20
दहा आज्ञा
1आणि परमेश्वर ही सर्व वचने बोलले:
2“ज्याने तुम्हाला इजिप्त देशातून व दास्यातून बाहेर आणले, तो मीच याहवेह, तुमचा परमेश्वर आहे.
3“माझ्यासमोर#20:3 किंवा शिवाय तुम्हाला इतर कोणतेही देव नसावेत.”
4तुम्ही स्वतःसाठी वर आकाशातील, पृथ्वीवरील व पृथ्वीच्या खाली जलातील कशाचीही प्रतिमा करू नका. 5तुम्ही त्यांना नमन करू नये किंवा त्यांची उपासना करू नये; कारण मी, याहवेह तुमचा परमेश्वर, ईर्ष्यावान परमेश्वर आहे. जे माझा द्वेष करतात त्यांच्या लेकरांना तिसर्या व चौथ्या पिढीपर्यंत त्यांच्या आईवडिलांच्या पापांचे शासन करतो. 6परंतु जे माझ्यावर प्रीती करतात आणि माझ्या आज्ञा पाळतात अशांच्या हजारो पिढ्यांपर्यंत प्रीती करतो.
7याहवेह तुमच्या परमेश्वराचे नाव तुम्ही व्यर्थ घेऊ नका, कारण जे त्यांचे नाव व्यर्थ घेतात, त्यांना याहवेह शिक्षा दिल्यावाचून राहणार नाहीत.
8शब्बाथ दिवस पवित्रपणे पाळून त्याची आठवण ठेवा. 9सहा दिवस तुम्ही परिश्रम करावेत आणि आपली सर्व कामे करावी. 10परंतु सातवा दिवस याहवेह तुमचे परमेश्वर यांचा शब्बाथ आहे. त्या दिवशी तुम्ही कोणतेही काम करू नये, तुम्ही किंवा तुमचा पुत्र किंवा कन्या, तुमचा दास किंवा दासी, तुमचे पशू किंवा तुमच्या नगरात राहणारा परदेशी यांनी देखील कोणतेही काम करू नये. 11कारण सहा दिवसात याहवेहने आकाश व पृथ्वी, सागर आणि त्यातील सर्वकाही निर्माण केले, परंतु सातव्या दिवशी त्यांनी विश्रांती घेतली, म्हणून याहवेहने शब्बाथ दिवस आशीर्वादित करून तो पवित्र केला.
12आपल्या वडिलांचा व आपल्या आईचा सन्मान करा, म्हणजे जो देश याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला देत आहे, त्यात तुम्ही दीर्घकाळ राहाल.
13तुम्ही खून करू नका.
14तुम्ही व्यभिचार करू नका.
15तुम्ही चोरी करू नका.
16तुमच्या शेजार्याविरुद्ध खोटी साक्ष देऊ नका.
17तुमच्या शेजार्याच्या घराचा लोभ धरू नका. तुमच्या शेजार्याच्या पत्नीची अभिलाषा धरू नका किंवा त्याच्या दासाचा किंवा दासीचा, किंवा त्याच्या बैलाचा किंवा त्याच्या गाढवाचा, किंवा त्याच्या मालकीचे जे काही असेल त्या कशाचाही लोभ धरू नका.
18जेव्हा लोकांनी विजा पाहिल्या आणि गडगडाट व तुतारीचा आवाज ऐकला आणि धुराने भरलेला पर्वत पाहिला, ते भीतीने कंपित झाले व दूर उभे राहिले 19आणि ते मोशेला म्हणाले, “तुम्ही स्वतः आमच्याशी बोला आणि आम्ही ऐकू. पण परमेश्वराला मात्र आमच्याशी बोलू देऊ नका, नाहीतर आम्ही मरून जाऊ.”
20मोशे लोकांना म्हणाला, “घाबरू नका. तुमची परीक्षा पाहावी म्हणून परमेश्वर आले आहेत, अशासाठी की परमेश्वराचे भय तुम्हाला पापापासून दूर ठेवण्याकरिता तुमच्याबरोबर असावे.”
21परमेश्वर होते तिथे मोशे दाट अंधकारात गेला असताना, लोक दूर अंतरावर उभे राहिले.
मूर्ती व वेद्या
22मग याहवेह मोशेला म्हणाले, “इस्राएली लोकांस हे सांग: ‘मी तुमच्याशी स्वर्गातून बोललो हे तुम्ही स्वतः पाहिले आहे: 23माझ्या खेरीज इतर कोणतेही देव बनवू नका; तुमच्यासाठी चांदीच्या किंवा सोन्याच्या मूर्त्या बनवू नका.
24“ ‘माझ्यासाठी मातीची वेदी तयार करा व त्यावर तुमची मेंढरे, बोकडे व तुमचे गुरे चढवून आपली होमार्पणे व शांत्यर्पणे ही अर्पण करा. जिथे कुठे माझ्या नावाचे गौरव व्हावा असे मी ठरवेन, तिथे मी तुमच्याजवळ येऊन तुम्हाला आशीर्वाद देईन. 25तुम्ही माझ्यासाठी जर दगडाची वेदी बांधली, तर त्यासाठी घडविलेले दगड वापरू नयेत. त्यावर कोणतेही हत्यार वापरले तर तुम्ही त्यास विटाळून टाकाल. 26आपली नग्नता उघडी पडू नये म्हणून माझ्या वेदीवर पायर्या चढून जाऊ नका.’