते माझ्याकडे आणतात आणि मी त्यांचा निर्णय करतो आणि त्यांना परमेश्वराचे विधी व नियम याबद्दल सांगतो.”
17मोशेच्या सासर्याने उत्तर दिले, “तू जे करतोस ते बरोबर नाही. 18तू व हे लोक जे तुझ्याकडे येतात, सर्वजण थकून जाल. हे काम तुझ्यासाठी खूप जड आहे; तू एकट्यानेच ते करणे तुला जमणार नाही. 19तर आता तू माझे ऐक आणि मी तुला सल्ला देतो आणि परमेश्वर तुझ्याबरोबर असो. तू परमेश्वरासमोर या लोकांचा प्रतिनिधी म्हणून राहा आणि त्यांचे वाद परमेश्वरासमोर आण. 20परमेश्वराचे विधी व नियम त्यांना शिकव आणि ज्या मार्गाने त्यांनी चालावे आणि त्यांचे वर्तन कसे असावे हे त्यांना दाखव. 21पण या सर्व लोकांमधून सक्षम असे लोक—जे परमेश्वराचे भय बाळगणारे, विश्वसनीय, व अन्यायाच्या लाभाचा द्वेष करणारे असतील—ते निवडून घे; त्यांची हजारांवर, शंभरांवर, पन्नासांवर आणि दहांवर अधिकारी म्हणून नेमणूक कर. 22त्यांनी सर्व समयी लोकांचे न्यायाधीश म्हणून असावे, परंतु प्रत्येक अवघड वाद तुझ्याकडे आणावा; आणि सोपे वाद त्यांच्या अधिकार्यांनी सोडवावेत. त्यामुळे तुझे ओझे हलके होईल, कारण ते तुझ्याबरोबर तुझा भार वाहतील. 23जर तू असे केले आणि परमेश्वराने तुला आज्ञा केली, तर तुला सोपे जाईल आणि हे लोकसुद्धा समाधानी होऊन घरी जातील.”
24मोशेने आपल्या सासर्याचे ऐकून सर्वकाही त्याने सांगितल्याप्रमाणे केले. 25मोशेने संपूर्ण इस्राएलातून सक्षम अशी माणसे निवडली व त्यांना हजारांवर, शंभरांवर, पन्नासांवर व दहांवर प्रमुख व अधिकारी म्हणून नेमले. 26त्यांनी सर्व समयी लोकांचे न्यायाधीश म्हणून सेवा केली. अवघड वाद त्यांनी मोशेकडे आणले, परंतु साधेसरळ वाद त्यांनीच सोडविले.
27मग मोशेने आपल्या सासर्याचा निरोप घेतला आणि इथ्रो त्याच्या देशास परत निघून गेला.